आता ‘दलित वाङ्मय’ कोणत्या लेखनास मानावे ?

बदलत्या काळानुसार ज्या धर्माचे अनुयायी स्वधर्माची चिकित्सा करतात किंवा इतरांनी केलेली स्वीकारतात अशा समाजाचा विवेक जागा असल्याचं हे लक्षण असतं. तेच साहित्यालाही लागू पडतं.

Story: वेध | शाहू पाटोळे |
17th September 2022, 10:20 pm
आता ‘दलित वाङ्मय’ कोणत्या लेखनास मानावे ?

मराठी साहित्यामधील ‘दलित वाङ्मयाचा प्रवाह’ हा उण्या-पुर्‍या गेल्या पन्नास वर्षांचा आहे. त्यातही गेल्या दशकभरात उल्लेखनीय अशा लेखनाची भर पडल्याचे म्हणावे अशी साहित्य निर्मिती झालेली नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी निर्मिलेल्या सामाजिक चळवळीमुळे गावगाड्यात चिनून ठेवलेल्या गावकुसाबाहेरचा समाज जागृत होऊ लागला, साक्षर होऊ लागला. त्या चळवळीतूनच थेट विषयाला, मुद्याला हात घालणार्‍या लेखन-प्रकारास सुरुवात झाली. मराठी सारस्वतात प्रामुख्याने ब्राह्मण वा त्या परिघामधील सत्सम वर्ण-जातींमधील लेखक लिहीत असत. तसा अर्वाचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास ‘यमुना पर्यटन’च्या मागे जात नाही. अर्वाचीन मराठी साहित्य लिहिणारा वर्ग- सुद्धा युरोपियन वाङ्मयाच्या प्रभावाखाली येऊन लिहिता-वाचता झालेला होता. नंतर-नंतर त्यातही वाङ्मय आणि कलांचे मानवी जीवनातील प्रयोजन हे निव्वळ ‘कलेसाठी की जीवनासाठी’ यासारखे वाद झडत असत. तात्कालिक अभिजनांच्या शिरस्त्याप्रमाणे इतर वर्ण-जातींचे लेखकसुद्धा कविता, कथा, कादंबर्‍या, ललित लेखन आणि पौराणिक, बखरींसारख्या बाडांवर विसंबून ‘स्फूरणसाहित्य’ लिहीत असत. अक्षरसाक्षर वाचक अशा काल्पनिक लेखनास आपल्या देशाचा, संस्कृतीचा जाज्वल्य इतिहास समजू लागण्याचा तो काळ होता. इंग्रजी व युरोपियन वाङ्मयाच्या प्रभावाने भारलेले, लोकशाही, प्रजासत्ताक, समाजवादी विचारांची ओळख झालेले लेखक तेच विचार एतद्देशीय प्रक्रिया करून ‘देशीवाद’ वगैरे म्हणून ठिगळवायचे. त्यातही पन्नास आणि साठच्या दशकांमध्ये मराठी साहित्य क्षेत्रात बरेच प्रयोग झाले. त्यातील काही साहित्य चळवळी आटून तरी गेल्या किंवा प्रस्थापित असलेल्या मूळ प्रवाहात मिसळून गेल्या. अथवा त्यांना मूळ प्रवाहातल्यांनी मान्यता दिल्यावर चळवळींचे ताबूत थंड झाले.

अवकाळी पावसामुळे एखाद्या ओढ्याला अचानक पूर यावा आणि मूळ नदीच्या संथ-नितळ प्रवाह गढूळ पाणी आणि पुरसन दिसावे, तसा प्रकार साठच्या दशकाच्या मध्यावर मराठी साहित्यात झाला. दलित साहित्याच्या अशा अवचित प्रवाहाने प्रस्थापित मराठी लेखक आणि चोखंदळ वाचकांच्या नाका-तोंडात ‘दलितसाहित्य जल’ गेले. दलित साहित्यावरील प्रतिक्रिया म्हणून कुणी या लेखनास साहित्यिक मूल्य, दर्जा नसल्याचे म्हणाले, तर कुणी त्यास सार्वजनिक शौचकुपातील लेखनाचा दर्जा दिला. दलित साहित्याने खर्‍याअर्थाने उघडे पाडले ते, ‘ग्रामीण साहित्यिकांना.’ जे कुणी ग्रामीण साहित्यिक होते त्यांच्या साहित्यात गावकुसाबाहेरच्या वस्त्यांची, कधी लोकांची वर्णन येत असत. ती ही त्यांच्या कथानकांना ‘जोड’ म्हणून; त्यात गावकुसाची आणि त्यातील माणसांची व्यथा कुठून येणार? त्यामुळे नागरी वाचकांना ग्रामीण भागाची वर्णनं कळायची ती ग्रामीण भागातून आलेल्या प्रस्थापित जातींमधील लेखकांकडूनच.

