पाऊले चालती अहिताची वाट....

आज मी माझ्या लेखाच्या माध्यमातून जो विषय मांडणार आहे, तो विषय हाताळल्यानंतर, समाजाच्या नकारात्मकतेचे स्वरुप नक्कीच बदलणार अशी मला खात्री आहे. गेल्या आठवड्यात लेखाच्या दोन भागांद्वारे आपण आक्रमक मुलांच्या स्वभावपरिवर्तनावर प्रकाश टाकला आणि आज आपण त्याच आक्रमक स्वभावाचा शेवटचा टप्पा पहाणार आहोत.

Story: पालकत्व । पूजा भांडारे |
16th September 2022, 11:07 pm
पाऊले चालती अहिताची वाट....

आजकाल आपण जाणतोच, की मुलांच्या आत्महत्येचे प्रकरण दिवसेंदिवस वाढत आहे. मुलांच्या या अशा निर्णयामागे अनेक कारणे असतात. जसे की आक्रमक मुलांच्या मनाविरुध्द कुठलीही गोष्ट घडणे, आजूबाजूच्या नकारात्मक परिसराचा परिणाम, प्रसार माध्यमांचा परिणाम, चित्तथरारक प्रसगांना साक्षी बनणे इ. काही मुद्दे मुलांच्या या विचारसरणीसाठी कारणीभूत असतात. बालवयात मुलांचा मेंदू पूर्णपणे इतरांवर अवलंबून असतो, जो क्षणार्धात ती गोष्ट सहजरित्या नजरेत टिपून घेतो, जी गोष्ट मोठ्यांच्या सुध्दा ध्यानात येत नाही. त्यामुळेच बालवय मऊ कापसासारखे अलगद् हाताळणे मह्त्त्वाचे असते, अन्यथा तो कापूस विस्कटण्यास उशीर लागत नाही. नकारात्मक विचारसरणीच्या या वयाच्या टप्प्यात मूल योग्य व अयोग्य मधील भेद करण्यास असमर्थ ठरते. अशा वेळेस त्याचे मातापिता म्हणजे त्यांची एकमेव आशा असते. त्यामुळे मुलांना कुठल्याही परिस्थितीत नकारात्मक विचारसरणीतून बाहेर काढणे गरजेचे असते. आत्महत्येसारखा भीषण प्रयोग करण्याआधी मुलांच्या वर्तनात काही बदल जाणवतात. आपण एक मातापिता म्हणून जर ही जबाबदारी योग्यरीतीने पार पाडली तर आत्महत्येचे प्रमाण नक्कीच कमी होईल.

नकारात्मक भाषा व वर्तन

आक्रमकतेच्या शेवटच्या टप्प्यावर पोहोचलेली मुले अतिशय हट्टी स्वभावाची बनतात व त्यांची मागणी पूर्ण झाली नाही तर थेट मातापित्याला ती स्वत:च्या जीवाची हानी करण्याच्या धमक्या देतात. काही मातापिता मुलांच्या या धमक्यांना घाबरुनच त्यांची प्रत्येक अयोग्य मागणी पूर्ण करतात, तर याच्या उलट काही पालक या धमक्यांना वायफळ समजतात. जे बोलून दाखवतात, त्यांना प्रत्यक्षात ती कृती करण्याचे धाडस नसते असे मानून आपल्या मुलांना पूर्णपणे आपल्या नियंत्रणात ठेवतात. पण अशाने मुलांच्या वागण्याच्या पध्दतीत मोठा बदल होत नाही. कधीकधी मुले त्यांची वाणी सत्यात उतरवतात. अशा वेळी त्यांची भाषा एकदम बदलते. मरण्याचा, मारण्याचा उल्लेख ते एकसारखा आपल्या भाषेत करत असतात. आणि अहिताच्या दिशेने वळण्याचे हेच त्यांचे प्रथम पाऊल असते, हे मातापित्यांनी समजावे.

नकारात्मक विचारांचा समाज

आजकाल आपल्याकडे मनोरंजनाच्या नावाखाली उपलब्ध मोबाईल, संगणक ह्या समस्येत स्वत:चा हातभार लावत आहे. त्यामुळे लहान मुलांकडे पूर्णतः मोबाईल सोपवणे, चुकीचे आहे. मोबाईलवर येणारे विविधांगी व्हिडिओ मुले पाहतात, व त्याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या मनावर निरंतर होत असतो. त्यामुळे जर आपण मुलांना मोबाईलपासून दूर ठेवले तर नक्कीच त्यांचा खरा विकास होईल.

