ऑनलाईन लक्ष्मीबाई

लक्ष्मी देखील आता ऑनलाईन प्रवास करते म्हणून सहज मनात आलं, यंदाच्या दिवाळीत यु पी आय कोड पण ठेवावा का चांदीच्या नाण्यांसोबत? आणि या गोष्टी डोक्यात देण्यामागचा किस्सा पण सांगते तुम्हाला.

Story: टेक्नो मैत्री । गौरी नाडगौडा |
30th September 2022, 10:32 pm
ऑनलाईन लक्ष्मीबाई

आजच्या जमान्यात एका क्लिकवर बऱ्याच उलाढाली होतात. सगळं कसं झटपट आणि हायटेक होत आहे. छायाचित्र, चलचित्र एकमेकांना पाठवणं आता अगदी सवयीचं झालं आहे. शेअर नावाचे बाण अगदी दिवसरात्र मारणं चालू असतं. सर्वात महत्त्वाचा आणि आनंद देणारा संदेश म्हणजे 'अमाऊंट क्रेडिटेड टू युवर अकाउंट'.

काल फोन चाळत बसले होते आणि मुलीचा संदेश आला, "आई मला तू ऑनलाईन पैसे पाठवू शकतेस का? फी भरण्याची आज शेवटची तारीख. लक्षातच नव्हतं." खरं तर मला काहीच माहिती नव्हती याबद्दल. पण मीही प्रतिसाद दिला तिला.

 "नसेल तुला जर खूप घाई, तर सुरुवात कशी करू सांगशील का बाई?"

 बहुतेक तिच्याकडेही फावला वेळ असावा म्हणून तिनेही दिला प्रतिसाद.

 "मी सांगेन तसं तसं करत जा, काही अडलं तर विचारत जा, मनात आणलं तर सगळं काही शिकशील, आणि घरात राहूनही अपडेट तू होशील"

 आणि मुलीने सांगितलं तसं मी एक ॲप 'प्ले स्टोअर' मधून डाऊनलोड केलं. जे ॲप मुलीकडे आहे तेच ॲप मीही सिलेक्ट केलं आणि माझ्या बॅंकेचे डिटेल्स त्यात मी नोंदवले. मग एक कोड तयार झाला, जो थोडाफार भुलभुलय्यासारखा भासत होता. मुलीला म्हटलं, हे काय आहे काही कळत नाही. त्यावर ती उत्तरली, "आई, तो आहे यु पी आय कोड ( युनिफाईड पेमेंट इंटरफेस कोड) आणि क्यूआर कोड (क्विक रिस्पॉन्स कोड) जो तू एखाद्याला पैसे पाठवण्यासाठी वापरू शकतेस.

आज-काल काळी बाहुली, लिंबू यांच्या बरोबरीने अजून एक गोष्ट दुकानदार अडकवून ठेवतात, ते म्हणजे क्यू आर कोड. तुझ्याकडे यु पी आय कोड असल्यामुळे तुला कधीही तुझे बँक डिटेल्स सोबत ठेवण्याची किंवा कुणाला सांगायची गरज भासणार नाही आणि त्यामुळे तुझी महत्त्वाची माहिती सुरक्षित राहील. ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी तू पे पेटीएम, फोन पे, बी एच आय एम इत्यादींपैकी कोणतेही ॲप वापरू शकतेस. त्यामुळे कोणत्याही ॲपचा कोड स्कॅन करून किती पैसे पाठवायचे हे लिहून लगेच पैसे पाठवू शकतेस. वरचे सुट्टे पैसे देण्याऐवजी चॉकलेट देणाऱ्या दुकानदारांची संधी यामुळे हुकली. आता माझा मोबाईल नंबर तुझ्याकडे आहे आणि तो ज्या ॲपवर नोंदवलेला आहे ते ॲप तुझ्याकडेही असेल तर त्यावरूनही तू पैसे पाठवू शकतेस आणि एखाद्याकडे कुठलंही ॲप नसेल तर बँक टू बँक पण तू पैसे पाठवू शकतेस ज्याला नेफ्ट असे म्हणतात. त्यावर पण बोलूयातच आपण सवडीने.

आई अजून एक महत्त्वाचं तुला सांगायचे राहिले तू जे ॲप घेतलं आहेस मला पैसे पाठवण्यासाठी त्याला लॉक घालायला विसरू नकोस आणि तू सेट केलेला यु पी आय पिन लक्षात ठेव. कोणालाही शेअर करू नकोस. ऑनलाइन पेमेंट तू करशील भीत-भीत,

 पण नेहमीच लक्षात ठेव कसे राहता येईल सुरक्षित

चला तर मग भेटू यात पुन्हा एका नव्या किश्शांसह तोपर्यंत ओम अपटूडेटाय नमः!!