वैssनी वैssनी वेणी छान छान

Story: गजाल | गीता गरुड |
22nd January 2023, 12:15 Hrs
वैssनी वैssनी वेणी छान छान

बेबीचं दहावीपर्यंतचं शिक्षण निसर्गसंपन्न अशा नाटळ गावात झालं. बेबीच्या पुढच्या शिक्षणासाठी आत्याने तिला आपल्या घरी मुंबईला बोलावून घेतलं. बेबी कॉलेजची पाच वर्ष आत्याच्या सांगण्याबरहुकूम वागली. आत्याच्या घरातल्यांचीच नव्हे तर शेजारपाजाऱ्यांचीही मनं बेबीने जिंकली.

आत्याकडे राहून बेबीने अभ्यासासोबतच मुंबईतल्या चालीरीती, पावभाजी, बटाटेवडे, सुरळीच्या वड्या यांसारखे नवे पदार्थ शिकून घेतले. आत्याला खरंतर बेबीस सून म्हणून आपल्या घरातच सामावून घ्यायचं होतं. बेबी होतीच तशी लाघवी, प्रेमळ पण बेबीत नि आत्याच्या मुलात, रवीत आत्याला तसं काही आढळून येत नव्हतं. म्हणजे दोघं बोलायची, उठाबसायची, खेळीमेळीने वागायची खरी पण एकमेकांबद्दल प्रेमभावना वगैरे त्यांच्या नजरेत दिसत नव्हती.

आत्याने विचार केला, लग्नानंतरही होतंच की प्रेम. पूर्वी तर अक्षता डोक्यावर पडल्यानंतरच नवऱ्याचा चेहरा नवरीला नं नवरीचा चेहरा नवऱ्याला दिसायचा, त्यानंतर प्रेम वगैरे..तरीही व्हायचेच नं संसार..टिकायचीच नं लग्न. 

बेबीला आज संध्याकाळी याबाबत विचारायचंच असं तिने मनाशी ठरवलं नि बेबीच्या खोलीत गेली. बेबीला यायला तासभर होता खरा. बेबीच्या कपाटात सोनेरी केसांची बाहुली उभी होती. "खुळा चेडू, आजुनव भावलीचा नाद जाना नाय हेचा," आत्या स्वतःशीच म्हणाली. टेबलावर लायब्ररीतनं आणलेली कादंबरी होती. आत्याने ती सहज चाळायला घेतली तर एका दुमडलेल्या पानाच्या खाचीत आत्याला चिठ्ठी दिसली. आत्याने चिठ्ठी उघडली. प्रेमपत्र होतं ते बेबीला कुणी प्रमोद कुलकर्णी नावाच्या तरुणाने लिहिलेलं.

बेबीला नोकरीला लागून वर्ष झालं नव्हतं. कोण बरं असेल हा प्रमोद कुलकर्णी, आत्याला प्रश्न पडला. शेवटी बेबी तिच्या घरी रहायला असल्याकारणाने बेबीची जबाबदारी तिच्यावर होती. आत्याने आपल्या मुलाला रवीला ते पत्र दाखवलं तसा रवी हसला, म्हणाला.."आये, ह्या दोगांचा गुटरगू स म्हयने झाले चललाहा. माका सगळी खबर आसा नि तुका बेबल्या सून म्हनान व्हया असा ह्याव ठाऊक असा. पन तुया आता मनातल्या मनात पेढे खाना बंद कर आवशी."

रवीचं बोलणं ऐकून ती थोडी नाराज झाली पण स्वतःचीच समजूत घालत म्हणाली,"व्हय रे. माज्या मनात लाख आसला तरी तेका दुसरोच कोन पसंद असात तर तेच्या मनासारा जाव्दे."

आत्याने बेबीच्या आईवडलांना कळवलं. बेबीच्या वडलांनी सांगितलं,"तू मावळण आसस बेबीची. तुका चेडू नाय म्हनान की काय बेबीर न्हानपनापासना जीव वतलस. आता तेचा लगीनकार्य करूचा असा. तेचा तेनाच ठरवल्यान आसात तरी तू रवीक सांगान मुलाची खातरजमा करून घी. लेकीच्या आयुष्याचो प्रश्न असा."

रवीने प्रमोदची सगळी माहिती काढली. प्रमोद जळगावचा. प्रमोदचे आईवडील इकडे मुंबईत गेली चाळीस वर्षे वास्तव्य करून होते. प्रमोद साधासरळ मुलगा होता. उंची पाच फुट दहा इंच, सडसडीत बांधा, आईवडलांवर जीवापाड माया करणारा. बँकेत रोखपाल होता. प्रमोदची मोठी बहीण मात्र कायमची घरात रहाणार होती कारण ती मतीमंद होती. तसं बऱ्यापैकी स्वत:चं स्वतः आवरायची पण पस्तीशीची झाली तरी बुद्धी आठदहा वर्षाच्या मुलीएवढीच. 

