दोघा अल्पवयीन मुलांकडून चोरलेली दुचाकी जप्त


03rd December 2022, 12:12 am
दोघा अल्पवयीन मुलांकडून चोरलेली दुचाकी जप्त

प्रतिनिधी। गोवन वार्ता             

म्हापसा  :   घरासमोर पार्क केलेली दुचाकी चोरी प्रकरणी म्हापसा पोलिसांनी दोघा पंधरा वर्षीय अल्पवयीन शाळकरी मुलांना ताब्यात घेतले व चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली.             

ही चोरीची घटना शुक्रवारी २ रोजी पहाटेच्या सुमारास घडली होती. संशयित अल्पवयीन मुलांनी गावसावाडा-म्हापसा येथील तक्रारदार गणेश साळकर यांच्या मालकीची जीए-०३ एएल-०८४८ या क्रमांकाची टीव्हीएस एन्टॉर्क ही दुचाकी चोरली. या दुचाकीची किंमत १ लाख रुपये आहे. तत्पूर्वी दोन दिवसांपूर्वी या दुचाकीची चावी गहाळ झाली होती. ही चावी संशयितांनीच चोरली होती व त्यानंतर त्यांनी दुचाकी पळवली.             

फिर्यादीने पोलिसांत तक्रार दाखल करताच म्हापसा पोलिसांनी वरील अल्पवयीन संशयितांना पकडून ताब्यात घेतले व दुचाकी जप्त केली. संशयितांना बाल न्याय मंडळासमोर हजर करण्यात आले असता त्यांना पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.             

या प्रकरणी पोलिसांनी भा.दं.सं.च्या कलम ३७९ व ३४ खाली गुन्हा दाखल केला आहे. प्रभारी पोलीस निरीक्षक सोमनाथ माजिक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आशिष पोरोब, महिला पोलीस उपनिरीक्षक विभा वळवईकर, हवालदार सुशांत चोपडेकर, कॉन्स्टेबल प्रकाश पोळेकर, अभिषेक कासार, आनंद राठोड, अक्षय पाटील यांनी ही कामगिरी केली.                     


हेही वाचा