युरीचे नशीब

प्रथमच निवडून येऊन एवढ्या कमी वयात विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी भाग्य लागते. युरीला ही संधी मिळाली आहे. विरोधात जास्त आमदार नसले तरीही वेगवेगळ्या पक्षांचे जेवढे आमदार विरोधात आहेत त्या सर्वांना एकत्र घेऊन सभागृहात आणि सभागृहाबाहेर भूमिका वठवावी लागेल. हे एक आव्हान आहे. सध्या फक्त सातच आमदार विरोधी पक्षांचे आहेत.

Story: उतारा | पांडुरंग गांवकर |
01st October 2022, 10:45 Hrs
युरीचे नशीब

नशीब कोणाचे कधी उघडेल त्याचा नेम नाही. तीन-चार वेळा जिंकणारे आमदार आजही मंत्री होऊ शकले नाहीत. किंवा त्यांना कॅबिनेटचा दर्जाही कधी मिळाला नाही. काँग्रेसमधून हल्लीच फुटून भाजपात गेलेल्यांपैकी अनेकांना आपण मंत्री होणार याची अद्यापही हमी नाही. पण काँग्रेसमध्ये राहिलेले युरी आलेमाव यांना दहाच दिवसांत विधीमंडळ गटनेतेपद मिळाले आणि विरोधी पक्षनेतेपदही.

काँग्रेसकडे तीनच आमदार राहिल्यामुळे विरोधी पक्षनेतेपद दिले जाणार की नाही याबाबत प्रश्नचिन्ह होते. पण सभापती रमेश तवडकर यांनी आलेमाव यांच्या विरोधी पक्षनेतेपदाला मंजुरी दिली. युरी आलेमाव यांचे वय ३७ वर्षे असल्यामुळे प्रथमच गोव्याला तरुण विरोधी पक्षनेता मिळाला आहे. विशेष म्हणजे जॅक सिक्वेरा, काशिनाथ जल्मी, लुईझीन फालेरो, मनोहर पर्रीकर, प्रतापसिंग राणे अशा मातब्बर नेत्यांनी गाजवलेल्या या पदावर युरी आलेमाव यांची नियुक्ती झाली आहे.

युरी आलेमाव यांना राजकीय घराण्याची पार्श्वभूमी आहे. त्यांचे काका चर्चिल आलेमाव अल्पकाळाचे मुख्यमंत्रीही झाले. त्यांचे वडील दोन वेळा आमदार झाले आणि मंत्रीही होते. चर्चिल यांच्या कन्येने विधानसभा निवडणुकीत आपले नशीब आजमावण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना आतापर्यंत यश आले नाही. युरी आलेमाव यापूर्वी पराभूत झाले होते, पण यावर्षी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत त्यांना यश आले. विधानसभेतील नवा चेहरा असला तरीही जुलैमध्ये पार पडलेल्या विधानसभा अधिवेशनात लक्षवेधी कामगिरी केल्यामुळे सर्वांनीच युरीचे कौतुक केले. त्या अधिवेशनात सुमारे १६० प्रश्नही त्यांनी विचारले होते. विधानसभेत प्रभावीपणे वेगवेगळ्या विषयांवर अभ्यासपूर्ण मत मांडण्याच्या पद्धतीमुळे आलेमाव घराण्यातील एवढे प्रभावी वक्तृत्व असलेल्या युरीचे राजकीय भवितव्य उज्ज्वल आहे हे दिसत होते. पण हे भवितव्य इतक्या लवकर उज्ज्वल होत जाईल याची कोणालाही कल्पना नव्हती.

काँग्रेसमध्ये सध्या असलेल्या तीन नेत्यांमध्ये दुसरे अभ्यासू नेते होते अॅड. कार्लुस फेरेरा. दिगंबर कामत यांना डावलून जेव्हा मायकल लोबो विरोधी पक्षनेते झाले त्यावेळी बहुतेकांना फेरेराच विरोधी पक्षनेतेपदास पात्र होते असे वाटायचे. पण दिगंबर कामत यांच्यासह आठ जणांनी काँग्रेस सोडल्यानंतर युरी आलेमाव यांच्याकडे काँग्रेसने विधीमंडळ गटाची जबाबदारी दिली. त्यानंतर आता त्यांना विरोधी पक्षनेतेपदही मिळाले. प्रथमच निवडून येऊन एवढ्या कमी वयात विरोधी पक्षनेतेपद मिळण्यासाठी भाग्य लागते. युरीला ही संधी मिळाली आहे. विरोधात जास्त आमदार नसले तरीही वेगवेगळ्या पक्षांचे जेवढे आमदार विरोधात आहेत त्या सर्वांना एकत्र घेऊन सभागृहात आणि सभागृहाबाहेर भूमिका वठवावी लागेल. हे एक आव्हान आहे. सध्या फक्त सातच आमदार विरोधी पक्षांचे आहेत.