मनाची अस्वस्थ अवस्था

जर एखादे हुशार मूल अचानक अस्वस्थ झाले असेल, किंवा त्याचे कुठल्याही बाबतीत लक्ष लागत नसेल, तर मग ते शाळेत असो किंवा घरात. त्या मुलाच्या मुखावर नेहमीच निराशेचे भाव दिसून येतात. आणि एकाएकी मुलांच्या स्वभावात आलेला हा बदल आई वडिलांच्या सहज लक्षात येतो. त्यामुळे मुलांच्या स्वभाव परिवर्तनाच्या बाबतीत, पालकांचे नीट लक्ष असणे गरजेचे आहे. काही मुलांना जन्मापासूनच मानसिक विकार असल्यामुळे असे विचार मनात येतात. यावर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

सामाजिक सहभागाचा अभाव

जे मूल सामाजिकरित्या नेहमीच सक्रीय असते, ते मूल साखरेप्रमाणे सहज लोकांमध्ये मिसळून जाते. पण अचानक जर एखादे सर्वांगीण विकास झालेले मूल, एकांताची निवड करत असेल किंवा, कुणाशी मिळून मिसळून बोलणे त्याने कमी केले असेल तर नक्कीच त्याचे नैराश्य सर्वांच्याच लक्षात येते. कारण ज्या वेळी मुलांवरचा ताण अव्यक्तच राहतो, त्यावेळी त्या तणावाचे स्वरुप वाढते व ते मेंदूवर हावी होते. ज्या क्षणी ताण मेंदूवर नियंत्रण प्राप्त करु लागतो, त्यावेळी एक व्यक्ती तणावाखाली आल्यामुळे आत्महत्येसारखे विचार मनात येऊ लागतात. त्यामुळे मुलांच्या वर्तनावर मातापिता व शिक्षकांनी बारकाईने लक्ष द्यावे.

रात्रीच्या वेळेस निद्रेच्या वेळापत्रकात बदल

जसे की आपल्याला माहीत आहेच की जर मन शांत असेल, तरच शांत झोप लागते. मनात कुठलीही चिंता ठेवून, एक मूल शांत झोपू शकत नाही. आत्ताच्या या स्पर्धात्मक युगात दिवसभरात आपल्याला ५ मिनिटे सुध्दा आराम करण्यासाठी मिळत नाहीत. त्यामुळे रात्रीच्या वेळी कमीत कमी निदान ६ तास झोप पूर्ण होणे गरजेचे आहे, तरच आपले आरोग्य सशक्त रहाते. त्यामुळे जर एखादे मूल अस्वस्थ असेल तर नक्कीच ते शांतपणे झोपू शकणार नाही. त्यामुळे कितीतरी हाका मारल्यानंतर जागे होणारे मूल जर अचानक रात्रीच्या वेळेस झोपेसाठी व्याकूळ होऊ लागले, तर नक्कीच आई बाबा हे समजून जाईल की माझ्या मुलाला मानसिक वा शारीरिक त्रास होत आहे, ज्यामुळे त्याला झोप लागत नसेल. व अशा प्रसंगात शक्य तितक्या लवकर, मातापित्याने मुलाच्या डोक्यातला हा विचार कायमचा काढून टाकण्याकरीता प्रयत्नशील रहाणे गरजेचे आहे.

हानिकारक वस्तूंचा शोध घेणे

मुलाच्या मानसिक विचारसरणीत, काळाप्रमाणेच बदल होत असतो. त्यामुळे स्वत:बाबतीत वाईट विचार करणारी मुले नक्कीच घरातील चाकू, सुरा, विष ह्यासारख्या हानिकारक गोष्टी शोधण्याचा प्रयत्न करणार. आणि त्यांची ही वागणूक नक्कीच पालकांना खटकणे महत्त्वाचे आहे. कारण आपण सुऱ्यासारख्या हत्यारांपासून मुलांना सतत दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही जर वारंवार मूल बारकाईने या सर्व गोष्टींकडे लक्ष देत असेल तर नजरअंदाज करण्यासारखा हा मुद्दा नसून खूप गंभीर स्वरुप धारण करणारा विचार आहे.

ज्या प्रमाणे वातावरण भीषण स्वरुप धारण करण्याअगोदर, पूर्वसंकेत देते, तसेच पूर्वसंकेत मुलांकडूनही प्राप्त होत असतात. मातापित्याने जर मुलांसोबत वेळ घालवला, तर मुलांना या संकटातून वाचवू शकतो. नक्कीच विचार करा. आता मुलांना नकारात्मकतेपासून दूर ठेवण्याकरीता पालक काय करु शकतात याचा उर्वरीत भाग आपण पुढच्या लेखात पाहूया.