गोव्यातही एखादा भास्कर, पोपटराव तयार व्हावा !

मी उल्लेख केलेले भास्कर पेरे पाटील आणि पोपटराव पवार कोण, असा काहीजणांना प्रश्न पडला असेल. पण अनेकांना त्यांची नावे माहीत आहेत. सोशल मीडियामुळे त्यांची भाषणे, नावे अनेकांना ओळखीची आहेत. १,५२८ पंचांपैकी काहींनी जरी त्यांनी केलेल्या कार्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तरीही गोव्यात क्रांती घडू शकते.

Story: उतारा | पांडुरंग गांवकर |
13th August 2022, 11:31 pm
गोव्यातही एखादा भास्कर, पोपटराव तयार व्हावा !

गोव्यातील १८६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. १,५२८ पंच या निवडणुकांमधून निवडून आले. त्यात ६४ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. त्यामुळे १,४६४ प्रभागांसाठी निवडणूक झाली. ५,०३८ उमेदवारांनी आपले भवितव्य आजमावले. २१ वर्षाच्या तरुणापासून ते ८२ वर्षे वय असलेल्या उमेदवाराने निवडणूक लढवून विजयही मिळवला. सु

मारे ७८.७० टक्के मतदान झाले. अजून पाच पंचायतींच्या निवडणुका व्हायच्या आहेत. वेळेत न झालेल्या निवडणुका तीन महिने उशिरा झाल्या असल्या तरी सर्व पंचायतींना आता पंच मंडळ मिळाले आहे. यानंतर नेहमीप्रमाणे पंचायतीचा कारभार सुरू होईल. पाच वर्षांनी पुन्हा निवडणुका येतील.

नेहमीप्रमाणे कारभार सुरू होईल असे म्हणण्यामागचे कारण म्हणजे बहुतांशी पंचायती पंचायत क्षेत्राचा विकास करण्यात मागे पडतात. कितीतरी पंच फक्त खुर्चीच्या मागे लागून अविश्वास ठरावाच्या राजकारणातच गुंतून राहतात. एकदा निवडून दिलेल्या पंचाच्या नावे पाच वर्षे संपत आल्यानंतर लोक शंख करतात. पण यातही एक सकारात्मक गोष्ट अशी की अनेक पंचायती आपल्या पंचायत क्षेत्रात सर्वांगीण विकासही करतात. कितीतरी पंच लोकसेवेसाठीही सक्रिय असतात. पंच म्हणून निवडून आलेल्या प्रत्येकाने जर आपल्या प्रभागाचा चौफेर विकास करण्यासाठी मेहनत घेतली तर गोव्याचे चित्रच बदलू शकते. ज्या स्वयंपूर्ण गोव्याचे स्वप्न मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत पाहत आहेत ते स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्यासाठी पंचायतींवर निवडून आलेले सदस्यच मदत करू शकतात. पण त्यासाठी पंचांजवळ इच्छाशक्ती हवी. सरकारने आपल्या अधिकाऱ्यांसोबत पंचायत सदस्यांनाही स्वयंपूर्ण मोहिमेची जबाबदारी द्यावी. गावागावांत लोकांना स्वयंपूर्ण करण्याचे काम द्यावे.

पंच हा गावाचा लोक प्रतिनिधी असतो. प्रथम नागरिक. गावाच्या गटारापासून ते निराधारापर्यंत सर्वांबाबत त्याला जाण असायला हवी. गोव्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतकेच पंच आपल्या प्रभागासाठी सतत काहीतरी करत असतात. पंचायत कायद्यापासून ते ग्रामसभेच्या नियमांपर्यंत सर्व गोष्टींची जाणीव असलेला पंच मिळावा. निवडून आलेल्या पंचाने आपल्याला कुठले अधिकार आहेत, त्यासाठी पंचायत कायदा वाचावा. बाकी गोष्टींची जाणीव नसली तरी गावाविषयी जाणीव असायला हवी. आपल्या प्रभागाविषयी जाणीव ठेवणाऱ्यांमधूनच गोव्यात एखादा भास्कर पेरे पाटील किंवा पोपटराव पवार पुढे यावा.