अपघात अचानक घडतो, तर घटना घडण्यामागे अनेक घटक कारणीभूत असतात. दलित वाङ्मयाची निर्मिती ही अशा समुच्चयांमधून झालेली आहे. गेल्या कित्येक शतकांपासून दाबले गेलेल्यांचे हुंकार त्यांच्या ‘दिगंबर भाषेत’ व्यक्त व्हायला सुुरुवात झाली होती. चळवळ आणि साहित्याची निर्मिती या बाबी एकमेकांना किती परस्परपूरक असू शकतात, याचं हे भारतीय साहित्यक्षेत्रासाठी एकमेवाद्वितीय आदर्श उदाहरण होतं. गावकुसाबाहेरच्या जाती-जमातींमधील लिहित्या झालेल्या पहिल्या पिढीने ग्रामीण साहित्यिकांच्या लेखनामागचा फोलपणा आणि मध्यमवर्गीय साहित्यिकांच्या वर्गीय अनुभूती आपल्या जिवंत, रसरशीत अनुभवांनी खरवडून काढल्या.

तात्कालिक साहित्यिकांमध्ये जातीने दलित, बहुजन असलेलेपण काही जण होते. त्यातील महत्त्वाचे मोठे नाव म्हणजे, कॉमरेड शाहीर अण्णा भाऊ साठे हे होय! अण्णांचे साहित्य हे दलित साहित्याच्या चौकटीत वा श्रेणीत बसविणे हा त्यांच्यावर अन्याय ठरेल! अण्णांच्या साहित्यात ग्रामीण भागातील वर्ण, वर्ग आणि अर्थव्यवस्थेचे, वर्णसंघर्षाचे वर्णन आहे. अण्णा हे साम्यवादी विचारांच्या कामगार चळवळीतील कार्ड होल्डर कार्यकर्ते असल्यामुळे त्यांच्या साहित्यात ग्रामीण भागातील जातिव्यवस्थेचे बहुपेडी संदर्भ विस्तृतपणे विलग होत नाहीत, असा निष्कर्ष काढता येतो. अण्णांचे उमेदीचे आयुष्य हे कामगार आणि राजकीय चळवळींच्या पटलावर मुंबईत गेल्यामुळे हे घडले असावे. अण्णा मुंबईत राहात असले, तरी त्यांच्या गावाकडच्या आठवणींचा ओढा त्यांच्या लेखनातून बर्‍याचदा आढळतो. अण्णांच्या साहित्यात दिसणारे ग्रामीण जीवन इतर ग्रामीण साहित्यिकांच्या तुलनेने वेगळ्या अंगाने वाचकांसमोर येते, हे विशेष होय!

औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालयाचा वार्षिकांक आणि येथूनच प्रसिद्ध होणार्‍या ‘मराठवाडा’ दैनिकाच्या दिवाळी अंकातील दलित साहित्यावरील परिसंवादामुळे दलित लेखकांनी लिहिलेल्या लेखनास ‘दलित साहित्य’ असे म्हणण्यास सुरुवात झाली, हा इतिहास बर्‍याच अभ्यासकांना ज्ञात आहे. ‘मराठवाडा’ दैनिकाच्या परिसंवादात महाराष्ट्रातील सामाजिक, साहित्य क्षेत्रातील दिग्गजांनी दलित साहित्याबद्दल थेट, स्पष्ट आणि नेमकेपणाने लिहिलंय. विशेष म्हणजे तत्कालीन दलित चळवळीतील विचारवंत, साहित्यिकांनी ते तितक्याच खुल्या दिलाने स्वीकारलं होतं ही प्रगल्भता दोन्ही बाजूंकडे होती. तेव्हा जातिभेद टिकून होता पण मनमोकळेपणाही टिकून होता. त्यानंतर उत्तरोत्तर थेट जातीयता संपल्याचं आपण सर्वजण म्हणतो खरं, पण सगळ्याच सामाजिक बाजू संकुचित होत गेल्याचे आपण पाहतो आहोत.

