एक होती श्रद्धा..!

आरुषी तलवार हत्याकांड, निर्भया बलात्कार प्रकरण यासारख्या काळीज पिळवटून आणि डोकं भंडावून सोडणाऱ्या घटनांनंतर श्रद्धा वालकर हत्याकांडाने पुन्हा एकदा राजधानी दिल्ली पेटून उठली आहे. १८ मे २०२२ रोजी केलेल्या या अत्यंत घृणास्पद कृत्याची माहिती इतके महिने लपवून ठेवण्यात आरोपी यशस्वी झाला.

Story: प्रासंगिक | अॅड. पूजा नाईक गांवकर |
19th November 2022, 10:36 pm
एक होती श्रद्धा..!

आरोपी आफताबने अत्यंत शिताफीने पूर्वनियोजन करून प्रथम प्रेम नंतर संशय, विश्वासघात आणि निर्घृण हत्या अशा क्रमाने केलेल्या ह्या रक्तरंजित हत्याकांडाला दडवण्याचे पुरेपूर प्रयत्न केले, यात काडीमात्र शंका नाही. परंतु गुन्हा कधीही लपून राहत नाही म्हणतात, हेच खरे! आश्चर्य म्हणजे, आपण एखाद्याचा खून केला आहे, दिवस रात्र आपण मृताच्या शरीराच्या जीवंत तुकड्यांसोबत राहत आहोत, या विकृतीचा साधासा लवलेशही त्याच्या तोंडावर नव्हता. या घटनेला जसा ‘लव जिहाद’चा रंग देऊन विषय भरकटवला जातोय त्याचप्रमाणे अनेक वर्षांपासून सामाजिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या समाजाला भेडसावणाऱ्या गोष्टींकडे कानाडोळा केला जातोय असेच आतापर्यंत दिसून आले आहे.

 ‘लव जिहाद’..! नेहमी धर्माचा बाऊ का?

हिंदू मुलगी आणि मुस्लिम मुलाच्या प्रेमप्रकरणाला नेहमीच ‘लव जिहादचे’ नाव देऊन अशा भयानक हत्याकांडांना राजकीय आणि धार्मिक रंग चढवणे न्यायाच्या आणि समाजाच्या विकासाच्या दृष्टीने घातकच! मुळात ‘लव जिहाद’ हे जबरदस्तीने केलेल्या धर्मांतराचे रुपक आहे. ह्या हत्याकांडाच्या बाबतीत मात्र दररोज उघडकीस येणाऱ्या माहितीत धर्मांतराचा मुद्दा कुठेच प्रतिबिंबित होताना दिसत नाही. श्रद्धा वालकर हत्याकांडाने १२ वर्षांपूर्वी देहरादूनमध्ये घडलेल्या अनुपमा गुलाटी हत्याप्रकरणाच्या आठवणी पुन्हा ताज्या केल्या. गुलाटी हत्याप्रकरणात पीडितेच्या पेशाने सॉफ्टवेयर इंजिनियर असलेल्या नवऱ्याने तिच्या शरीराचे ७२ तुकडे करून अश्याचप्रकारे फ्रीजरमध्ये ठेवून अनेक महिने त्या तुकड्यांची विल्हेवाट लावण्यात घालवले. डिसेंबर २०१० मध्ये जेव्हा हे हत्याकांड उघडकीस आले तेव्हा समाजात थरार उठला. दिल्लीतील ‘तंदूर हत्याकांड’ प्रकरण, आरोपी सुरिन्दर कोली, चंद्रकांत झा, राजा कोलंदर आणि अशा इतर कितीतरी नोंदणी झालेल्या आणि न झालेल्या प्रकरणांत कुठल्याही धर्माचा कधीही मुद्दा उठला नाही पण श्रद्धा हत्याकांड प्रकरणात बाकीचे महत्त्वाचे मुद्दे बाजूला सारून फक्त ‘लव जिहाद’चा मुद्दा डोक्यावर घेणे बरोबर नाही. या अनुषंगाने विचार करता, असे घृणास्पद कृत्य करण्यास धर्म, शिक्षण, हुद्दा नाही तर केवळ विकृती कारणीभूत ठरते, हेच स्पष्ट होते.

 ‘रेड फ्लेग्स’.. धोक्याची घंटा नाही, गजर

श्रद्धा हत्याकांड प्रकरणातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे, पीडित मुलगी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायला लागल्यापासून तिच्यावर मानसिक, शारीरिक अत्याचार केले जात होते. महत्त्वाचे म्हणजे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असूनही मानसिक, भावनिकदृष्ट्या ती तिच्या प्रियकरावर अवलंबून होती. कितीही आणि कुठल्याही थराची भांडणे झाली तरी केवळ ‘प्रेमाच्या अंध चष्म्यातून’ श्रद्धा हे नाते पाहत राहिली आणि म्हणूनच हुशार, कर्तबगार आणि स्वावलंबी श्रद्धावर काळाच्या पडद्याआड जाण्याची वेळ आली, असेच म्हणावे लागेल. या प्रकरणात असे समोर आले आहे की दोघेही एकत्र राहत असले तरीही दोघांचा एकमेकांवर अजिबात विश्वास नव्हता. एकमेकांकडे सतत जीपीएस लोकेशन आणि आजूबाजूचे फोटो मागून ते शंकेचे निरसन करून घेत होते. असले छोटे-मोठे प्रकार धोक्याची घंटा वाजवत होते, पण त्यांच्याकडे श्रद्धाने दुर्लक्ष केले. आजही कित्येक मुली, महिला नात्यातील अशा धोकादायक पैलूंकडे कानाडोळा करून नाते निभावून नेण्याचा फसवा प्रयत्न करतात. यामध्ये प्रेम नसते तर हा निव्वळ मूर्खपणाच ठरतो. नात्यात एकमेकांना सांभाळून, सावरून घेणे अपेक्षित असते पण किती सांभाळून घ्यायचे आणि कुठे, कधी, केव्हा थांबायचे हे ठाऊक असणेही तितकेच गरजेचे आहे. भारतात ही परिस्थिती जास्त भयावह वाटते. सी.एस.आर. जर्नलमध्ये प्रसिद्ध झालेल्या एक अहवालानुसार, ‘प्रगतीपथावर चालणाऱ्या भारतातील ४०% महिलांना घरगुती हिंसाचारात काहीही वावगे वाटत नाही’, ही परिस्थिती किती भीतीदायक आहे! अशा विचारांची पाळं-मुळं समाजात अनेक वर्षांपासून रुजलेली आहेत. पण वेळीच अशा धोक्याच्या गजराने सावध न झाल्यामुळे आणि गपगुमान सहन करत राहिल्याने अशा घाणेरड्या विकृतीला खतपाणी मिळते. पर्यायी जीव गमावण्याची वेळ येऊ शकते, हे लक्षात घेणे आवश्यक आहे. प्रेमाची व्याख्या सुरुवातीला स्पष्ट समजून घेणे महत्त्वाचे आहे. चित्रपट अथवा मालिकेत दाखविल्या जाणाऱ्या अवास्तव प्रेमाची वास्तविक रूपरेषा आखणे गरजेचे आहे. आपण करत असलेले आणि आपल्याला मिळत असलेले ‘प्रेम’ हे मुळात कसे आहे हे डोळसपणे पाहणे आवश्यक आहे. ‘उंच माझा झोका’ म्हणत प्रत्येकीने आकाशात उंच उडावे पण कोणालाही, कुठल्याच प्रकारे, स्वतंत्रपणे उडणाऱ्या पंखांना पिंजऱ्यात बंदिस्त करण्याचा अधिकार देऊ नये.

 जनरेशन गॅप की पिंजऱ्यात अडकलेले स्वातंत्र्य?

‘बंबल’ या डेटींग अॅपवर ओळख झाल्यानंतर श्रद्धा आणि आफताब एकत्र लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहत होते. तिच्या घरच्यांना हे समजले तेव्हा त्यांनी विरोधही दर्शवला. पण या विरोधाला न जुमानता श्रद्धाने घरच्यांपासून मानसिक, भावनिकदृष्ट्या दूर राहणे पसंत केले. आई वडील आणि मुलीच्या नात्यात फूट पडली, तेव्हाच आफताबच्या मनसुब्यांना खऱ्या अर्थाने आधार मिळाला, असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही. जीवनाचा ज्वलंत आणि जीवंत अनुभव घेण्याच्या नादात श्रद्धाचे स्वातंत्र्य कधी पिंजऱ्यात बंदिस्त झाले हे ही तिला समजले नाही. बऱ्याचदा आई-वडिलांच्या म्हणण्याकडे मुलं कानाडोळा करताना आपल्याला सर्रास आढळतात. आपणही ‘जनरेशन गॅप’चे लेबल लावून याकडे फारसे लक्ष देत नाही. पण हा नात्यांतील भावनिक, मानसिक तिढा सोडवून नाते सुंदर बनविण्याकडे आपला कल असला पाहिजे. जुन्या पिढीचा अनुभव, प्रगल्भता आणि नवीन पिढीचा दृष्टिकोन एकमेकांशी जोडून नवीन नात्याला जन्म देण्याचे प्रयत्न प्रत्येक घरातून व्हायला हवेत. दोन पिढ्यांमधील विचारांची दरी सर करण्यासाठी समज आणि स्वीकृतीचा पूल बांधणे काळाची गरज बनलेली आहे.

 तंत्रज्ञानाचा भडिमार

तंत्रज्ञानाचा आजच्या पिढीवर किती प्रभाव आहे, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे हे हत्याकांड. ‘बंबल’ या डेटींग अॅपवर सुरू झालेल्या या प्रेमप्रकरणाचा शेवट ‘डेक्सटर’ या वेबसिरीजने झाला. या वेबसिरीजमध्ये दाखविल्याप्रमाणे आरोपीने श्रद्धाच्या शरीराची विल्हेवाट लावण्याची कल्पना काढली. अशाप्रकारच्या वेबसिरीज, ‘क्राईम पॅट्रोल’, ‘सी.आई.डी.’ यासारखे कार्यक्रम खरंतर समाज प्रबोधनासाठी केले जातात. पण त्यांचा अशारीतीने झालेला गैरवापर पाहून ‘सोशल मीडिया’चा वापर करताना जास्त सावध आणि सजग राहणे खूप गरजेचे आहे. आजकाल ‘फेक प्रोफाईल’द्वारे लोकांना फसविण्याचे प्रकार सर्रास वाढलेले दिसून येतात. ‘पब्लिसिटी’, ‘ग्लॅमर’ यांच्यामागे धावणारी तरुण पिढी अशा घटनांची सहज शिकार ठरते. त्यामुळे सोशल मीडिया व महाजाल वापरताना, आपली वैयक्तिक माहिती कोणत्याही आडपडद्याविना जगासमोर आणताना, त्याचे भविष्यात काय पडसाद उठू शकतात यावर प्रत्येकाने थोडा विचार करणे आवश्यक आहे.

 ‘लव जिहाद’ विरोधी कायदा की कुबड्या?

या प्रकरणानंतर, उत्तर प्रदेश सरकारने २०२० साली लागू केलेल्या ‘बेकायदेशीर धर्मांतरण अध्यादेशाची’ जोरात चर्चा होऊ लागली आहे. या कायद्यांतर्गत बेकायदेशीर आणि जबरदस्तीने केलेल्या धर्मांतरांना आळा घालण्यासाठी उत्तर प्रदेश सरकार अनेक खटाटोप करत आहे. स्वेच्छेने धर्मांतर करायचे असल्यास त्याची कल्पना जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांना दोन महिने अगोदर देणे आवश्यक आहे. अध्यादेश लागू झाल्यापासून आजवर १०८ जबरदस्तीने झालेल्या आणि होऊ घातलेल्या धर्मांतरांच्या घटनांची या कायद्यांतर्गत नोंदणी झाली आहे, हे एकून अंगावर काटा आला नाही तर नवल! या कायद्यातील तरतुदीप्रमाणे, २०१७ मधील घटनेत आरोपी ठरलेल्या महम्मद अफजल नावाच्या युवकाला पहिल्यांदाच १० वर्षांच्या कारावासासह ३० हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. अध्यादेशाचे स्वरूप पाहता उत्तर प्रदेश सारख्या राज्यात त्याची गरज आहे हे जाणवते. पण इतर राज्यांत अशा स्वरूपाचा कायदा करताना सामाजिक परिस्थिती आणि बांधिलकीचा स्वतंत्रपणे विचार करणे शहाणपणाचे ठरेल. ‘अमुक एका राज्यात तमुक एक कायदा अंमलात आणला म्हणून आपणही तसेच करणे अपेक्षित आहे’, असे म्हणून डोळे बंद करून असे कायदे लागू व्हायला लागले तर समाजावर त्याचे किती घातक परिणाम होऊ शकतात याचा विसर पडून चालणार नाही. कितीही कठोर कायदे केले तरीही बेकायदेशीर धर्मांतरांचे प्रकार पूर्णपणे रोखणे लोकशाही जीवंत असलेल्या देशाला शक्य होणार नाही. फक्त कायदा समाजकल्याणासाठी केला जातोय की कायद्याच्या नावाने समाजाच्या हातात कुबड्या दिल्या जातायत याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.

हत्याप्रकरणानंतर आरोपी आफताबचा एकंदरीत वावर बघता त्याने असे कृत्य यापूर्वीही पचवले असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्या दिशेने पोलीस तपास होणेही आवश्यक आहे. आफताबचे वकील त्याची बाजू मांडताना आरोपी मनोरुग्ण असल्याचा दाखला सादर करण्याची दाट शक्यता आहे. त्यादृष्टीनेही तपासाची दोरी घट्ट पकडणे आवश्यक आहे. येत्या काही दिवसांत ‘नार्को टेस्ट’मुळे या प्रकरणातील अनेक कंगोरे समोर येतील. पण तोपर्यंत हे प्रकरण वेगळ्याच दिशेला भरकटू नये, एवढे मनापासून वाटते. श्रद्धा हत्याकांडातून आजच्या पिढीने आणि प्रामुख्याने महिलांनी शिकण्यासारखे खूप काही आहे. सध्याची शिक्षणप्रणाली बौद्धिकदृष्ट्या सक्षम करते पण भावनिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी पुस्तकी ज्ञान देत नाही. भावनिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम नसलेली व्यक्ती आयुष्याच्या परीक्षेत कधीच जिंकू शकत नाही. प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्याचे निर्णय घेण्याचे निश्चितच अधिकार आहेत पण त्या निर्णयांचे काय आणि कसे पडसाद उमटतील हे पाहताना ‘श्रद्धा’ नावाचे उदाहरण काळजात कोरून ठेवणे आवश्यक आहे.