आता मी उल्लेख केलेले भास्कर पेरे पाटील आणि पोपटराव पवार कोण, असा काहीजणांना प्रश्न पडला असेल. पण अनेकांना त्यांची नावे माहीत आहेत. सोशल मीडियामुळे त्यांची भाषणे, नावे अनेकांना ओळखीची आहेत. १,५२८ पंचांपैकी काहींनी जरी त्यांनी केलेल्या कार्याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला तरीही गोव्यात क्रांती घडू शकते.

पोपटराव पवार हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यातील हिवरे बाजार पंचायतीचे सरपंच. १९८९ साली ते सरपंच झाले. त्यापूर्वी त्यांचा गाव दुष्काळ, बेरोजगारी, गुन्हेगारी, व्यसन अशा अनेक गोष्टींनी ग्रासला होता. पोपटरावांनी महाराष्ट्र आदर्श घेईल अशा पद्धतीने गावात बदल घडवले. दुष्काळाची कोरड हिरवळीत रुपांतरीत केली. पोपटरावांना ‘पद्मश्री’ पुरस्काराने गौरविण्यात आले. पूर्वी अण्णा हजारेंच्या राळेगणसिद्धीचे नाव घेतले जायचे. त्याच राळेगणसिद्धीचा मॉडेल पोपटरावांनी राबवला. पॅटर्न तोच. गाव समृद्ध केला.

भास्कर पेरे पाटील हे महाराष्ट्रातील औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा गावचे सरपंच. त्यांच्या सरपंचपदाच्या कारकिर्दीत पाटोदा गावाला दोनवेळा राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त झाला आहे. महाराष्ट्र सरकारचाही त्यांना पुरस्कार प्राप्त झाला आहे. आदर्श गाव म्हणून पाटोदाची ओळख आहे. कचरा विल्हेवाट लावण्यापासून ते गरम पाण्यापर्यंत सगळ्या सुविधा पंचायत देते. महाराष्ट्रातील आदर्श गावांपैकी पाटोदा एक आहे.

गोव्यातील पंचायत क्षेत्रांमध्ये अशा सुधारणा करण्यासाठी खूप वाव आहे. कचरा विल्हेवाट, पडीक पडलेली शेत जमीन पुनर्जिवित करणे, फलोत्पादन, डेअरी, कुकुटपालन अशा कितीतरी योजना गावोगावी सहकारी तत्वावर राबवणे शक्य आहे. ज्यातून स्वयंरोजगार निर्माण होईल. ग्रामपंचायत स्तरावर प्रदूषण मुक्त असे काही गृहउद्योगाचे युनिट उभारणेही शक्य आहे. भाजी उत्पादनात गोव्यात क्रांती होऊ शकते. फक्त गावाचा विकास करण्यासाठीची इच्छाशक्ती हवी. कृषी, पशुसंवर्धन, जलस्रोत, जिल्हा पंचायत, आरडीए, सार्वजनिक बांधकाम अशा अनेक खात्यांकडून गावात विकासकामे करता येतात. निवडून आलेल्या पंचांनी आपला प्रभाग, आपली पंचायत आदर्श करण्याचा निर्णय घेतला तर काहीच अशक्य नाही. पंच म्हणून निवडून आल्यानंतर तुम्हाला पाच वर्षे मिळतात. पाच वर्षे पंच गावाचा लोक प्रतिनिधी असतो. त्याला खूप काही करण्याची संधी असते. फक्त त्याने खांद्यावर घेतलेली जबाबदारीच जाणीवपूर्वक पार पाडायला हवी. भास्कर पेरे पाटील आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या यू-ट्युबवर असलेल्या दोन लिंकचा तपशील येथे देत आहे. वेळ काढून ऐका.

https://www.youtube.com/watch?v=dMCmkOrtdvY

https://www.youtube.com/watch?v=uUJ8_yuCHO0