लोकसभा रिंगणातून मगोपची १५ वर्षांपूर्वी ‘स्वेच्छा निवृत्ती’

पांडुरंग राऊत यांनी २००९ साली मगोपतर्फे लढवली होती लोकसभा निवडणूक

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd April, 12:54 am
लोकसभा रिंगणातून मगोपची १५ वर्षांपूर्वी ‘स्वेच्छा निवृत्ती’

पणजी : गोव्याच्या मातीत रुजलेला आणि देदीप्यमान इतिहास लाभलेला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष हा २००९ नंतर लोकसभा निवडणुकीपासून दूरच आहे. या पक्षाने राज्याला एकमेव महिला मुख्यमंत्री देण्याबरोबर एकमेव महिला खासदारही दिला. २००९ साली पांडुरंग राऊत यांनी उत्तर गोवा लोकसभा मतदारसंघातून मगोतर्फे निवडणूक लढवली होती. स्व. पांडुरंग राऊत यांच्यानंतर कोणीही मगोतर्फे लोकसभा निवडणूक लढवली नाही. दक्षिण गोव्याचा विचार केला तर सर्वांत शेवटी पद्मनाभ आमोणकर यांनी १९९८ साली मगो पक्षातर्फे निवडणूक लढवली होती. १९९८ च्या लोकसभा निवडणुकीनंतर दक्षिण गोव्यात मगोने उमेदवार उभा केलेला नाही.


तसेच १९९६ साली मगो पक्षातर्फे रमाकांत खलप हे विजयी होऊन लोकसभेत पोचले होते. सध्या कॉंग्रेसचे उमेदवार असलेले रमाकांत खलप हे मगोचे शेवटचे खासदार आहेत. १९९६ नंतर राज्यात मगोचा खासदार झालेला नाही.

नव्यानेच उदयास आलेल्या आरजी पक्षानेही यावेळी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतलेली आहे. २०१४, २०१९ व आता २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने उमेदवार दिलेला नाही. २०१४ साली मगोने भाजप तर २०१९च्या निवडणुकीत कॉंग्रेस उमेदवाराला पाठिंबा दिला होता. आता २०१९ च्या निवडणुकीत सरकारात असल्याने मगोचा भाजप उमेदवाराला पाठिंबा आहे.

सध्या मगोचे उपाध्यक्ष असलेले नारायण सावंत हे मगोचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. बरीच वर्षे ते मगो पक्षात आहेत. २००९ वर्षी झालेल्या लोकसभा निवडणुकीवेळी राज्यात कॉंग्रेस - राष्ट्रवादी आघाडीचे सरकार होते. उत्तरेची जागा राष्ट्रवादीला सोडण्यात आली होती. राष्ट्रवादी कॉंग्रेसला उमेदवार सापडत नव्हता. अखेरीस कॉंग्रेसचे जितेंद्र देशप्रभू यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आणी राष्ट्रवादीतर्फे निवडणूक लढवली. या पार्श्वभूमीवर मगोचे तत्कालीन अध्यक्ष पांडुरंग राऊत यांनी उमेदवारी दाखल केली. दीड हजारच्या आसपास त्यांना मते मिळाली होती. यानंतर मतभेद झाल्याने राऊत यांनी मगोला रामराम केला, अशी माहिती नारायण सावंत यांनी दिली.

गोवा मुक्तीनंतर प्रत्येक निवडणुकीत उमेदवार उभा करण्याची मगोची परंपरा सर्वप्रथम १९९९ च्या निवडणुकीत खंडीत झाली. यानंतर फक्त २००९ च्या लोकसभा निवडणुकीत मगोचा उमेदवार होता. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या उमेदवारीवर दक्षिण गोव्यात हिंदू उमेदवार (मुकुंद शिंक्रे, १९६२) विजयी झालेला आहे. उत्तर गोव्यात पीटर अल्वारीस (१९६२) हा ख्रिस्ती उमेदवार विजयी झालेला आहे, अशी पार्श्वभूमी असलेल्या या पक्षाचे १९९८ नंतर लोकसभेत कधीच अस्तित्व दिसले नाही.