मुंबई-पुणे महामार्गावर अपघात; आज बीडमध्ये अंत्यसंस्कार
मुंबई : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी पहाटे अपघाती निधन झाले. ते ५२ वर्षांचे होते. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील भाताण बोगद्याजवळ त्यांच्या गाडीचा पहाटे ५.५८ वाजताच्या सुमारास अपघात झाला. त्यांना तत्काळ मदत मिळाली नाही. ते तासभर घटनास्थळीच पडून होते. त्यानंतर सकाळी त्यांना पनवेलमधील एमजीएम रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पार्थिवावर सोमवारी दुपारी बीडमध्ये अंत्यसंस्कार होणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी विनायक मेटेंच्या दुर्दैवी निधनावर शोक व्यक्त केला आहे. मेटे हे आपले एक सहकारी आणि बॉडीगार्ड यांच्यासोबत मुंबईच्या दिशेने येत असताना हा अपघात झाला. रविवारी दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मराठा आरक्षणासंदर्भातील बैठकीसाठी ते मुंबईला येत होते.
चौकशीसाठी ड्रायव्हर ताब्यात
दरम्यान, विनायक मेटे यांच्या मृत्यूबद्दल काही नेत्यांनी तसेच शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांनी शंका उपस्थित केली आहे. या अपघातात विनायक मेटे यांचा ड्रायव्हर एकनाथ कदम याला किरकोळ जखम झाली आहे. अपघाताबाबत अधिक माहितीसाठी नवी मुंबई पोलिसांनी ड्रायव्हरला ताब्यात घेतले होते. त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून त्याला आता रसायनी (रायगड जिल्हा) पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे. अपघाताबाबत एकनाथ कदम यांच्याकडून सविस्तर माहिती पोलीस घेणार आहेत. यासंबंधी त्याचा जबाब नोंदवून घेतला जाणार आहे. विनायक मेटे यांचा अपघात झाला तेथील सीसी टीव्हीदेखील तपासण्यात येणार आहेत.
विनायक मेटे यांचे पहाटे निधन झाले. त्यात त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली होती. त्यांचे निधन घटनास्थळी झाले होते. त्यांना सकाळी ६.२० मिनिटांनी रुग्णालयात आणले असता, त्यांची तपासणी करण्यात आली, तेव्हाच त्यांचा मृत्यू झाला होता. त्यांच्या गाडीचा ड्रायव्हर आणि एक पोलीस हे देखील या अपघातात गंभीररित्या जखमी झाले आहेत. आमचे डॉक्टर त्यांना उपचार करण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. त्यांच्या ड्रायव्हरची प्रकृती मात्र चांगली आहे. असे एमजीएम हॉस्पिटल मेडिकल डायरेक्टर कुलदीप सलगोतरा यांनी सांगितले.
मेटेंचा ड्रायव्हर एकनाथ कदम यांनी सांगितले, आम्ही बीडवरून मुंबईला जात होतो. पहाटे ५ च्या सुमारास रस्त्यात एका ट्रकने आम्हाला हुल दिली. या ट्रकच्या बंपरमध्ये आमची कार अडकली. त्याच स्थितीत आमची कार काही अंतरापर्यंत फरफटत गेली. पण मदत पोहोचण्यासाठी तासभर लागला. मी पोलीस नियंत्रण कक्षाला फोन केला. पण, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. सकाळी ६ च्या सुमारास रुग्णवाहिका आमच्यापर्यंत पोहोचली.