वाचन संस्कृती

मागील लेखात भाषा विकासावर भाष्य करताना श्रवण व भाषण कौशल्याचा विकास आपण कशा पध्दतीने विचार करु शकतो यावर चर्चा केली. आज आपण वाचनाच्या विकासाकरीता काय करु शकतो ते पाहूया.

Story: पालकत्व | पूजा भांडारे कामत- सातोस्कर |
26th November 2022, 12:48 am
वाचन संस्कृती

वाचनाच्या माध्यमातून भाषेच्या विशाल पार्श्वभूमीबाबत तसेच त्यात दडलेल्या साहित्याबाबत कल्पना येते. अमर्यादित अशा या वाचनाच्या प्रक्रियेत हळूहळू प्रगती होत जाते, त्याप्रमाणे आपल्या ज्ञानकोषात भर पडत जाते. वाचनास कुठलाही आदी, अंत तसेच वयाची मर्यादाही नसते. करोनाच्या प्रभावाच्या आहारी गेलेल्या दोन वर्षात अनेक बदल झाले, त्यात सर्वात मोठा प्रभाव पडला तो मुलांच्या वाचनावर होय! जी सवय मोडली गेली, तिच सवय आता पुन्हा होण्याकरीता प्रयत्न करणे गरजेचे आहे. खालील मुद्द्यांचे पालन केल्यास आपण मुलांच्या मनात वाचनाची आवड निर्माण करु शकतो.

अक्षरांचे ज्ञान

वाचनाकरीता मुलांना सर्वात आधी अक्षरांचे ज्ञान तसेच त्या अक्षरांचे योग्य उच्चारण ज्ञात असले पाहिजे, तेव्हाच ते मूल योग्य पध्दतीने वाचन करु शकेल. त्यामुळे मुलांना अक्षरे आधी शिकवावी, त्या अक्षरांचे तसेच त्यांच्यापासून नवीन तयार झालेल्या शब्दांचे उच्चारण कसे करतात, ह्याचे ज्ञान मुलांना असावे. त्याकरीता लेखनाचा सराव महत्त्वाचा आहे, जेणेकरुन मुलांना वाचन करण्यास सोपे होईल.

वर्तमानपत्र, मासिकांचे वाचन

वाचनाची सवय मुलांना लावताना, त्यांना सर्वात आधी घरातील वर्तमानपत्र दर दिवशी वाचावयास सांगावे. शाळेत प्रार्थनेच्या वेळी मुले नक्कीच वाचत असतील, पण त्यात केवळ ठळक बातम्यांचा उल्लेख असतो. म्हणूनच मुलांना संध्याकाळी वर्तमानपत्र देऊन त्यांच्या वाचनाचा सराव घ्यावा. वर्तमानपत्र दररोज वाचले, तर मुलांना लहान वयापासूनच सामान्य ज्ञान मिळेल तसेच वाचनाची सवय होईल. दररोज वाचनाचा सराव होईल. शब्दांचे उच्चार सुधारतील. वर्तमानपत्र, मासिके, वेगवेगळे अंक मुलांना वाचावयास सांगावे.

वयोमानानुसार वाचन

मुलांना बालपणापासूनच वाचनाची सवय लावणे गरजेचे असल्यामुळे त्यांना त्यांच्या आवडीची पुस्तके आणून द्यावीत. पण पुस्तकांची निवड विचारपूर्वक केले पाहिजे. मुलांच्या वयाप्रमाणे त्यांची आकलनशक्ती विकसित होते, लहान मुलांना जी पुस्तके वाचनाकरीता मिळतील, ती पुस्तके मुख्यत: मुलांच्या विचारक्षमतेला अनुसरुन असावी. त्यात लहान मुलांकरीता सोपे सोपे त्यांना सहजरित्या आकलन होईल असे शब्द, अशी भाषा, साधे सरळ वातावरण असावे. लहान मुलांच्या हातात दिलेल्या पुस्तकात छान छान गोष्टी, चित्रे, कविता, ह्यांचा समावेश असावा. जर त्यांना बालपणातच जोडाक्षरे असलेली पुस्तके वाचण्यास दिली, तर त्यांना वाचनाची प्रक्रिया नक्कीच कठीण भासेल. व असेही होऊ शकते की मूल इतर कुठलाही विचार न करता वाचनाचा विचार कायमचा मनातून सोडून देईल तसेच वाचनासाठी मुलाच्या मनात रुची निर्माण होईल. त्यामुळेच मुलांचे वय लक्षात घेऊन त्यांना पुस्तके दिली तर आपणो मुलांमध्ये वाचनाची ओढ निर्माण करु शकतो.

 मौन / प्रकट वाचन

आपण जे वाचन करतो, त्याचे दोन प्रकार असतात. मौन वाचन व प्रकट वाचन या दोन प्रकारांपैकी, काही जण मौन वाचन आत्मसात करतात, तर काही मूलांना प्रकट वाचनाची सवय असते. मौन वाचन म्हणजेच मनातल्या मनात वाचन करणे, व प्रकट वाचन म्हणजेच मोठ्या आवाजात वाचणे होय. मुलांमध्ये वाचनाची सवय विकसित व्हायला हवी, तर बहुतेक मुलांनी प्रकट वाचनाची सवय लावून घ्यावी. ज्यावेळी आपण मोठ्या आवाजात वाचन करतो, त्यावेळी आपल्या मुखातून झालेला शब्दांचा उच्चार, कर्णद्रियांच्या (कानांच्या) माध्यमातून मेंदूपर्यंत पोहोचतो व आपल्याला अधिक काळाकरीता आठवण राहते. ह्याउलट मौन वाचन करत असताना अनेक अडथळे येतात. मौन वाचनात उच्चारण होत नसते, त्यामुळे मन एकाग्र करुन वाचणे महत्त्वाचे असते. व मन एकाग्र करणे सहजरित्या साध्य होण्यासारखी गोष्ट नाही. कारण, आपल्या मनात निरंतर विचारांचा प्रवाह चालू असतो. चहूदिशांनी आपले मन विचारांनी वेढलेले असते. त्यामुळे मध्येच आपले ध्यान भंग होऊ शकते. म्हणूनच प्रकट वाचनाच्या माध्यमातून आपले व्यवस्थित वाचन होते व आपले उच्चारण सुधारते. नियमितपणे प्रात:काली, प्रकट स्वरुपात वाचन करायची सवय असली पाहिजे, ज्यामुळे अभ्याससुध्दा अगदी योग्य पध्दतीने होतो.

सारांश कथन

मुलांच्या मनात वाचनाची गोडी निर्माण करण्याकरीता शाळेत शिक्षक वेगवेगळे उपक्रम राबवू शकतात. जसे की पुस्तके वाचण्याकरीता वाचनालयाशी संबंधित एक अर्ध्या तासाचा वेळ मुलांना देऊन, त्यांना वाचनालयातील विविध त्यांच्या आवडीची पुस्तके आणून द्यावीत किंवा मुलांना वाचनालयात न्यावे. त्यांना कुठलीही गोष्ट वा प्रसंग वाचल्यानंतर त्या साहित्याचा सारांश सांगण्याकरीता प्रेरीत करावे. सारांश ऐकल्यानंतर त्या मुलांना इतरांना साहित्यावर आधारित प्रश्न विचारण्यास प्रोत्साहन द्यावे. किंवा प्रार्थनेच्या वेळी एक छोट्याशा नाट्याच्या माध्यमातून आपण मुलांना वाचनाचे महत्त्व पटवून देऊ शकतो.

प्रोत्साहन

मुलांना वाचनाकरीता प्रोत्साहन मिळणे सर्वप्रथम गरजेचे आहे. माणूस म्हटल्यानंतर चूका या कधीकधी होणारच. वाचनाच्या बाबतीतसुध्दा मुले चुका करणारच. शब्दांचे चुकीचे उच्चारण करणे, शब्द अर्धवट व तुटक तुटक वाचणे, वाक्यातील विरामचिन्हे गाळणे, वाचण्याची गती कमी जास्त होणे अशा अनेक चुका मुलांकडून होण्याची संभावना असते. पण या छोट्याछोट्या चुकांमुळे आपण मुलांना सांभाळून घेतले पाहिजे, समजून घेतले पाहिजे. जर कुठल्याही चुकीमुळे आपण मुलांवर रागावलो, वा तुला हे वाचायला जमणारच नाही असे जर त्यांना सांगितले तर मुले निराश होऊन वाचन सोडून देतील. त्यांची आवड टिकवणे हेच आपले ध्येय आहे. 

नेहमीच स्मरण ठेवा, आपणच असतो आपल्या मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे शिल्पकार.