दलित साहित्यिकांचा कविता आणि आत्मकथनं लिहिण्याकडे अधिक कल होता. त्यांच्या लेखनाचे स्वागत आणि चर्चा झाल्या. ग्रामीण जीवनानुभव घेतलेल्या दलित साहित्यिक कथा लेखनाकडे का रमले नाहीत, की त्यांना कथा हा रंजनवादी साहित्यप्रकार असावा अशी अढी होती की काय अशी शंका येते. तरीही दलित कथा लेखकांमध्ये आयु. बाबूराव बागूल, आयु. योगिराज वाघमारे अलीकडच्या काळातील जयराज खुणे यांनी दलित कथा एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलीय. दलित कादंबर्‍यांमध्ये जरी लेखनामध्ये दलित लेखकांनी जशा दलितानुभूतीच्या कादंबर्‍या लिहिल्या तशाच मुख्य प्रवाहातील विषयांनुरूपही कादंबरी लेखन केले. अशा लेखकांमध्ये नामदेव चं. कांबळे, उत्तम बंडू तुपे, अशोक व्हटकर यांची नावे ठळकपणे पुढे येतात. अशात लिहिते झालेले ल. सि. जाधव पण याच पठडीतील दलित लेखक आहेत.

अगोदर म्हटल्याप्रमाणे दलितांची सामाजिक समतेसाठीची चळवळ आणि दलित साहित्य एकमेकांसह वाढत होतं. बलुतं आणि उपरा या दोन आत्मकथनांनी मराठी साहित्यातील आत्मकथनांबद्दलच्या समजुतींना, चौकटींना धक्के दिले. त्यानंतर दलित लेखकांच्या आत्मकथनांचा ओघ सुरू झाला. सुरुवातीच्या काळात दलित लेखकांच्या व्याख्येत पूर्वाश्रमीचे महार अर्थात नवबौद्ध, मांग, चांभार, ढोर, भटके विमुक्त, धर्मांतरित दलित ख्रिश्चन वा मुस्लिम असे सारेच लेखन दलित साहित्यात गृहीत धरले जात असे. प्रामुख्याने आत्मकथनं लिहिणारे बरेच लेखक एकाच पुस्तकानंतर लिहायचे थांबले, तर काहींनी पुढचे भाग लिहिले. काही दलित लेखकांनी आत्मकथनानंतर इतर साहित्य प्रकार हाताळण्याचा प्रयत्न केला नाही आणि ज्यांनी केला, त्यातील काहींनाच वाचकांनी स्वीकारले. नंतर-नंतर दलित लेखकांची आत्मकथनं साचेबद्ध वाटू लागल्याची टीका होऊ लागली. सामाजिक व्यवस्था, ग्रामव्यवस्था आणि त्यातील प्रत्येक जातीचे ठारावीक स्थान महाराष्ट्रात जवळपास एकसारखे होते. गावागावांमधील प्रमुखांची आणि अभिजनांची मानसिकता सर्वत्र सारखीच होती. त्यामुळे दलित लेखकांना जीवनात जे अनुभव आले, ते वाचकांना एकसारखे वाटणे साहजिक होते. दलित लेखकांमध्ये नवबौद्धांची संख्या अधिक असणे हे. नैसर्गिक होते. कारण पूर्वाश्रमीची महार जात बाबासाहेबांच्या चळवळीत कुठल्या ना कुठल्या मार्गांनी सहभागी झाली होती तो समाज गावगाड्यातून धाडसाने बाहेर पडला, शिकू लागला, विचार करू लागला, सरकारी नोकर्‍यात भरती झाला, सामाजिक चळवळीबरोबरच राजकारणातून सत्ताकारणांकडे वळला. त्याचवेळी इतर दलित, मागास जातींमधील तरुण एकही सन्माननीय अपवाद वगळता बाबासाहेबांच्या चळवळीत मन आणि अंग झाडून सामील झाला नाही; असे खेदपूर्वक नमूद करावे लागते. त्याचबरोबर ‘टाळी एका हाताने वाजत नाही’ या उक्तीप्रमाणे बाबासाहेबांच्या नंतरच्या नवबौद्ध नेतृत्वांनी नवबौद्धेतर दलित, मागासांना चळवळीत सामील  करून घेण्यासाठी अंग आणि मनं झाडून प्रयत्न केल्याचे दिसत नाही, हेही खेदपूर्वक नमूद करावे लागते.

