‘हर घर तिरंगा' ला उत्तम प्रतिसाद

मंत्री सुभाष फळदेसाई : राज्यभरात विविध कार्यक्रमांची उत्साहात सुरुवात

|
13th August 2022, 10:57 Hrs
‘हर घर तिरंगा' ला उत्तम प्रतिसाद

पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री सुभाष फळदेसाई, डावीकडून सर्वानंद भगत, गोरख मांद्रेकर, नवीन रायकर.   

प्रतिनिधी : गोवन वार्ता
पणजी :
राज्यात शनिवारपासून 'हर घर तिरंगा' उपक्रमाची सुरुवात झाली. ५० टक्क्यांपेक्षा अधिक नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे. प्रभातफेरी, मशाल मोर्चा तसेच स्वच्छता मोहिमेलाही सर्व ठिकाणी सुरुवात झाली आहे, अशी माहिती उपक्रमाचे संयोजक समाजकल्याण मंत्री सुभाष फळदेसाई यांनी दिली. पणजी येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत सर्व पातळीवर हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी भाजपतर्फे राज्य पातळीपासून ग्रामीण भागातील गटस्तरापर्यंत विविध समित्यांच्या माध्यमातून काम सुरू आहे, असे ते म्हणाले. देशाचा अमृतमहोत्सवी स्वातंत्र्यदिन सर्वजण मिळून उत्साहात साजरा करू, असे ते यावेळी म्हणाले. अबालवृद्धांनी या उत्साहात सहभागी होऊन याची शोभा वाढवावी, असे आवाहन त्यांनी यावेळी केले. राज्यातील विविध सामाजिक संस्था, उद्योगसमूह, शैक्षणिक संस्था यांच्यासह सर्व प्रकारच्या खाजगी इमारतींवरही ध्वज लावावेत, असे ते म्हणाले.
देशाच्या स्वातंत्र्याचे अमृतमहोत्सवी वर्ष जेवढ्या उत्साहात साजरे केले जात आहे ते पाहता सुवर्णमहोत्सवी वर्ष मात्र फारशा उत्साहाने साजरे केले गेले नव्हते. पण, आता हा उत्सव आपण एकत्र जल्लोषात साजरा करू, असे म्हणत त्यांनी काँग्रेसला टोला मारला. पत्रकार परिषदेला उपक्रमाचे सह-संयोजक गोरख मांद्रेकर, सर्वानंद भगत व भाजप आयटी सेलचे प्रमुख नवीन रायकर उपस्थित होते.
समाजमाध्यमांवर व्यक्त व्हा
मंत्री फळदेसाई यांनी सर्वांना समाजमाध्यमांवरील आपल्या प्रोफाईल पिक्चरसोबत तिरंग्याचे छायाचित्र जोडावे, असे आवाहन केले. ज्यांना याबाबत माहिती नाही त्यांनी आपल्या घरातील तरुण मुलांकडून तो करून घ्यावा, असे ते म्हणाले. तसेच विविध ब्लॉग, व्हलॉगच्या माध्यमातून देशाप्रती असणारे प्रेम व्यक्त करण्याचे तसेच स्वातंत्र्याच्या आठवणी सांगण्याचे आवाहन त्यांनी केले.
कुठे असतील तर सांगा आणखी विकत घेतो...
कमी किमतीत मिळणारे ध्वज जास्त किमतीत खरेदी करून भाजपने व्यवसाय केला आहे. या काँग्रेसच्या आरोपाला उत्तर देताना मंत्री फळदेसाई यांनी जर तुम्हांला माहीत असेल तर आणखी कुठे मिळत असतील तर सांगा आणखी विकत घेतो, असे उत्तर दिले. तसेच आर्थिक कारणांमुळे कुणाला ध्वज खरेदी करण्यात काही अडचण असेल तर त्यांनी भाजप कार्यालयाशी संपर्क साधून मोफत ध्वज घ्यावेत व आपल्या घरावर लावावेत, असे आवाहन केले.
ध्वज उतरविण्याचे नियम केले शिथिल
राष्ट्रध्वजाचा अपमान होऊ नये यासाठी दरवर्षी ध्वजारोहण झाल्यानंतर सायंकाळच्या वेळी ध्वज उतरविला जातो. मात्र, अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त हे नियम शिथिल करण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच एखाद्या घरावरचा अथवा संस्थेवरचा ध्वज तिरका झाला असेल तर त्यांना सांगून तो सरळ करून घ्यावा. त्याचा समाजमाध्यमांवर गैरप्रचार करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.