माजी मंत्री पांडुरंग राऊत यांचे निधन

मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांची आदरांजली


04th October 2022, 12:51 am
माजी मंत्री पांडुरंग  राऊत यांचे निधन

प्रतिनिधी। गोवन वार्ता

डिचोली : डिचोलीचे माजी आमदार तथा माजी मंत्री  पांडुरंग राऊत (७६) यांचे  सोमवारी सकाळी  अल्प आजाराने निधन झाले. करासवाडा-म्हापसा येथील घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवले  होते. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत,  भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, दिगंबर  कामत, रमाकांत खलप, उपसभापती जोशुआ डिसोझा, आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये,  माजी सभापती राजेश पाटणेकर,  माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्यासह मान्यवरांनी अंत्यदर्शन घेऊन त्यांना श्रद्धांजली  वाहिली. साळ  येथील  स्मशानभूमीत सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात एक पुत्र, तीन कन्या असा मोठा परिवार आहे.

पांडुरंग राऊत यांनी दोन वेळा डिचोली मतदारसंघातून  विजय संपादन केला होता. त्यांनी पर्यटन, वीज, आराेग्य, वाहतूक  आदी खात्यांचे मंत्रिपद भूषवले होते. उत्तर गोवा मतदारसंघातून लोकसभा निवडणूकही त्यांनी लढवली होती. डिचोली  बाय पास, कदंब बसस्थानक, उपअधीक्षक कार्यालय, वाहतूक कार्यालय त्यांच्या कार्यकाळात झाले होते. डिचोली शहराचा मास्टर प्लान  त्यांनी आखला होता. शासकीय पातळीवर  शिमगोत्सव सुरू करण्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. साळ  व मुळगाव या ठिकाणी प्राथमिक, माध्यमिक  विद्यालय तसेच उच्च माध्यमिक विद्यालय सुरू करून शिक्षण क्षेत्रातही त्यांनी योगदान दिले.   राज्य सहकारी बँकेचे  उपाध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले.       

डिचोलीतील अनेकांनी राऊत यांच्या आठवणींना उजाळा दिला. माजी सभापती राजेश पाटणेकर म्हणाले, भाई राऊत यांच्या निधनाने एक परिपूर्ण राजकीय मार्गदर्शक गमावला आहे.

भाई राऊत माझ्यासाठी आदरणीय होते. त्यांनी शिक्षण, सहकार, कला व संस्कृती, पर्यटन, उद्योग, आरोग्य आदी क्षेत्रांत भरीव योगदान दिले आहे. त्यांच्या जाण्याने एक उत्तम  मार्गदर्शक हरपला आहे.

— डॉ. चंद्रकांत शेट्ये,  आमदार, डिचोली

पांडुरंग राऊत यांनी प्रामाणिकपणे सेवा करताना मंत्री व आमदार  या नात्याने अनेक योजना राबवल्या आहेत. ते शांत स्वभावाचे व उत्तम नियोजन कौशल्य असलेले व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी केलेल्या सामाजिक कार्यामुळे ते सदैव स्मरणात राहतील.

— डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

हेही वाचा