पोलीस असल्याचे भासवून ज्येष्ठ नागरिकाचे दागिने लंपास

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th January 2023, 12:12 Hrs
पोलीस असल्याचे भासवून  ज्येष्ठ नागरिकाचे दागिने लंपास

पणजी : ताळगाव येथील ज्येष्ठ नागरिकाचे दोघा तोतया पोलिसांनी १.५ लाख रुपयांचे दागिने लंपास केले आहे. या प्रकरणी पणजी पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

पणजी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणी ताळगाव येथील प्रशांत सातार्डेकर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात त्यांचे वडील सकाळी फिरायला गेले होते. त्यावेळी ताळगाव येथील एचडीएफसी बँकेजवळ दोन व्यक्ती दुचाकीवरून येऊन ते पोलीस असल्याचे सांगितले. त्यानंतर त्या दोघांनी तक्रारदाराच्या वडिलांची १.५ लाख रुपये किमतीची सोनसाखळी आणि अंगठी सुरक्षित ठेवण्याच्या बहाण्याने त्यांच्याकडून काढून घेतली. त्यानंतर ते दोघे तेथून पसार झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याची दखल घेऊन पणजी पोलीस निरीक्षक निखिल पालयेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रफुल गिरी यांनी अज्ञात व्यक्तीविरोधात भादंसंच्या कलम ४१९, ४२० आणि आरडब्ल्यू ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.