रवीने प्रमोदच्या बहिणीचा विषय काढला तसं बेबी म्हणाली, "रवीदादा, माका त्या गोदीताईबद्दल माहिती असा. प्रमोदवांगडा लगीन करूचा म्हटलय तर प्रमोद येकलोच कसो गावात माका. तेची यवधाना ती माझी यवधाना होतली. तेचा कुटुम ता माजा कुटुम होतला. प्रमोद लग्नाक तयार होऊक मागी नाय हुतो तो हेच कारनान. मिया तेचे घरचो पत्तो मिळवलय. घराकडे जाऊन चवकशी केलय. गोदीताई बसलली भायर पोरांचो खेळ बघीत. दोन येण्या, परकरपोलको घातलल्यान. माका बघून वळख नसताना हसली, गोड हसली. निरागस, निर्व्याज हसू म्हनतत ना तसा तिच्या गालार दिसला माका. प्रमोदचे आईबाबा दोघव भली मानसा आसत. गोदीताईक माजीव भैन मानूचो मिया निश्चय केलय रवीदादा."

बेबीचं हे समजुतदारपणाचं बोलणं ऐकून आत्याने कौतुकाने तिच्या केसांवरनं हात फिरवला. आपली भाची केवळ वयानेच मोठी झाली नाहीय. तिने प्रेम केलय पण त्या प्रेमासोबत येणाऱ्या जबाबदाऱ्याही ती स्वीकारायला तयार आहे हे पाहून आत्याचं मन सुपाएवढं झालं. तिने दादाला फोन लावला, दादाला बेबीच्या होणाऱ्या सासरवाडीची सगळी माहिती पुरवली. बेबीच्या समजुतदारपणाबद्दल कौतुकाने सांगितलं नि म्हणाली, "बोलणी करूक, बस्तो बांधूक बेगीन येवा आता जोडीन."

बेबीने लाजत मावळणीला मिठी मारली. बोलणी झाली, बस्ता बांधला नि फेब्रुवारीत विधीवत लग्न झालं. बेबी सासरी नांदू लागली. तिने गोदीताईला आपलंस केलंन. गोदीताईपण कशी, तिची आई तिच्या वेण्या घालू गेली तर मान फिरवू लागली. कंगवा नि खोबरेल तेलाची बाटली घेऊन वैनी वैनी करत बेबीच्या मागे फिरू लागली. बेबीही अगदी सावकाशीने गोदीताईच्या केसातला गुंता सोडवून तिच्या वेण्या घालू लागली. वेण्यांच्या टोकांना रंगीत रिबीनींची फुलं बांधू लागली. नणंदाभावजयीचा वेणीफणीचा कार्यक्रम आवरेस्तोवर बेबीची सासू बेबीचा, रवीचा डबा भरून ठेवी. गोदीताई मग चाळभर फिरायची नं वेण्या हातांनी झुलवत म्हणायची, "वैनी..वैनी..वेणी छान छान."

एकदा दोन दिवसांसाठी बेबी आत्याकडे गेली. संकष्टी होती. आत्याने उकडीचे मोदक केले. भाचीला मायेने जेवू घातलं. दुसऱ्या दिवशी तिच्या आवडीचं तिसऱ्यांचं सुकं बनवलं. दुपारी बेबीची सासू गोदीताईसह हजर. म्हणाली, "दोन दिवस झाले गोदी वेणीफणी करून घेत नाहीए. एकच घोषा वैssनी वैssनी.. वेणी छान छान."

बेबीच्या आत्याने गोदीताईला व बेबीच्या सासूला जेवायला वाढलं. बेबीने स्वतःच्या हाताने गोदीताईला भरवलं. आपल्यासोबत झोपवलं. चारेक वाजले तसं तिला उठवून चहाखारी भरवली मग तिचे केस विंचरून दोन वेण्या बांधल्या व आत्याने तिच्यासाठी आणलेला मोगऱ्याच्या गजऱ्याचे दोन भाग करून एक गोदीताईच्या वेणीत माळला. स्वत:चं वेणीफणी केलेलं रुप आरशात पहात गोदीताई खुदकन हसली. कुरत्याला गोल फिरवत म्हणू लागली,"वैनी..छान..फुलू छान..वेणी छान छान.."

गोदीच्या आईच्या डोळ्यांतून दोन मोती ठिबकले. आता तिला गोदीच्या पुढच्या भवितव्याची चिंता नव्हती. बेबीची काळजी घेण्यासाठी तिचा धाकटा भाऊ प्रमोद होताच पण आता बेबीसारखी लाघवी वैनीही गोदीला लाभली होती.

समाप्त...