सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर

एक डोळा गमवावा लागण्याची शक्यता

|
14th August 2022, 12:16 Hrs
सलमान रश्दी व्हेंटिलेटरवर

न्यूयॉर्क : पश्चिम न्यूयॉर्कमध्ये एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या जीवघेण्या हल्ल्यातून बचावल्यानंतर प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. शस्त्रक्रियेनंतर त्यांना एक डोळा गमवावा लागू शकतो, असे वृत्त ‘न्यूयॉर्क टाईम्स’ने दिले आहे. भारतीय वंशाचे ब्रिटिश-अमेरिकन लेखक सलमान रश्दी यांच्यावर न्यूयॉर्कमधील चौटौका इन्स्टिट्यूटमध्ये आयोजित व्याख्यानादरम्यान एका व्यक्तीने चाकूने हल्ला केला होता. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या रश्दींवर सध्या उपचार सुरू आहेत.
सलमान रश्दी यांच्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या पुस्तकातील काही मुद्द्यांवरून इराणकडून रश्दी यांना जीवे ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्या होत्या. या पुस्तकाला १९८८ पासून इराणमध्ये बंदी आहे. या पुस्तकात ईश्वरनिंदा केल्याचे मुस्लीमधर्मीय मानतात. इराणचे दिवंगत नेते अयातुल्ला रुहोल्ला खोमेनी यांनी रश्दी यांच्या मृत्यूबद्दल बक्षीस देण्याचा फतवा जारी केला होता. रश्दींची हत्या करणाऱ्या व्यक्तीला ३ दशलक्ष डॉलर्सचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते.