मुख्यमंत्र्यांचा भाऊ असल्याचे भासवून क्लबमध्ये शिरण्याचा प्रयत्न

तक्रार दाखल होताच संशयिताची न्यायालयात धाव

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
04th October 2022, 12:05 am
मुख्यमंत्र्यांचा भाऊ असल्याचे  भासवून क्लबमध्ये शिरण्याचा प्रयत्नपणजी : मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांचा भाऊ असल्याचे सांगून नेरूल येथील एका क्लबमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पर्वरी पोलिसांनी धैर्यशील शिवाजी पाटील याच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणी संशयिताने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ ऑक्टोबर रोजी होणार आहे.

या प्रकरणी नेरूल येथील एलपीके वाॅटरफ्रंन्ट क्लबचे पवन रौजर या सुरक्षा अधिकाऱ्याने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. ‘२० सप्टेंबर २०२२ रोजी मध्यरात्री १२ वाजता मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांचा भाऊ असल्याचे भासवून धैर्य या व्यक्तीने क्लबमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. तसेच सुरक्षा रक्षक व इतर कर्मचाऱ्यांना धमकी दिली’, असे त्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
वरील तक्रारीची दखल घेऊन पर्वरी पोलीस स्थानकाचे निरीक्षक अनंत गावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रतीक भट प्रभू यांनी धैर्य या व्यक्तीविरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ४१९, ४२०, ४४७, ५०६(२) आरडब्ल्यू ५११ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. याच दरम्यान संशयित धैर्यशील शिवाजी पाटील असून तो सातारा (महाराष्ट्र) येथील असल्याचे पोलिसांना समजले. त्यानंतर पोलीस त्याच्या मागावर असताना तो बेपत्ता झाला. त्यानंतर संशयिताने पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ६ रोजी होणार आहे. तेव्हा न्यायालयाने पोलिसांना त्यांची बाजू मांडण्यास सांगितले आहे.