यहां के हम सिकंदर ... आनंदाचा पेटारा...

सुखदुःखाची सरमिसळ झालेल्या जीवनयात्रेतून स्वतःला आपल्या आनंदाची परिभाषा शोधायची असते. ती प्रत्येकाने शोधलीच पाहिजे कारण, 'चौराहे पे दुनिया के गम का काफीला खुला है, गौर तलक देख ले तू काफीले के परे खुशीयों का मेला है' असं म्हणून हा 'खुशीयों का मेला' शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. प्रत्येकाला जेव्हा आनंदाचा हा पेटारा समजेल तेव्हा तो खऱ्या अर्थाने स्वतःच्या दुनियेचा सिकंदर असेल... नव्हे प्रत्येकाने असा सिकंदर व्हायलाच हवे…

Story: मनातलं | संतोष काशीद |
01st October 2022, 10:26 pm
यहां के हम सिकंदर ... आनंदाचा पेटारा...

मनुष्यस्वभाव मोठा विलक्षण आहे. इथे दुःखाला कुरुवाळत बसले की त्याचा पर्वत होतो पण त्याच दुःखावर फुंकर मारून आनंदाचे क्षण शोधले तर मात्र सुखसोहळ्याचा पहाड समोर उभा राहतो. दैनंदिन जीवनात असे क्षण शोधणे हे जितके महत्त्वाचे आहे त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे ते जीवनातील समरसता. १९९२ मध्ये आमिर खान अभिनित 'जो जिता वोही सिकंदर' नावाचा एक अत्यंत सुंदर चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्या चित्रपटाचे मजरुह सुलतानपुरी यांनी शब्दबद्ध केलेले आणि जतीन ललित या जोडीने संगीतबद्ध केलेले शीर्षक गीत फार प्रसिद्ध झाले होते. हे गीत उदित नारायण, साधना सरगम सारख्या मधुर आवाजाच्या गायकांनी गायले होते. या गीतात असलेली 'यहां के हम सिकंदर...' ही ओळ मला अनेकार्थाने अर्थपूर्ण वाटते. कारण ही ओळ व्यक्तीमध्ये स्वतःमधील नवऊर्जेचा शोध घेण्याची प्रेरणा देते. यात, रोजच्या धांदलीत थोडेफार आनंदाचे क्षण शोधून स्वतःतलं जिवंतपण पुन्हा अनुभवण्याची ताकद मिळते. आपण आपल्या दुनियेचे सिकंदर आहोत हे पुनः पुनः प्रकर्षाने जाणीव करून देते. हे 'सिकंदर' पण अनुभवण्यासाठी फार मोठे सायास करावे लागतात असे नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला तुमच्या दुनियेचा सिकंदर बनवतात. 

हे सर्व सांगायचे विशेष कारण म्हणजे रोजच्याच धावपळीच्या आयुष्यातून चार क्षण उसंत घेऊन आम्हीही असेच आमच्या दुनियेचे 'सिकंदरपण' अनुभवले. खासगी आस्थापनात काम करताना समोर येणारी आव्हाने जिकिरीची असतात. म्हणूनच अशा क्षणांना मी स्वतः फार महत्त्व देतो. याच सोनेरी क्षणांना अनुभवण्यासाठी आम्ही फोंड्याचे प्रसिद्ध जलक्रीडा उद्यान नागेश वॉटर पार्कमध्ये दाखल झालो. आम्ही जवळपास शंभर सदस्य सहकुटुंब इथे असे सोनेरी क्षण शोधावयास, अनुभवण्यास हजर झालो. आमचे मित्र योगेश वागळे, सुरज आघव, क्लॅरिसा, लिंडा, विशाल पाटील, संदीप देसाई, आस्थापनाचे वरिष्ठ व्यवस्थापक सौरव घोष, अविनाश सनातन यांनी केलेल्या उत्कृष्ट नियोजनाने हा संपूर्ण दिवस आम्ही मौजमस्ती केली. हा पूर्ण वॉटर पार्क अनेक जलक्रीडा वैशिष्टयांनी परिपूर्ण आहे. पाण्यातील घसरगुंडी अर्थात स्लाइड्स, जलतुषार नृत्य, कृत्रिम धबधबा, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी सुसज्ज खुले सभागृह, वृक्षसंपदेने गजबजलेला निसर्गरम्य परिसर अन उत्तम व्यवस्था पाहणारे कर्मचारी असे सगळे योग्यरित्या उपलब्ध होणारे ठिकाण म्हणून हे गोव्यात प्रसिद्ध आहे. 

आमच्या कार्यक्रमाची सुरुवातच लहान मुलांच्या सांगीतिक गायनाने झाली. यावेळी अनेक चिमुकल्यांनी नृत्य केले तर अनेकांनी आपल्या बोबड्या बोलांनी शब्दांना बोलकं केले. काही नवजात बालके दुडूदुडू पावलांनी अवघ्या खुल्या सभागृहात धावत होती. चिमुकल्यांचा हा वावर मनमोहक होता. आम्ही तर सगळेच त्यांच्यासोबत लहान होऊन गेलो होतो. कोणी रडतही होते, कोणी गात होते, कोणी स्वतःच स्वतःशी बोलत होते तर कोणी नवखे जग पाहून बावरले होते. लहान मुलांना हे असं पाहणं हाही एक गमतीचा भाग असतो. दुपारी उन्हाची काहिली वाढली तसे सर्वांनीच जलतरण तलाव जवळ केले. इथे दोन तीन प्रकारचे तलाव आहेत. एक लहान मुलांसाठी छोटी स्लाईड असलेला तलाव अन दुसरा मोठ्या चार नागमोडी वळणाच्या स्लाईड असलेला तलाव. लहान मुलांच्या अकर्षणासाठी म्हणून ऍनाकोंडा आकारातील सर्पाकृती स्लाइड्सही इथे आहेत. सकाळी साडे अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत इथे सर्वांनी संगीताच्या तालावर मनसोक्त जलक्रीडेचा आनंद घेतला. दोन दोन गटात व्हॉलीबॉल खेळ खेळलो, कोणी ग्रामीण थाटाचे जलनृत्य करून इतरांचे मनोरंजन करत होता तर समूह नृत्याने बाकीच्यांना हसून लोटपोट केले जात होते. 

दुपारी लज्जतदार उदरभरणानंतर सांस्कृतिक कार्यक्रमास सुरुवात झाली. यावेळी अनेक फनी गेम्समधे प्रत्येकास संधी दिली जात होती. विजेत्यांना आकर्षक बक्षिसे वगैरेही होती. आमच्या एका सहकाऱ्याच्या कन्येने जिम्नॅस्टिक प्रकारातील सुंदर कर्तब दाखवले तर दुसऱ्या एका मुलीने तितकेच उत्कृष्ट राष्ट्रगीत म्हटले. तेजा नावाच्या दक्षिण भारतीय सहकाऱ्याच्या पत्नीने तामिळ भाषेतील सुंदर गीत गायले, ओडीसाच्या सनातन या मित्राच्या पत्नीने पूजाने भारदस्त आवाजात एक गीत गायन केले. सौ शुभांगी काशीद यांनी गायलेले 'ओ प्रिया..' हे गीतही सर्वांच्या पसंतीस उतरले. थोडक्यात संपूर्ण कार्यक्रमात प्रत्येकाने आपल्यातील कलागुण प्रदर्शित केले. एक मात्र नक्की कलेचं अंग प्रत्येकाला असतेच. कधी ते गायनात, कधी नृत्यात, कधी नियोजनात, कधी नक्कलाकार, कधी लेखनात तर अनेकदा उत्कृष्ट, संवेदनशील दर्शक म्हणून हे कलागुण वेळ मिळेल तेव्हा प्रदर्शित करत असतो. आमच्या या वार्षिक स्नेहमेळाव्यातही असेच कलागुण प्रत्येकाने दाखवले. वास्तविक रोजच्या जीवनात आपण काहीतरी शोधत असतो. हे शोधणं नेमकं काय हे ज्याला समजलं त्याला आनंदाच्या उत्पत्तीची व्याख्या समजली. प्रत्येकाची आवडनिवड जशी वेगळी तशीच प्रत्येकाची आनंदाची व्याख्याही निराळी. मग कोणी स्वतःला स्वतःच्या दुनियेचा सिकंदर समजले तर तेही मान्य करायलाच हवं. ही छोटीशी वार्षिक सहल त्यामुळेच आम्हाला आमच्या दुनियेचा सिकंदर बनवून जाते. कोणा अज्ञात शब्दरचनाकाराने मानवी स्वभावाच्या या अवस्थेला काव्यात गुंफताना म्हटले आहे की, 

मनाला चढू दे वेड्या जगण्याची धुंदी

निराशेला करू तेथे येण्याची बंदी

निर्माण करू स्वतःचे विश्व स्वच्छंदी

चुकवू नये कधीही आनंदी राहण्याची संधी

जीवनाचं अगदी असं आहे. सुखदुःखाची सरमिसळ झालेल्या जीवनयात्रेतून स्वतःला आपल्या आनंदाची परिभाषा शोधायची असते. ती प्रत्येकाने शोधलीच पाहिजे कारण, 'चौराहे पे दुनिया के गम का काफीला खुला है, गौर तलक देख ले तू काफीले के परे खुशीयों का मेला है' असं म्हणून हा 'खुशीयों का मेला' शोधण्याचा प्रयत्न प्रत्येकजण करत असतो. प्रत्येकाला जेव्हा आनंदाचा हा पेटारा समजेल तेव्हा तो खऱ्या अर्थाने स्वतःच्या दुनियेचा सिकंदर असेल... नव्हे प्रत्येकाने असा सिकंदर व्हायलाच हवे....