मकर संक्रांतीचा सण: आरोग्याच्या दृष्टिकोनातून

इंग्रजी नव्या वर्षाची सुरुवात झाली की, मराठी सणांनाही सुरुवात होते आणि त्यात सर्वात पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत. वसंत ऋतूचे आगमन आणि लांब, थंड हिवाळ्याच्या महिन्यांच्या समाप्तीचा हा दिवस. भूतकाळात झालेल्या कडू आठवणींना विसरून नव्याने त्यामध्ये तिळ आणि गुळाचा गोडवा भरून नात्याला सुरुवात करायची असे म्हटले जाते. म्हणूनच मकर संक्रांतीला ‘तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला’ असं म्हटलं जातं.

Story: आरोग्य । डॉ. श्वेता राऊत मुळगावकर |
20th January 2023, 09:50 pm
मकर संक्रांतीचा सण: आरोग्याच्या दृष्टिकोनातून

मकर संक्रांतीच्या सणात तिळ, गूळ आणि शेंगदाण्यांचा वापर करून प्रत्येक घरात सणाची मिठाई तयार केली जाते. पण फक्त सणाचा भाग म्हणून नाही तर हे आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहे. तिळ दिसायला लहान असला तरी त्यात पोषक तत्त्वांचा खजाना असतो. त्यात प्रथिने, कॅल्शियम, बी कॉम्प्लेक्स आणि कार्बोहायड्रेट इत्यादी असतात. हाडांची मजबूती असो वा केसांची समस्या सगळ्यांसाठी तिळ उपयुक्त ठरतो. तसेच गूळ आणि शेंगदाण्यांचा स्वभावही उष्ण असतो. म्हणजेच हे तिळ, गूळ आणि शेंगदाणे शरीराला ऊब देतात आणि शरीर निरोगी ठेवतात. चला तर मग आज जाणून घेऊया यांचे आरोग्यदायी फायदे.

तिळाचे फायदे

हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले- तिळात लोह, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सेलेनियम ही खनिजे असल्याने हृदयाच्या स्नायूंचे कार्य सुरळीत ठेवून मजबूत करतात. यामधील व्हिटॅमिन बी1 रक्तसंचरण व कोलेस्टेरॉलची पातळी सुधारतो. तिळात मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असते, ज्यामुळे उच्च रक्तदाब कमी होण्यास मदत होते. तिळाच्या बियांमधील लिग्नॅन्स, व्हिटॅमिन ई आणि इतर अँटिऑक्सिडंट्स रक्तवाहिन्यांमधील प्लेकचा संचय कमी करण्यास मदत करतात. त्यामधील सेसामोल अँटीऑक्सिडंट प्लेक तयार होण्यास प्रतिबंध करते व ओलिक ऍसिड शरीरात चांगले कोलेस्ट्रॉल वाढवते. काळ्या तिळाच्या बियांमधील सेसमिन व सेसमोलिन खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते.

मधुमेहावर नियंत्रण-तिळातील मॅग्नेशियम इंसुलिनची संवेदनशीलता सुधारते आणि रक्तातील ग्लुकोजची व स्टार्चची पातळी कमी करते. त्यामुळे मधुमेहींच्या आहारात तिळाचा समावेश करून साखरेची पातळी नैसर्गिकरित्या नियंत्रित करणे एक पर्याप्त ऊपाय ठरू शकतो. तिळाच्या सेवनाने शरीरातील एकूण फायबरची पातळी वाढविण्यात मदत होते. फायबर शरीराला साखर शोषून घेण्यापासून रोखते आणि शरीरातील ग्लुकोजच्या पातळीचा समतोल राखते. पचन प्रक्रियेत सुधार- तिळातील फायबरमुळे पचनप्रक्रियेस मदत होते, अतिसार किंवा बद्धकोष्ठतेची लक्षणे कमी होतात, कोलोनचे संरक्षण होते आणि आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाचे कार्य सुधारून आतड्यांसंबंधीच्या विकारांचा धोका कमी होतो. जास्त प्रमाणात फायबर खाल्ल्याने अनावश्यक भूक लागणे नियंत्रित होते.

मजबूत हाडांसाठी उपयुक्त- तिळात मुबलक प्रमाणात आढळणारे मॅंगनीज आणि कॅल्शियम दोन्ही मजबूत, निरोगी हाडांच्या विकासाला मदत करतात, संधिवात वेदना दूर करतात. हार्मोन प्रक्रिया, रक्तवाहिन्यांचे कार्य, स्नायू आकुंचन आणि न्यूरोन सिग्नलींगच्या कार्यातही कॅल्शियम महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

कर्करोगापासून बचाव- तिळामधील सेसमीन अँटी ऑक्सिडंट कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्याचे काम करते. ज्यामुळे ल्यूकेमिया, फुफ्फुस, पोट, प्रोटेस्ट, ब्रेस्ट कॅन्सर यांसारख्या कर्करोगावर हे परिणामकारक ठरते.

सौंदर्यासाठी उपयुक्त- तिळाच्या तेलामध्ये त्वचेसाठी आवश्यक असणारी सर्व पोषक तत्वे आढळून येतात. हे तेल लावल्याने जखम लवकर भरून येण्यास मदत होते. यासोबत दाट केसांसाठी, केस गळती थांबण्यासाठी, काळ्या केसांसाठी सुद्धा तिळाचे तेल फायदेशीर आहे.

गुळाचे फायदे:

गूळ रोगप्रतिकारक शक्ती वाढवणाऱ्या अनेक पदार्थांपैकी एक आहे. संक्रांतीच्या काळात गुळापासून अनेक स्वादिष्ट पदार्थ तयार केले जातात.

शेंगदाणासोबत गूळ खाल्ल्याने तृष्णेची समस्या दूर होऊ शकते. हेल्दी साखरेचा पर्याय म्हणून ओळखला जाणारा, गूळ तुपासोबत खाल्ल्यास पचनक्रिया सुधारण्यास मदत होते आणि बद्धकोष्ठता कमी होते. मासिक पाळीच्या वेदना व पीसीओडीमध्ये गूळ खूप उपयुक्त आहे. बडीशेपसोबत गुळाच्या सेवनाने प्लेक निर्मिती कमी होऊन, श्वासाची दुर्गंधी दूर होण्यास मदत होते. मेथीच्या दाण्यांसोबत गूळ खाल्ल्याने केसांचे आरोग्य सुधारते, केस मजबूत आणि चमकदार बनवते.

शेंगदाण्यांचे फायदे:

शेंगदाण्यामध्ये निरोगी चरबी, प्रथिने आणि चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक असलेल्या इतर पोषक तत्वांचा समावेश असतो. हे शरीरातील अतिरिक्त वजन काढून टाकण्यास उपयुक्त असते. यामुळे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारांचा धोकाही कमी होतो. मधुमेह, मासिक पाळीच्या समस्या आणि हार्मोनल विकारांवर देखील हा एक चांगला उपाय ठरतो. शेंगदाण्याच्या बिया बायोटिन, व्हिटॅमिन बी 1 आणि व्हिटॅमिन बी 6 ने समृद्ध असतात, ज्याच्या सेवनाने मुरुमे आणि केस गळणे टाळता येते. शेंगदाण्यातील उच्च प्रथिने आणि मोनोअनसॅच्युरेटेड फॅट शरीरातील कॅलरीज घटविण्यात मदत करतात व फायबरमुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो. शेंगदाण्यात तांबे, मॅंगनीज, फोलेट आणि फॉलिक ॲसिड भरपूर प्रमाणात असते, जे गर्भधारणेच्या आहारातील अनिवार्य घटक असते.