आठ आमदार फुटल्यानंतर काँग्रेसचे नेतृत्व करण्यासाठी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांना संधी मिळेल अशी शक्यता होती. तशा हालचालीही सुरू होत्या. पण गोवा फॉरवर्ड विलीन करून आताच काँग्रेसचा झेंडा हाती घेणे सरदेसाई यांनाही तसे मान्य नव्हते. कारण २०२४ मध्ये लोकसभेची निवडणूक होईल. त्यानंतर केंद्रात कोणाची सत्ता येईल त्यावर सरदेसाई यांचे गणित बहुधा ठरलेले असावे. त्यामुळे पुढे कधीतरी वेगळे निर्णय घेऊ शकतात. पण ते काँग्रेसमध्ये जाऊ शकतात या चर्चेमुळे प्रदेश भाजपही त्यांना अडविण्यासाठी सक्रिय झाली होती. कदाचित सरदेसाई यांना अडविण्यासाठीच फक्त तीन आमदार असतानाही युरी आलेमाव यांना विरोधी पक्षनेतेपदाचा दर्जा देऊन सरदेसाई यांना डिवचण्याचा हा प्रयत्न असू शकतो. सरदेसाई यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा मार्ग अडवला गेला आहे का असा एक चर्चेचा मुद्दा उपस्थित होतो.

काँग्रेसची देशभर ‘भारत जोडो’ यात्रा सुरू असताना गोव्यात आठ आमदारांनी काँग्रेस सोडली. आठ आमदार गेल्यानंतर लगेच काँग्रेसने विधीमंडळ गट नेतेपद निश्चित केले. गट समित्यांची पुनर्रचना करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली. समित्या बरखास्त केल्या. सध्या काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद अमित पाटकर या ३८ वर्षीय तरुणाकडे आहे. ते त्यांच्याकडे राहू शकते. त्यामुळे आता पुन्हा काँग्रेसची पुनर्बांधणी करण्याची वेळ आली आहे. गेल्या काही वर्षांत वारंवार पक्षाची पुनर्बांधणी करण्याची पाळी काँग्रेसवर आलेली आहे. पुनर्बांधणी केल्यानंतर आमदार, नेते सोडून जात असल्यामुळे पक्ष बांधणीवरच जास्त वेळ खर्च होत आहे.

गेल्या साडे तीन वर्षांत गोव्यातील काँग्रेसने पक्षांतरे पाहिली. ऐनवेळी काँग्रेस सोडून इतर पक्षांमध्ये गेलेले लोक पाहिले. यावेळी तर निवडणुकीनंतर पाच महिन्यांत आठ आमदारांनी साथ सोडली. पुढच्या विधानसभा निवडणुकीला अजून साडेचार वर्षांचा कालावधी आहे. त्यामुळे काँग्रेसला संजीवनी देण्यासाठी काँग्रेसकडे तसा खूप वेळ आहे. त्यापूर्वी लोकसभा निवडणूक आहे. त्यासाठीही काँग्रेसला तयारी करावी लागेल. काँग्रेस मजबूत करण्यासाठी सध्यातरी त्या ताकदीचे नेते नाहीत. पण या निमित्ताने नवे नेते घडविण्याची संधी आहे. गोव्याच्या राजकारणात संधी शोधणाऱ्यांची कमी नाही. अनेकांची राजकीय कारकिर्द पहिल्याच प्रयत्नात घडलेली आहे. मागील दहा वर्षांत भाजपने काँग्रेसला संपविण्याचे अनेकदा प्रयत्न केले पण तरीही काँग्रेस तग धरून आहे. यंदा पार पडलेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने सर्व विरोधी पक्षांना एकत्र घेतले असते तर आजचे राजकीय चित्र वेगळे असते. पण जसे काँग्रेसमध्ये शुक्राचार्य आहेत तसे विश्वास बसणार नाही असे काँग्रेसला दगा दिलेलेही खूप आहेत. त्यातच एकमेकांविषयीचा आकस. जोपर्यंत असे वातावरण आहे तोपर्यंत काँग्रेसला कोणी वाचवू शकणार नाही. जेव्हा धोरण बदलेल, विरोधकांशी हातमिळवणी करून पुढे जाण्याचा विचार रुजेल तेव्हाच गोव्यात काँग्रेसला चांगले दिवस येऊ शकतात. पण त्यासाठी प्रादेशिक पक्ष असो किंवा इतर राजकीय पक्ष सर्वांशी मैत्री करावी लागेल. तू मोठा की मी मोठा यावरून भांडत बसण्यापेक्षा समोरचे संकट पहावे लागेल. अन्यथा युरी आलेमाव असो किंवा अमित पाटकर असो. स्वबळावर पल्ला गाठणे हे यापुढे महाकठीण काम आहे.

काँग्रेसला आता तसे राजकारण सोपे नाही. भाजपा गोव्यात प्रचंड विस्तारली आहे. मगो, गोवा फॉरवर्डचा आवाका मर्यादित आहे. पण रिव्हॉल्युशनरी गोवन्स पार्टी आणि आम आदमी पार्टी सारखे पक्ष राज्यभर आपला आवाका वाढवत आहेत. रिव्हॉल्युशनरी गोवन्सला मिळणारा प्रतिसाद आणि इतर राजकीय पक्षांकडून होणारा विस्तार पाहता पुढे काँग्रेसला गोव्यातील राजकारणात मर्यादित जागांमध्येही रहावे लागू शकते.