गोव्यात उद्या मतदान, मात्र वालांकिनी विशेष रेल्वेला आज दिसली गर्दी!

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
06th May, 01:04 pm
गोव्यात उद्या मतदान, मात्र वालांकिनी विशेष रेल्वेला आज दिसली गर्दी!

मडगाव : रेल्वे प्रशासनाकडून दर आठवड्याला वालांकिनीच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी विशेष गाडी सोडला जाते. मतदान मंगळवारी असून सोमवारी वालांकिनीला जाणाऱ्या या गाडीला इतर प्रवाशांसह गोव्यातील प्रवाशांचीही गर्दी होती. मतदानाची तारीख जाहीर होण्यापूर्वी बुकींग केल्याचे काही प्रवाशांनी सांगितले.


राज्यात लोकसभेच्या निवडणुकांची धामधूम सुरू आहे. निवडणूक आयोगाकडून मतदानासाठी लोकांनी घराबाहेर पडावे यासाठी जनजागृतीवरही भर दिलेला आहे. तसेच या दिवशी सरकारने सार्वजनिक सुटी जाहीर केली आहे. पत्रकांचे वाटप, जाहिरात फलक, वर्तमानपत्रातून जाहिराती, पॅराग्लायडिंगद्वारे जागृती, व्हीडिओ व सोशल मीडियावरून मतदानाचे आवाहन केले आहे. त्यामुळे लोक मतदानासाठी मोठ्या प्रमाणात तयार झाले आहेत.


रेल्वे प्रशासनाकडून दर सोमवारी वालांकिनीसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येते. या रेल्वेतून गोव्यातून वालांकिनीला जाणाऱ्या प्रवाशांनी मतदानाची तारीख जाहीर होण्यापूर्वीच बुकींग केलेले होते. मतदान मंगळवारी असूनही त्यांनी तिकीट रद्द न करता प्रवास करणे पसंद केले. ही विशेष रेल्वे राज्य सरकारकडून देवदर्शन योजनेतून सोडण्यात येणारी रेल्वे गाडी नाही. मात्र, असे असतानाही विरोधकांनी ख्रिश्चन मते कमी करण्यासाठी ही रेल्वे सोडण्यात आल्याची वक्तव्ये केलेली होती. सोमवारी सकाळी मडगाव रेल्वेस्थानकावरून वालांकिनीला जाणाऱ्या रेल्वेतून दर्शनासाठी जाण्यासाठी गोव्यातील प्रवाशांनी गर्दी केली होती. यात दुसऱ्या राज्यातीलही काही प्रवासी होते, ज्यांनी गोव्यातून बुकींग केलेले होते.


कर्नाटकात जाणाऱ्या बसेसना गर्दी

कदंब महामंडळाकडून कर्नाटक राज्यात सोडण्यात येणाऱ्या बसेसनाही प्रवाशांची गर्दी दिसून आली. मंगळवारी कर्नाटकातही लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार अाहे. कर्नाटकातील अनेक नागरिक दक्षिण गोव्यातील विविध भागात वास्तव्यास आहेत. त्यांचे मतदान कर्नाटकात असल्याने सोमवारी बसस्थानकावरुन कर्नाटकात जाणाऱ्या गाड्यांनाही गर्दी दिसून आली.

हेही वाचा