सोयरीक

बबन नि लताच्या लग्नाला नुकताच महिना होत आला होता. प्रेमाच्या गुलाबी वाटेवर ही दोन पाखरं उडत होती. बबनची आई सत्यवती तशी काटक होती. कामाला वाघ होती नि स्वभावाने खूप प्रेमळ होती. बबन्या तिचा लाडका झील आणि या लाडक्या झीलाची एकुलती एक बायको लता म्हणून लतावरही तिचा जीव होता.

Story: गजाल | गीता गरुड |
03rd December 2022, 09:08 pm
सोयरीक

सत्यवती, लतेला काही शिस्तीचं बोलली तरी लताला लागायचं मग लता मुसमुसायची. बबनला ती म्हणायची, "हयसर माझा जमुचा नाय. सासूबायंफुढे श्यानपन नाय."

बबन्या म्हणायचा, "गो तुका काय खाताहा का काय माझी आव्स का ढास मारता?"

लता म्हणायची, "तुमका नाय समजाचा ता. हिना उठ म्हतल्यान काय उठाचा नि बस म्हतल्यान काय बसाचा. मिया काय बाटलीतलो जीन आसय काय ही सांगात ती कामा करूक! नि आपले चेडवाक कशी चोबाळता. तिकाव वायच रीतीचे चार गोष्टी शिकवूचे तर नाय."

"आता तायग्यान काय केला तुझा? गो कालेजात शिकताहा ता बीए करताहा. तेचो अभ्यास तेका करूक नुको!"

"व्हय तर मोटे पदये घेतली. कांबरुनात मोबाईल घिऊन कायमाय टायपीत आसता. पळून गेली काय समाजतला."

"गो गो ताँड दिल्यान हा देवान म्हनान कायव बराळशीत. हडेचा तडे करून ठेवीन मुस्काट."

"माझा खोटा वाटता तर तेचो मोबाईल बघा."

बबन्याने आईला बाहेर बोलावलं, "आये, तायग्या खय गेला!"

"अभ्यास करताहा कवापासना. परीक्षा म्हयन्यार इली न्हय. जा गो लता, तायग्याक वायच काफी करून दी जा. पोरग्या शाप हडापलाहा. शीरा पडलो तो अभ्यास नाय पन खान्यापिन्याचीव सुद नाय पोराक. ता बोर्नविटा, कोम्प्लान टिवीत देखवतत तसला काय तरी हाड बाजारातसून. तेनी तरी फरक पडता काय बघतय."

लता कॉफी करायला जाता जाता पुटपुटली, "ह्या म्हंजे रोग येक नि ओकात दुसरा."

"गप बाय तुका करुची नाय तर तसा सांग. माज्या चेडवाक काय बोला नुको. तेच्यार जळपळू नको, सांगान ठेयतय."

लता नाक मुरडीत आत गेली. बबन्या हळूच तायग्याच्या खोलीत गेला. तायग्या व्हॉट्सेपवर कायमाय लव यू जानू सोनू मोनू टाईप करत होती. बबन्याने तिच्या हाततला मोबाईल काढून घेतला. तायग्याचं काहीही न ऐकता त्याने स्क्रोल करून मेसेज वाचले.

तायग्या रडू लागली.

सत्यवती आत आली, "तायग्या, तिनसानचा तुका रडाक काय झाला नि बबन्या तिचो मोबाईल रे कित्याक घितलस. दी तिका."

बबन्या म्हणाला, "आये, तुझ्या लेकीचो अभ्यास जोरात चललोहा पण पदवीचो नाय, तर पिरेमाचो. माझ्या मेव्हन्यावांगडा सूत जुळवना चललाहा मोबयलात."

इतक्यात लता कॉफी घेऊन आली. बबन्याचं बोलणं तिने ऐकलं. लताचा भाऊ फक्त बारावी पास होता. आता पदवीधर वहिनी मिळणार म्हंटल्यावर लताचा त्रागा कुठल्याकुठे पळाला.

"अय्या, खराच तायग्या. आमचो भाई नि तुझा.."

तायग्या रडतारडताच वहिनीकडे बघत गोड लाजली.

"येक पावट बोललस. परत असा बोलता कामा नये. तायग्या तूव व्हयता खूळ मनातना काढून टाक. हिचो भाव, सुमित फकस्त बारावी झालो हा. तुया आता पंधरावी होतलस. कसा जमतला तुमचा. उद्या सकाळी लोका हसतीत. तुझ्या मामाचो भाव वकीली करताहा. तुका सोन्याच्या हारांनी नि पाटल्यांनी मढवीत. घरची शेतीव धा एकर असा. हे लताच्या घराकडे काय हा!"

"आई.." असं बोलत लता स्फुंदत स्फुंदत आपल्या खोलीत पळाली.

तिच्यापाठना बबन्या जाईल तर आई, बायकोच्या ताटाखालचं मांजर म्हणणार म्हणून तो गप्प बसून राहिला.

रात्री लता एका कडेला कुशीने झोपली नि मेव्हणा, बहिणीच्या भानगडीत बबन्याचा उपवास झाला. साताठ दिवस असेच गेले. लता नि तिची सासू एकमेकींशी बोलिनाश्या झाल्या पण लताचं नि तायग्याचं गुळपीठ जमू लागलं. कोणी बघत नाहीएसं बघून लता तायग्याला आपल्या भावाचं गेरेज, त्याची हुशारी, मिळकत याबद्दल सांगू लागली. तायग्याच्या मनात रुजलेला प्रेमाचा अंकुर फुलवू लागली. 

रात्री मात्र अगदी ताठ होई, पोलीस सेल्युट करताना होतो तशी. बबन्याने लाख समजावून पाहिलं पण लता त्याला दाद देईना. बबन्याला काय रोजचे उपवास सहन होईनात. एकतर नवीन लग्न झालेलं. सारखं बायकोला कुशीत घ्यावसं त्याला वाटायचं. तिच्याकडे बघावं तर ती कोपऱ्यातल्या मारक्या म्हशीसारखा चेहरा करायची. आधीचं लाजणंलुजणं कुठल्याकुठं गायब झालेलं.

शेवटी बबन्या एकटाच सासरवाडला गेला. जावईबापू असे अचानक का बरं आले या विचाराने सासरेबुवा काळजीत पडले. सासूने चहापाणी आणून दिलं. सासरेबुवा नि बबन्या, तेंच्या गेरेजकडे गेले. बबन्याचा मेहुणा मन लावून काम करत होता. सासरे म्हणाले, "ह्यो माझो झिल म्हणजे लक्षुमी असा लक्षुमी. आख्खी पंचक्रोशी नावाजताहा हेका. टकलेत अभ्यास कवा रव्हलो नाय पन हे गाडयेचा शास्त्र बरा फिक्स केल्यान टकलेत नि हायवे पडल्याकारनान गाडयेंची कमी नाय."

दोघं घराकडे आले. बबन्याच्या सासूने जेवायला वाढलं. जेवणात खायचा वार नसल्याने बासुंदीपुरी नि बटाट्याची भाजी, कांदाभजी, गोडीडाळभात असा सगळा शिवराक बेत होता. बबन्याला दुधाची चायच नाक मिटून घोटावी लागायची त्यात ही वाडगाभरून काजू, बेदाणे घातलेली आटीव दुधाची बासुंदी. सासूबाईने एवढी जीव लावून केली, नाही तरी कसं म्हणायचं. त्याने आयडिया केली. डोळे मिटून गपकन सगळी बासुंदी गळ्यात लोटली.

 जावयाच्यासमोरचं रिकामं वाडगं पाहून सासूबाईचं मन सुपाएवढं झालं. आपल्या हातची बासुंदी जावयाला आवडली याचा त्या माऊलीस कोण आनंद झाला. तिने अजून वाडगाभर बासुंदी जावयाला वाढली. 

जावयाला नकोही बोलता येईना. ती तेवढी बासुंदी गळ्याखाली ढकलली तर आपण इथेच आडवे होऊ या विचाराने बबन्या केविलवाणा झाला. 

इतक्यात लाईट गेली. अंधार झाला, याचा फायदा घेत बबन्याने बाजूला बसलेल्या आशाळभूत मांजराला हळूच उचललं न त्याचं तोंड वाडग्याला लावलं. मांजराने दोन मिनटात वाटीतली बासुंदी चट्टामट्टा केली. तेवढ्या वेळात पुरी भाजी, डाळभात,भजी अक्षरश: गिळून बबन्या ताटावरनं उठला. ताट अगदी चकाचक. सासूबाई बत्ती तयार करून आणेस्तोवर लाईटबाई आल्या. 

शतपावली करताना बबन्याने सासरेबुवांच्या कानावर तायग्या नि मेव्हण्याचं प्रेमप्रकरण, आईला पदवीधरच जावई पाहिजे असणं याबाबत सविस्तर सांगितलं. सासरेबुवांनी मिशीचं टोक बोटांनी फिरवलं. जरा विचार केला मग म्हणाले, "जावयबापू, येक आयडीयाची कल्पना असा. आमच्या झिलाक डायरेक्ट शेवटच्या इयत्तेक बसवुया. जिच्यार पिरेम करतस तिच्यावांगडा लगीन जाव्क व्हया असात तर अभ्यास कर म्हनान सांगूया. झक मारीत करतलो."

बबन्याला सासऱ्याच्या डोक्यालिटीचं कौतुक वाटलं. त्याने घरी आल्यावर आईला सासरेबुवांच म्हणणं नीट समजावून सांगितलं.

"तसा असात तर इचार करूक हरकत नाय पन अगुदर माझ्या बायेची परीक्षा होऊन जावंदे." सत्यवतीने असा ग्रीन सिग्नल देताच इतका वेळ तिचं म्हणणं ऐकत असणाऱ्या लता नि तायग्याने एकमेकींना घट्ट मिठी मारली. 

त्या रात्री मात्र लता स्वतःहून बबन्याच्या कुशीत शिरली. बबन्याने तिच्या भावाची सोयरीक जुळवल्याने ती आता बबन्यावर जाम खूष होती.

समाप्त.