माघी चतुर्थी

श्री गणेश हा विघ्नहर्ता आहे. सर्व दिशांचा अधिपती अशी त्याची ख्याती असल्याने काेणत्याही धार्मिक कार्याच्या प्रारंभी गणेश पूजन केले जाते.

Story: लोकसंस्कृती | पिरोज नाईक |
28th January 2023, 10:43 Hrs
माघी चतुर्थी

परमेश्वरावरील श्रद्धा वृद्धिंगत व्हावी, सुसंस्कारी पिढी निर्माण व्हावी हाच उद्देश मनाशी बाळगून पूर्वजांनी सण उत्सवांची निर्मिती केली. सणासुदीमुळे मन उल्हासित हाेते. रुसवे-फुगवे, भांडण-तंटे विसरुन सर्व कुटुंबीय एकत्र येतात. कुटुंब एकत्र आल्याने आचारविचारांची देवाणघेवाण हाेते. मतभेद, हेवेदावे नष्ट हाेऊन सण-उत्सवाच्या निमित्ताने आनंद उपभाेगता येताे. मन ताजेतवाने हाेऊन काेणत्याही कामात स्फूर्ती येते. कलांचा अधिनायक म्हणून ख्याती असलेला श्री गणेश बुद्धीची देवता म्हणून मान्यताप्राप्त ठरलेला आहे. म्हणूनच तर आपण गणेशचतुर्थीला गणेशमूर्ती पाच, सात, एकवीस दिवसापर्यंत ठेवून घेऊन त्याची मनाेभावे सेवा करताे.  या कला आपल्या अंगी याव्या म्हणून त्याची आराधना करताे. ईश्वराच्या कृपाप्रसादाने ज्याची निर्मिती झाली त्या निसर्गातील फुले, फळे, पत्री, भाज्या, रानभाज्या पारंपरिक अन्नप्रदार्थ तयार करुन श्री चरणी अर्पण करताे व आदरभावना व्यक्त करताे. 

हिंदू धर्मीयांचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचा जन्मदिवस माघ महिन्यातील शु. चर्तुर्थीला गणेश जयंती म्हणून साजरा केला जाताे. गाेव्यातच नव्हे तर भारत देशातील बहुतेक गणेश मंदिरातून हा सण माेठ्या उत्साहाने साजरा केला जाताे. श्री गणेश हा विघ्नहर्ता आहे. सर्व दिशांचा अधिपती अशी त्याची ख्याती असल्याने काेणत्याही धार्मिक कार्याच्या प्रारंभी गणेश पूजन केले जाते. गणेश जयंतीच्या दिवशी श्री गणेशाला पाळण्यात घालून पाळणा हलवतात. गाेड मंजूळ स्वरात पाळण्याच्या गीतांचे गायन केले जाते. गणेश मंदिरात सकाळपासून गणेशपूजन अभिषेक हवन, महाआरती, पालखी मिरवणूक निरनिराळे सांस्कृतिक कार्यक्रम आयाेजित केले जातात. गणेश पूजा पूर्ण हाेत नाही असे म्हटले जाते श्री गणेशाला जास्वंदीचे फूल व दूर्वा अतिशय प्रिय आहे. दूर्वा ही जळजळ कमी करणारी औषधी वनस्पती आहे. ज्यावेळी आगीच्या ज्वाळा ओकणाऱ्या अनलासूराला श्री गणेशाने गिळून टाकले त्यावेळी गणेशाच्या पाेटात आग आग हाेऊ लागली. ही आग शांत करण्यासठी ऋषीमुनींनी गणेशाला खाण्यासाठी दूर्वा दिल्या. त्याच्या डाेक्यावर, अंगाखांद्यावर दूर्वाच्या जुड्या करुन ठेवल्या. तेव्हा कुठे आग शांत झाली व देवांना आराम मिळाला. त्यावेळेपासून श्री गजाननाला दूर्वा खूपच आवडू लागल्या. भक्तजन गणेशाला दूर्वाच्या माळा करुन घालतात. 

मूषक हे विघ्नहर्त्या गणेशाचे वाहन आहे. एकदा गणपती आपल्या वाहनावर बसून त्रिभुवनात विहार करीत असताना चंद्राने पाहिले आणि एवढ्याशा मुषकावर एवढ्या माेठ्या पाेटाचा गणेश बसला आहे हे पाहून त्याला हसू आले. त्याने त्याची थट्टा केली आपली थट्टा चाललेली आहे ते पाहून श्रीगणेश क्राेधीत झाले त्यांनी तुला गणेश चतुर्थीच्या दिवशी काेणीच पहाणार नाही चुकून कुणाची नजर पडलीच तर त्याच्यावर चाेरीचा आळ येईल असा शाप दिला. लाेक भीतीने चंद्रदर्शन टाळू लागले यामुळे चंद्र अतिशय दु:खी झाला त्याने तपश्र्चर्या केली. श्री गणेशाने त्याला उ:शाप दिला. गणेश चतुर्थीच्या दिवशी तुझे दर्शन व्यर्ज असले तरी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी तुझे दर्शन घेतल्याशिवाय जेवणाऱ्याचे व्रत सफल हाेणार नाही. त्यामुळे संकष्टीचे व्रत करणारे भाविक चंद्राेदयानंतर चंद्र दर्शन घेऊन भाेजन ग्रहण करतात. विनायकी, संकष्टी प्रमाणेच मंगळवारसुद्धा गणेशाचा दिवस असल्याने गणेश मंदिरातून मंगळवार साजरा करतात. 

गणेश जयंतीला ‘माघी’ चतुर्थी असेही म्हणतात या दिवशी श्री गणरायाला तिळांच्या लाडवांचा नैवेद्य करतात. माेदक, लाडू, करंज्या हे आवडीचे पदार्थ महानैवेद्यात असतात.

खांडाेळ्याचा महागणपती, फाेंडा-फर्मागुडीचा गाेपाळ गणपती या मंदिरातून गणेश जयंतीच्या निमित्ताने दिवसभर कार्यक्रम चालू असतात. गाेपाळ गणपती मंदिरात पहाटे ५ वाजल्यापासून अभिषेक पूजाअर्चा, हाेमहवन यासारखे धार्मिक विधी असतात. दुपारी महाआरती, महाप्रसाद असताे. संध्याकाळी किर्तन व गणेश मूर्ती पाळण्यात घालून पाळण झुलवतात. व निरनिराळी पाळणा गीते गातात. रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयाेजन असते.