बिलिव्हर्सच्या पा. डॉम्निकला पत्नीसह उ. गोव्यातून तडीपार व्हावेच लागणार

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशावर मुख्य सचिवांचीही मोहोर

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th April, 02:25 pm
बिलिव्हर्सच्या पा. डॉम्निकला पत्नीसह उ. गोव्यातून तडीपार व्हावेच लागणार

म्हापसा : शिवोलीतील फाईव्ह पिलर्स चर्चचा पास्टर तथा बिलिव्हर्सचा स्वयंघोषित गॉड डॉम्निक डिसोझा व त्याच्या पत्नीला उत्तर गोव्यातून तडीपार करण्याचा आदेश उत्तर गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर या आदेशाला डॉम्निकने राज्याचे मुख्य सचिव आणि संबंधित यंत्रणांकडे अर्जाद्वारे आव्हान दिले होते. त्याचा हा अर्ज फेटाळण्यात आल्याने दोघांनाही उत्तर गोव्यातून तडीपार व्हावे लागणार आहे. 

डॉम्निक याच्याविरोधात २००९ सालापासून पोलिसांत ९ तक्रारींच्या आधारे गुन्हे नोंद करण्यात आले आहेत. त्यात तीन गुन्हे धर्मांतराशी संबंधित आहेत. मूळ तामिळनाडू येथील व सध्या कुर्टी-फोंडा येथे वास्तव्यास असलेल्या नागरिकाने डॉम्निक याच्याविरोधात धर्मांतराचा प्रयत्न तसेच फसवणूक केल्याबद्दल तक्रार दाखल केली होती.

सडये-शिवोली येथील बिलिव्हर्सच्या फाईव्ह पिलर्स चर्चमधून पा. डॉम्निक काळ्या जादूचा वापर करून धर्मांतरण करत असल्याची तक्रार मूळ तामिळनाडूतील वडिवेल बी. (सध्या रा. कुर्टी-फोंडा) यांनी म्हापसा पोलिसांत दाखल केली आहे. याच तक्रारीला अनुसरून पोलिसांनी यंदा वर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजे जानेवारीत डॉम्निकला अटक करत न्यायालयात हजर केले होते. तेव्हा त्याला सशर्त जामीन मंजूर केला होता.

डॉम्निक याने फोंडा येथील इसमाला धर्मांतरासाठी धमकावले, तसेच डॉम्निकने सांगितलेला धर्म स्वीकारण्याचे आमिष दाखवले, असा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. काळी जादू कायद्याच्या अंतर्गत कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील दोन वर्षांपासून डॉम्निक डिसोझा याच्या विरुद्ध धर्मांतरण करण्याच्या तक्रारी दाखल झाल्या असून त्याच्याविरुद्ध अशाच कलमांतर्गत नोंदवण्यात आलेला हा तिसरा गुन्हा आहे. विविध कलमांतर्गत आणखी ५ गुन्हे यापूर्वीच डॉम्निक याच्यावर दाखल आहेत. आतापर्यंत त्याच्यावर एकूण ९ गुन्हे दाखल आहेत. यात म्हापसा पोलीस स्टेशनमध्ये ७ तर क्राईम ब्रँचमध्ये २ गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा