बँकॉकमधल्या शॉपिंगचा अनुभव

बॅंकॉक म्हटलं की शॉपिंग आलंच. संध्याकाळ आपल्यासोबत येताना शॉपिंगच्या भूतांना घेऊन येते. त्यांच्यासाठी खास नाईट मार्केटं उघडतात. या मार्केटांना अजूनही आकर्षित बनवण्यासाठी खास रोषणाई केलेली असते. वाटसरु ही चमक धमक बघून आपोआप इथे वळतो. आम्ही तर आधीच ठरवून इथे मुद्दाम मेट्रोच्या दोन लाईन्स बदलून आलो होतो.

Story: प्रवास | भक्ती सरदेसाई |
03rd December 2022, 08:59 pm
बँकॉकमधल्या शॉपिंगचा अनुभव

प्रथमदर्शनी गोव्याच्या हडफड्याच्या मार्केटसारखी वाटणारी ही मार्केटं खरंतर मुंबईच्या क्रॅाफर्डला टक्कर देणारी होती. मी अजूनही ‘सरोजनी’ पाहिलं नाहीये. पण कदाचित ते या मार्केटसारखं असावं. म्हणजे इथे काय नव्हतं ते विचारा. छोट्यातली छोटी वस्तू इथे सापडली असती आणि नुसती वस्तू सापडली असती नव्हे, तर तिची खास दुकानं इथे एका मागनं एक उभी सापडली असती. म्हणजे एखादी गल्ली म्हणा ना! एक पूर्णच्या पूर्ण गल्लीच जणू एखाद्या किरकोळ वस्तूसाठी राखीव ठेवली होती. 

मला एरव्ही शॉपिंग हा प्रकार आवडत नाही. तोही असा प्रवास करताना तर नाहीच नाही. वेळ वाया घालवल्यासारखं वाटतं. पण आदित्यच्या आग्रहास्तव मी इथे यायला राजी झाले होते. इथे आल्यावर मात्र स्वखुशीने पूर्ण मार्केट फिरले. अनेक गोष्टी हाताळल्या. पाहिल्या. परत ठेवल्या. शेवटी कपड्यांच्या दुकानात मात्र मला राहवलं नाही आणि मी तीन चार ‘टॉप्स’ घेतले. मऊसूत सुती कापड वापरून बनवलेले अस्सल कॉटनचे हे कपडे मी आजही वापरते. भरपूर वापर झाल्याने ते कधी दम तोडतील सांगता येत नाही. पण ज्या अर्थी इतके दिवस पुरले, त्याअर्थी अतिशय उत्तम दर्जाचे कपडे मला तिथे मिळाले असं म्हणायला हरकत नाही आणि एखाद्या गोष्टीचा पुरेपूर फायदा घेणं म्हणजे काय ते आज ह्यांना पाहून कळेल.

पुढे बॅग्सची गल्ली दिसली. तिथे वळलो. इथे इमिटेशनचा माल भरपूर. ‘calvin klein’ ऐवजी बरेचसे ‘kevin klein’ दिसले. ‘gucci’ ऐवजी ‘ducci’ इत्यादी इत्यादी. पण ‘हे’ नसून ‘ते’ असतं तरीदेखील मी काही खरेदी करणार नव्हतेच. ‘आपण दुसऱ्या देशात जातो ते काय या वस्तू पाहायला?’ माझ्या मनात विचार आला. नाही तरी बाजार फिरायची खास हौस नव्हती आणि आदित्यची हौस फिटली होती. त्यामुळे खाऊ गल्लीकडे वळलो. 

इथली खाऊ गल्ली एकदम खतरनाक! ठिकठिकाणी मीठ मसाला लावून लोंबकळत ठेवलेले साप, तडका लावलेले बेडूक, बरणीत मुरायला ठेवलेले रातकिडे वगैरे दिसले. हौशी खाणारा माणूस इथे पण रमला असता. हल्ली इंस्टाग्राममुळे माझ्याच ओळखितले बरेचसे थायलंडमध्ये फिरताना याही प्रकारच्या पाककृतींचा आस्वाद घेताना दिसतात. पण आम्हाला हे जमणार नव्हतं. आम्ही या जागेवरून पळ काढला.  आम्ही जगाच्या पाठीवर कुठेही गेलो तरीही सतत एखादी भारतीय खानावळ दिसते का या शोधात असतो. त्यामुळे दुसऱ्या देशातल्या निरनिराळ्या पदार्थांशी आमची ओळख नाही. थायलंडच्या या यात्रेत एकदा ‘थाई नूडल्स’ खाल्ले. ते देखील नीट घश्याखाली उतरले नाहीत. हे थाई नूडल्ससुद्धा भारतातच छान बनवतात अशी देशभक्ती आपापसात व्यक्त करून आम्ही मोकळे!

या मर्यादित रसनेंद्रियांमुळे आम्हाला बरेच ठिकाणी त्रास होतो. म्हणून हल्ली ‘ready to eat” पॅकेट्स घेऊन फिरावं लागतं. नशीब! ती सोय आहे. नाहीतर आम्ही प्रवासाचे सगळे दिवस फक्त मेयो लावलेला ‘ब्रेड अँड चिप्स’ असे सॅंडविच करून करून खाऊन घालवलेयत. घरी असताना तर कधी कधी या सॅंडविचची आठवणही येते. आम्ही ज्याला कोकणींत ‘रूच येतां’ म्हणतो ना तशी ही रूच आली की मग प्रवासाच्या आठवणी काढत काढत हा सँडविच खाल्ला जातो. हेच मिष्टान्न आणि हीच मेजवानी!

क्रमशः