शांताराम शेट मांद्रेकर यांचे निधन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
30th January 2023, 12:14 am
शांताराम शेट मांद्रेकर यांचे निधन

पेडणे : देऊळवाडा - मांद्रे येथील ज्येष्ठ नागरिक तसेच वैद्य शांताराम केशव शेट मांद्रेकर तथा ‘शांताराम दोतोर’ (९१) यांचे रविवारी दि. २९ जानेवारी रोजी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले.

त्यांनी आयुष्यभर रुग्णांची आयुर्वेदिक औषधे देऊन सेवा केली. हाड मोडणे, फ्रॅक्चर यावरही ते उपचार करायचे. गुरांसाठीची त्यांची सेवा फारच प्रसिद्ध होती. तसेच ‘धिरयो’च्या बैलांचे डॉक्टर म्हणून धिरयोप्रेमींत प्रसिद्ध होते. गोवा, कोकण आणि कारवारपर्यंतचे लोक त्यांच्याकडे औषधांसाठी यायचे.

गोवा मुक्ती लढ्यावेळी पोर्तुगीजांनी त्यांना दोनवेळा अटक केली. देऊळवाडा - मांद्रे येथील ‘पोस्ता’वर अटक करून दोन दिवस ठेवले होते. स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी कधी मिरवले नाही. तसेच कोणत्याही मानधनाची अपेक्षा केली नाही की अर्जही केला नाही. कुणी राजकारणी अर्ज घेऊन आले तरी ते त्यांनी नम्रपणे नाकारले.

शेतकरी असलेले शांताराम दोतोर चिरेखाणीवर दगड काढणे, लाकडे चिरणे, पाडेली, घरे शाकारणे, सुतारकाम असे कामधंदे करायचे. पहिले मुख्यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांच्याशी त्यांचे सख्य होते.

पत्रकार किशोर शेट मांद्रेकर यांचे ते वडील होत. तर अंगणवाडी सेविका सायली शेट मांद्रेकर यांचे सासरे, पोलीस खात्यातील उपनिरीक्षक तुकाराम शेट मांद्रेकर यांचे ते काका होत. त्यांच्या पश्चात मुलगा, सुना, दोन मुली, जावई, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. 

हेही वाचा