दलित साहित्याच्या चळवळीबरोबरच दलित साहित्यिकांमध्येपण गट तयार झाले. त्यात नवबौद्ध दलित साहित्यिक आणि नवबौद्धेतर दलित, मागास, आदिवासी, भटके, विमुक्त अशी वर्गवारी होऊ लागली. नवबौद्ध साहित्यिकांपासून स्फूर्ती घेऊन आपल्या व्यथा मांडणारे लेखक पुढे आले. पण नवबौद्धेतर साहित्यिकांना नकाराने डावलण्याचे प्रयत्न झाले. त्याचा गैरफायदा ‘इतरेजन’ साहित्यिक, संस्था आणि प्रकाशकांनी घेतल्यास, त्यात नवल ते कसले? असे काही साहित्यिक तगून राहिले तर काही लुप्त झाले. शेवटी ज्यांचं लेखन कसदार होते ते काळाच्या कसोटीवर टिकून राहिले. ज्या दलित साहित्यिकांना गटबाजीचा त्रास झाला, गुदमरावे लागले त्यांपैकी भीमराव गस्ती, नामदेव चं कांबळे आणि उत्तम बंडू त्यात तुपे. ते कुण्या विचारांसोबत गेले, ते वेगळं स्पष्ट करून सांगण्याची गरज नाही. नवबौद्ध दलित साहित्यिकांपैकी काही जेष्ठ, मान्यवर, सुप्रसिद्ध साहित्यिकपण तिकडे ‘समरसून’ फिरून आले, त्यांना मात्र परतून आल्यावर त्यांच्या लोकांनी परत स्वीकारले. वर उल्लेख केलेल्या तिघांना ‘तिकडे’ जावे लागले, यास फक्त तेच कारणीभूत आहेत काय? या विषयांवरही कधी चर्चा होईल का? भटक्या विमुक्तांमधून पुढे आलेल्या साहित्यिकांनी तर स्वत:ची वेगळी बेटं तयार केली, त्यांना मात्र नवबौद्ध साहित्यिक बोल लावताना दिसत नाहीत!

आंबेडकरी विचारधारेनुसार चालणारी चळवळ जसजशी गटा-तटांमध्ये विखुरली गेली, चळवळींची नेतृत्व विचारांपेक्षाही सत्ताकेंद्रांकडे आकर्षित गेली, त्यासोबतच दलित साहित्याची निर्मिती रोडावत गेली. कोणत्याही काळातील समाजात आर्थिक स्थैर्याची अवस्था येते तेव्हा किंवा तो समाज इतर सामाजिक घटकांच्या तुलनेत स्वत:ला तुल्यबळ समजायला लागतो; तेव्हा त्या समाजात स्थैर्य वा शैथिल्य येते. वैचारिकतेला नवता येणे थांबते. शिवाय प्रश्न पडत नाहीत किंवा ज्यांना प्रश्न पडतात त्यांच्याकडे समाजद्रोही म्हणून पाहिले जाते. नवविचारांचा विद्रोह कोमेजतो अथवा करपून जातो. कारण विद्रोह कधी उसना आणता येत नाही. बाबासाहेबांच्या विचारांवर आधारलेली चळवळ जोवर गटातटात विखुरलेली नव्हती; तोवर दलित साहित्याची चळवळ निदान नवबौद्ध लेखकांपाशी विकास पावत होती. दलित साहित्यातील सुरुवातीचा विखार, विद्रोह हा नैसर्गिक आणि उत्स्फूर्त होता. जुना धर्म आणि त्याची मूल्ये अव्हेरली असली, तरी त्याबद्दलचा राग साहित्यातून व्यक्त होत होता. दलित चळवळीचा पाया सामाजिक, सांस्कृतिक प्रतिगाम्यांना विरोध आणि नव्या समाजाची निर्मिती हा होता.

दलित साहित्यिकांची हयात असलेली पहिली आणि दुसरी पिढी आजही जुन्याच साहित्य संकल्पनांना गोंजारत बसलेली आहे. गेल्या पंधरा-वीस वर्षात दलित साहित्यात नवीन असा कोणताही बदल घडलेला नाही, की वेगळं लेखन झालेलं नाही. ना त्यात याच कालखंडात बाबासाहेबांचे अनुयायी ज्या विचारांच्या विरुद्ध बाबासाहेबांनी हयात घालवली; त्याच विचारांच्या सत्ता केंद्रकांमध्ये सामील झाल्याचे दिसते. त्यामुळे वैचारिक आक्रमकता आणि मांडणी बोथट झाली.

याच कालखंडात बाबासाहेबांचे अनुयायी धम्माच्या झेंड्याखाली अधिकाधिक संख्येने एकवटत गेल्याचे दिसते. बुद्धाच्या मूर्ती बसविणे, विहार बांधणे, सामुदायिक प्रार्थना, दररोज विहारात जाणे, विपश्यना शिबिरांचे आयोजन, धम्म संमेलनांची संख्या वाढत गेली. बाबासाहेबांच्या जयंतीच्या निमित्ताने पुस्तके वाचनाची ‘मॅरेथॉन’ यांसारखे उपक्रम राबविले सुरू झाले. त्याचबरोबर ‘कास्टलेस’ समाजाची निर्मिती करण्याची भाषा बोलली जाऊ लागली.

नवबौद्धांची पहिली-दुसरी पिढी बौद्धेतर दलित ‘जयभीम’ घालायला लाजतात किंवा नकार देतात म्हणून चिढत असत. आताची बौद्धांची पिढी बौद्धेतर दलित ‘बौद्ध धर्म स्वीकारत नाहीत’ म्हणून त्यांना ‘आंबेडकरवादी’ मानायला तयार नाहीत. पूर्वी हे खाजगीत बोललं जायचं आता स्पष्टपणे बोललं जातंय. शिवाय आंबेडकरी समाजातील ‘विचारवंतांनी’ गेल्या काही वर्षांपासून आंबेडकरी नवबौद्धांना दलित म्हणून न संबोधता ‘बौद्ध’ म्हणण्याची चळवळ सुरू केलीय. त्यामुळे आता महाराष्ट्रातील बौद्ध लेखकांनी लिहिलेल्या साहित्याला साहित्य’ आणि बौद्धेतर दलित साहित्यिकांना लिहिलेल्या साहित्याला ‘दलित साहित्य’ म्हणण्याचा प्रघात पडू शकतो. खरं तर नवबौद्ध आणि दलित यांच्या जाती म्हणून ते वेगळे असले, तरी त्यांनी इथल्या व्यवस्थेकडून जे भोगलंय त्यात कसलाही फरक करता येत नाही. दोहोंच्या वेदना या एकसारख्याच आहेत.

दलित चळवळ आणि साहित्य चळवळ थंडावली असली, तरी बौद्ध आणि दलित, आदिवासी, भटके, विमुक्त अशा सर्वच जातींची एकमेकांचे बघून रस्त्यांवरील आणि सार्वजनिक ठिकाणांवरील आंदोलनं समाजातील विवेकी माणसांच्या मनावर दडपणं आणणारी आहेत.

आपण ज्यास दलित वाङ्मय म्हणून ओळखतो ते नव्वदच्या दशकात स्थिरावले. योगायोगाने भारतात त्याच काळात संगणक आला, जागतिक आर्थिक व्यवस्थेतील ‘मुक्त’ अर्थव्यवस्था भारताने स्वीकारली. मंडल आयोगामुळे राखीव जातींच्या संख्येत भर पडली आणि राजकारणातही जातीनिहाय पदं मिळू लागली. सरकारी नोकर्‍या कमी झाल्या आणि नोकर्‍या मिळविण्यासाठी स्पर्धा वाढली. १९७२ च्या दुष्काळानंतर खेड्यापाड्यातून शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये स्थलांतरित झालेल्या दलितांची पिढी वयात आली होती. गावात राहून वाढलेली दलितांची पिढी आता जगण्यासाठीच्या पातळीवरचा कोणता संघर्ष करते आणि शहरात वाढलेली दलितांची आजची तरुण पिढी कोणता विचार करते, त्यांच्या समोर जगण्यासाठीच्या कोणत्या समस्या आहेत, कोणता संघर्ष आहे? याची दखल आजच्या दलित साहित्यात कुठेच येत नाही. दलित साहित्याच्या जुन्या मूल्यांना कवटाळून बसलेल्या बुजुर्ग साहित्यिकांना हे साहित्य दलित वाटत नाही. आताच्या पिढीचे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून शिल्पा कांबळे यांच्या ‘निळ्या डोळ्यांची मुलगी’ या कादंबरीचे घेता येऊ शकते. या कादंबरीतील दलित नायिकेचे कथानक मुंबईच्या झोपडपट्टीत घडते म्हणून काय ही कादंबरी दलित साहित्यात बसत नाही. आता अशी वेळ आलेली आहे की, ज्या साहित्यात दलित जाणिवा आणि जगणं मांडलेलं आहे, त्यास दलित साहित्य म्हणायचं? की, दलित जातीत जन्म घेतलेल्या लेखकाने जे लिहिलं असेल त्यास ‘दलित साहित्य’ म्हणायचं या अगोदरही असं घडलंय, नामदेव चं. कांबळे, उत्तम बंडू तुपे, अशोक व्हटकर यांनी वेगळ्या प्रकारचे विषय घेऊन कादंबर्‍या लिहिल्यात आणि त्यांना वाचकांनी स्वीकारलं पण! अलीकडच्या काळातील जातीने दलित असलेले ल.सि. जाधव वेगळ्या पठडीतील कादंबरी लेखन करीत आहेत, त्यांच्या ‘होरपळ’ या आत्मकथनात ‘आक्रस्ताळेपणा नाही, म्हणून का त्यास ‘दलित साहित्य’ म्हणायचं नाही? दलित लेखकांनी वेगळ्या विषयांवर लिहिलेल्या साहित्यास प्रस्थापित दलित विचारवंत आज कोणत्या ‘साहित्य श्रेणीत’ बसविणार आहेत.

आता दलित माणसांची जगण्याची क्षितिजं विस्तारली आहेत. त्यातली विषमता, जातीयता पारंपरिक असणार नाही, हे वास्तव आता स्वीकारायला हवंय की नको? महाराष्ट्रातील एका मोठ्या सामाजिक घटकास बौद्ध होऊन आता साठ वर्षे झाली. आजही बौद्ध असलेले साहित्यिक, लेखक प्रामुख्याने हिंदू धर्माबद्दलच जास्त लिहितात आणि बौद्ध धर्माची थोडीही चिकित्सा करीत नाहीत. निदान या पिढीने तरी आपल्या धर्माबद्दल सकारात्मक साहित्य लिहावे, अशी अपेक्षा करण्यात काय गैर आहे? बदलत्या काळानुसार ज्या धर्माचे अनुयायी स्वधर्माची चिकित्सा करतात किंवा इतरांनी केलेली स्वीकारतात अशा समाजाचा विवेक जागा असल्याचं हे लक्षण असतं. तेच साहित्यालाही लागू पडतं. भरभरून लिहिणारे आणि ‘दया पवार वा लक्ष्मण मान्यांबद्दल’ लिहिणारे यात मर्ढेकर, बोरकरांबद्दल तात्त्विक फरक कोणताच नसतो!