कंबोडियाचं अंकोर वाट

Story: प्रवास | भक्ती सरदेसाई |
28th January 2023, 10:44 Hrs
कंबोडियाचं अंकोर वाट

अंकोरची मंदिरं, ज्यांना काहीवेळा चुकून ‘अंकोर वाट’ मंदिरं म्हटलं जातं, (अंकोर वाट हे अंकोर पुरातत्व संकुलातील मंदिरांपैकी फक्त एक मंदिर आहे), एकत्रितपणे जगातलं सर्वात मोठं तीर्थक्षेत्र बनवतात. जवळजवळ एकशे साठ हेक्टर जमीन व्यापलेल्या या धार्मिक स्थळाला बघण्यासाठी जगभरून लोक येतात. या स्थळाला जर मी एक वास्तुशिल्पीय खजिना म्हटला तर ते वावगं ठरणार नाही. कंबोडियन इतिहास आणि मिथॅालॅाजीच्या कथा सांगणारी ही चिरस्थायी जागा जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक कशी काय नाही याचं मला नवल वाटतं. इथलं प्रत्येक देऊळ इतिहास तज्ञांना आणि विद्वानांना भूतकाळात घेऊन जातं. तेव्हाच्या गोष्टी सांगतं. आमच्या सारख्या इतिहासाचं ज्ञान नसलेल्या साध्या लोकांनाही आपल्या कथांनी मोहून टाकतं. 

आम्हाला एकूण तीन दिवस लागले ही जागा पूर्णपणे बघून घ्यायला. खरंतर तीन म्हणता येत नाही कारण पाहिला दिवस या हिशोबात धरता येत नाही. पहिल्या दिवशी साधारण दुपारी जेवण उरकल्यानंतर आम्ही सायकलिंग करत करत निघालो, येताना वाटेत समुद्र मंथन दिसलेल्या त्या जागेकडे थांबलो. कदाचित भर दुपारी इथे पोहोचलो असल्याने या ठिकाणी अजिबात गर्दी नव्हती. आत जाऊन फक्त फोटो काढले. कोणाचं देऊळ काय याची काहीच माहिती मिळाली नाही. देऊळ दिसायला तरी बुद्धाचं असेल असं वाटत होतं, पण आजूबाजूला मात्र हिंदू धर्मातील कथांमधली दृश्य मूर्तीरुपात दर्शवली होती. म्हणजे गेट कडे जय विजयही उभे होते. म्हणता म्हणता लक्ष गेलं देवळाच्या एका बाजूने उभारलेल्या भिंतीवर. एका पाठोपाठ एक फक्त भिंती बांधल्या होत्या. त्याही खूप उंच नव्हे. कदाचित माझ्या उंची एवढ्या उंच. जवळ जाऊन पाहिलं तर काय काय लिहिलं होतं. कदाचित नावं असावीत. “अरे सहस्त्र नामावली सारखं काहीतरी असेल यांच्या संस्कृतीत, नामस्मरणाकरता वापरत असतील या भिंती” मी आदित्यला छातीठोकपणे सांगितलं. मोनेस्त्ट्रीमध्ये जसे ‘प्रेयर ड्रम्स’ असतात त्यातलाच प्रकार वाटला मला. पण तिथून वळून निघालो आणि समोर मघाशी न दिसलेला बोर्ड उभा! त्यावर ठळक अक्षरात लिहिलं होतं- “कंबोडियन व्हिएतनामी वॅार मेमोरियल”. ज्याला आम्ही इतका वेळ देऊळ समजत होतो ते एक युद्ध स्मारक होतं. कपाळाला हात लावून आम्ही आमच्या या गैरसमजावर हसलो. आणि परत एकदा अंकोरच्या दिशेने निघालो.

अंकोरची देवळं एकीकडे आणि तिकिट काउंटर दुसरीकडे. अशी विचित्र व्यवस्था आहे इथली. अगोदर पेडल मारत मारत तिकिटं घ्यायला गेलो. तिथेही गर्दी. पंधरा वीस मिनिटं इथे गेली. मग परत पेडल मारत मारत, अंगातले त्राण संपत आल्यानंतर अंकुर वाटिकेत पोहोचलो. एव्हाना संध्याकाळ झाली होती. मग कुठे मिळतंय देवळात जायला. आम्हाला दारातच “आता एन्ट्री नाही” असं स्पष्ट भाषेत सांगितलं गेलं. इतका घाम गाळून पोहोचलो होतो, निदान देवळाच्या आजूबाजूला फिरून घेऊ म्हणत आम्ही तिथे उगीच रेंगाळलो. दुरूनच देवळाची फोटोग्राफी केली.

संध्याकाळ काजळत आली तशी, ‘सायकल चालवत परत जायचंय’ याचं भान ठेवून निघालो. पहिला दिवस इथे पोहोचेपर्यंतच वाया गेला होता हे लक्षात आलं. परत उद्या सायकल आणायची की नाही असा प्रश्न पडला. त्यात भर म्हणजे परतीच्या वाटेला ‘रस्त्यावर दिवे नाहीत’ हे ही लक्षात आलं. अंधारात सायकलला असलेली लाईट पेटवून आम्ही अंदाजे वस्तीच्या दिशेने निघालो. रस्ता सरळ होता म्हणून तेवढी भीती वाटली नाही. अधूनमधून एखादं वाहन आमच्या बाजूने जाई तेव्हा जरा प्रकाश पडे. मघाशी सुंदर वाटणारी घनदाट झाडी मात्र आता भीतीदायक वाटत होती. कधी कोणी प्राणी येईल नि आम्हाला गट्टम् करेल असा माझ्या मनात विचार घोळत होता. याच मनात मी रामरक्षाही घोळवत होते. एकाच वेळेला ‘भीती’ नि त्यावरचा ‘माझा उपाय’ अशा या दोन्ही गोष्टींचं मनात द्वंद्व सुरू असतानाच अचानक पाऊसाचे थेंब पडू लागले. आणि आता आम्ही चिंब भिजतोच असं वाटत असतानाच मागाहून एक रिक्षा येऊन थांबली. 

त्या रिक्षेवाल्याने स्वतःहून विचारलं “येता का?” आणि हा देवच धावून आल्याचा दावा मी करू शकते. कारण, आमच्या सायकल्स आम्ही त्याच्या रीक्षेत चाढवल्या आणि स्वतः बसतो तोच मुसळधार पाऊस कोसळू लागला. म्हणजे इतका जोरात की विचारू नका. समोरचं दिसेच ना. अशात आम्ही सायकल चालवूच शकलो नसतो. पण त्याने आम्हाला आमच्या हॉटेलकडे सावकाश नि सुखरूप पोहोचवलं. “गरज पडली तर बोलवा” म्हणत आपलं card आमच्या हाती दिलं. त्या दिवशी रात्रभर पाऊस पडला. आणि एकही क्षण असा नाही गेला जेव्हा मी मनोमन म्हटलं नसेन “देव पावला”. 

क्रमशः