राहुल गांधींनी लाल चौकात फडकवला तिरंगा

कामगिरी करणारे ठरले दुसरे काँग्रेस नेते : भारत जोडो यात्रेचा आज समारोप

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
29th January 2023, 11:29 Hrs
राहुल गांधींनी लाल चौकात फडकवला तिरंगा

श्रीनगर : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी दुपारी श्रीनगरमधील लाल चौकात तिरंगा फडकवला. लाल चौकात तिरंगा फडकवणारे राहुल गांधी हे आतापर्यंतचे पंडित जवाहरलाल नेहरुंनंतरचे दुसरे काँग्रेस नेते ठरले आहेत.
राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा आता अंतिम टप्प्यात आहे. सोमवारी ही यात्रा श्रीनगरमध्ये संपेल. राहुल गांधी भारत जोडो यात्रेत सकाळी काही किलोमीटर चालल्यानंतर दुपारी १२ वाजता लाल चौकात पोहोचले. यावेळी राहुल यांच्यासोबत त्यांची बहीण प्रियंका गांधी वाड्रा आणि इतर काँग्रेस नेते देखील उपस्थित होते.
लाल चौकात तिरंगा फडकवण्यापूर्वी काँग्रेस नेत्यांनी वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत गायले. त्यानंतर राहुल गांधी पुढच्या प्रवासाला निघाले. राहुल गांधी पुढे गेल्यानंतरही स्थानिक काँग्रेस नेत्यांनी लाल चौकात आनंदोत्सव साजरा केला.
३१ वर्षांपूर्वी भाजपने फडकवला होता तिरंगा
३१ वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन वरीष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी २६ जानेवारी १९९२ रोजी लाल चौकात तिरंगा फडकवला होता. यावेळी जोशींसोबत नरेंद्र मोदी देखील उपस्थित होते. भारतीय जनता पक्षाने तिरंगा फडकवण्याची घोषणा केल्यापासून काश्मीर घाटीमध्ये तणाव निर्माण झाला होता.
बारा विरोधी पक्ष सोमवारी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेच्या समारोप समारंभात सहभागी होणार आहेत. या समारंभासाठी २१ राजकीय पक्षांना आमंत्रित केले होते. परंतु त्यापैकी काही राजकीय पक्ष सुरक्षेच्या कारणास्तव या कार्यक्रमात सहभागी होणार नाहीत. यामध्ये तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, टीडीपीसह इतर काही पक्षांचा समावेश आहे.
राष्ट्रध्वजापेक्षा राहुल गांधींचे मोठे कटाऊट
राष्ट्रध्वज ज्या ठिकाणी फडकवला तिथे राहुल गांधी यांचे मोठे कटाऊट देखील लावले होते. हे कटाऊट राष्ट्रध्वजापेक्षा मोठे असल्याने सोशल मीडियावर राहुल गांधींना ट्रोल केले जात आहे. तसेच काँग्रेसने राष्ट्रध्वजापेक्षा राहुल गांधींचे मोठे कटाऊट का लावले असा प्रश्नदेखील सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे.