व्यक्त व्हायला शिका

Story: मर्मबंधातली ठेव । कविता प्रणीत आमोणक� |
18th November 2022, 11:19 pm
व्यक्त व्हायला शिका

आपले मत योग्य ठिकाणी मांडणे ही कला आहे. आपण सध्या स्पर्धात्मक युगात राहत आहोत. त्यामुळे आपले जगणे हे तणावपूर्ण होऊ शकते. आपल्या सभोवतालच्या परिस्थितीमध्ये रोज नित्य नवे बदल होत असतात. या बदलाचा सामना करताना त्याचा परिणाम आपल्या मनावर नक्कीच होत असतो. आपल्या आजूबाजूला होणारे परिस्थितीतील बदलाव किंवा घटना आपल्या हातात नसल्या तरी या बदलत्या घटनांना आपल्याला सामोरे जावे लागते. आजूबाजूला घडणार्‍या अनेक घटना आपल्याला आपले विचार बदलायला भाग पाडतात. या घटनांना सामोरे जाताना आपल्या मनाची अनेकदा घालमेल होते. मनाचा कोंडमारा होतो. आशा वेळेस आपण आपले विचार, आपल्या मनातील भावना व्यक्त करायला हव्यात, जेणेकरून आपले मन साफ राहील व मनातील विचारांचा साफ निचरा होईल.

समाजात मिळून मिसळून राहणे ही काहींची आवड असते. समाजात किंवा विश्वात जे काही ज्वलंत प्रश्न आहेत, त्याच्यावर किंवा समाजातील ताज्या घडामोडींवर विविध मुद्यांवर चर्चा करायला काहींची पसंती असते. असे व्यक्तिमत्त्व असलेली माणसे समाजाबद्दल जागरूक असतात. समाजात चाललेल्या प्रत्येक घडामोडींवर त्यांची बारीक नजर असते. जरा कुठे काही गैरप्रकार चाललेला असू वा कुठे कोणावर अन्याय होत असलेला असू. प्रत्येक घटनांवर त्यांची सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे नजर असतेच. अशा संशायास्पद गोष्टी कुठे घडत असल्या, तर अशा व्यक्ती एफबी, व्हाट्सअप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियाद्वारे आपले मत प्रदर्शित करत असतात. या सोशल मीडियावर मग त्यांनी मांडलेल्या विचारांवर अनेक जण आपली उलट सुलट प्रतिक्रिया देत असतात. विषय जर गंभीर असेल, तर सोशल मीडियाच्या चर्चेला उधाण येते. प्रत्येक जण आपली प्रतिक्रिया तिथे नोंदवत असतो. त्यामुळे अशा चर्चेद्वारे ही समाजातील लोकांची मनस्थिती कशी आहे, त्यांचे विचार काय आहेत, याचा अंदाज येत असतो. असे जरी असले, तरी कित्येक जण आपले मत जाहीरपणे व्यक्त करत नाहीत. उगाच कशाला फुकटाच्या वादात पडा? किंवा आपल्याला काय करायचेय आपले मत नोंदवून? आपल्या मतामुळे काय ही परिस्थिती थोडीच बदलणार आहे? किंवा कशाला या नसत्या फंदात पडा? अशी मानसिक वृत्ती असेलल्या व्यक्ती सहजा आपले मत कधीच कुठेही व्यक्त करत नाहीत. सोशल मीडियावर तर सोडाच, पण घरात जेव्हा एखाद्या विषयावर चर्चा चाललेली असते, त्यात ही या अशा व्यक्ती चर्चेत भाग न घेता मख्खपणे आपले नित्याचे काम करत असतात. त्यांना ना कोणाचे देणे लागते, ना कोणाचे घेणे. आपण या देशात, समाजात, कुटुंबात राहतो, तेव्हा आपल्यालाही यांच्याशी काही देणे लागते. ही वृत्ती आता लोप पावत चालली आहे. रोजच्या जीवनाच्या धावपळीमध्ये अनेक प्रश्न उद्भवत असतात. तो जीवनाचा एक भागच आहे. जिथे काही प्रश्न नाहीत, असे कधी होऊच शकत नाही. चार माणसे एकत्र आली की चर्चा, वाद-विवाद, संभाषण, गप्पा हे प्रकार ओघाने आलेच. अनेक विषयांवर अशा वेळी चर्चा होत असते. नेहमी अशा संभाषणामध्ये किंवा चर्चेमध्ये भाग घ्यावयास हवा, असे नाही. परंतु आपल्या आवडीच्या विषयावर किंवा समाजात चाललेल्या एखाद्या ज्वलंत प्रश्नावर वाद-विवाद किंवा चर्चा होणे गरजेचे आहे. आपले मन ही अशा वेळेस मोकळे होते. अनेकांशी संवाद साधल्याने मनाची विचार करण्याची कुवत वाढते. आपल्या बुद्धीला अनेक विचारांचे खाद्य मिळते. त्यामुळे आपल्या विचारांनाही पालवी फुटते. विचारांची प्रगल्भता वाढते. अशा चर्चेत भाग घेतल्याने अनेकांचे विचार समोर येत असतात. त्यामुळे एकाच विषयाकडे अनेक दृष्टिकोनातून पाहता येते. एकाच विषयाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. पण प्रत्येकाच्या मनातील विचार समोर आल्याने एकाच विषयाकडे विविध नजरेने बघण्याची वृत्ती वाढीस लागते. आपल्या मेंदूला विविध विचारांचे खाद्य मिळाल्याने आपला मेंदूही प्रगल्भ होत जातो. आपल्या विचार व तर्क करण्याच्या क्षमतेत वाढ होते.

समाजात कधी कधी ज्वलंत प्रश्न धुमसत असतात. सोशल मीडियाच्या माध्यमाद्वारे जगाच्या कुठल्याही कानाकोपर्‍यात घडलेली बातमी क्षणार्धात आपल्यापर्यंत पोहोचते. या बातम्यांमुळे, घटनांमुळे आपल्या मनात विचारांची वादळे उठत असतात. अशा काही घटनांबाबत आपल्या मनात तीव्र विचारांची वादळे निर्माण होतात. या विचारांच्या गर्तेत गुरफटून न जाता, मनात कुढत न राहता कुठेतरी, कोणाकडे तरी भरभरून व्यक्त झाल्यास आपल्या मनातील विचारांची वादळे शांत होतात. आपण जेव्हा एखाद्याकडे आपल्या मनातील विचार भडभडून व्यक्त करतो, तेव्हा मनातील साचलेले विचारांचे गढूळ पाणी शांत होते. तेव्हा व्यक्त व्ह्यायला शिका!!