गूगल पे

या टेक्नोलॉजीचे जेवढे फायदे, तेवढेच तोटेही असतात. ती कधीही अडचणीत पाडू शकते. मी ठरवलं गूगल पे वर अवलंबून रहायचे नाही.


12th August 2022, 11:54 pm
गूगल पे

आज रजनी ताईच्या घरी गेले होते. त्यांचे पैसे परत करायला. मला म्हणाली एवढी घाई का केलीस? शिवाय चहा घे म्हणून आग्रहाला पेटली. ती म्हणाली, "काल तुला गरज होती, उद्या कधी दुसऱ्याला गरज लागली तर तू नक्की मदत कर." 

झालं असं. मी काल घरी परतत होते. वाटेत बराच पाऊस आणि मी रेनकोटही सोबत घेतला नव्हता. पावसाळ्यात घराबाहेर पडणं किती कंटाळवाणं असतं ना.. पण काय करायचं? किमान सामान आणायला बाहेर तर जावंच लागणार ना! सामान घेतलं पण हा एवढा पाऊस पडणार याची कल्पना कुठे होती. इथून घर थोडं लांब होतं आणि भिजलेल्या अवतारात घरी गेले तर दुसऱ्या दिवशी सर्दी, शिवाय आई ओरडेल! मी ताबडतोब बाईक रस्त्याच्या कडेला उभी केली. आईला फोन करुन कळवलं की पाऊस थांबल्यावर घरी निघते. 

मी अर्धा तास एका हॉटेल समोर थांबले होते, पण हा पाऊस काही विश्रांती घ्यायचं नावच घेत नव्हता. मला घरी जायची अतिशय घाई होती. मी ज्या हॉटेल समोर थांबले होते, त्यातून नुकत्याच तळलेल्या कांदा भजी आणि बटाटावड्यांचा खमंग वास सर्वत्र पसरला होता. थंड वातावरण, रिमझिम पडणारा पाऊस आणि कांदा भजी. किती मस्त संयोजन (कॉम्बिनेशन) आहे. सोबत एक कडक गरम चहा मिळाली तर वाह! वाह! मज्जाच येईल.

मी हॉटेलमध्ये शिरले.. अरे! अरे! मी तर पैसेच आणले नाही. जे होते ते सामानासाठी खर्च केले आणि हॉटेलमध्ये कशी काय आले? मी आल्यापायी परतले. हॉटेलच्याबाहेर आल्यावर मला आठवलं, माझ्या फोनवर तर 'गूगल पे' आहे! पण प्रश्न हा होता की या हॉटेलमध्ये गूगल पे घेतील की नाही? मी वळले आणि पुन्हा हॉटेलमध्ये गेले. काउंटरवर बसलेल्या दादांना विचारले, "दादा गूगल पे एक्सेप्ट करतात का?" दादा म्हणाले,"अगं हो, का नाही करत? आजकाल सगळीकडे हेच चालतंय. सुट्टे पैसे नाही तर फोन उघडायचा, स्कैन करायचा आणि काही क्षणातच पैसे एका अकाऊंटवरुन दुसऱ्या अकाऊंटवर ट्रांसफर. "हो ना काका, गूगल पे मुळे व्यवहार किती सोपा झालाय." मी खूश होऊन म्हणाले आणि थाटात आत जाऊन टेबलवर बसले. एक प्लेट कांदा भजी, बटाटावडे आणि कडक चहा घेतला. खिडकीतून रिमझिम पडणारा पाऊस, पावसाची टीप-टीप ध्वनी, अधून-मधून वाहणारे थंड वारे आणि सोबत गरम-गरम कांदा भजी व कडक चहा! आहाहाsss मजा आ गया.. मी मनसोक्त खाऊन तृप्त झाले होते. एक कांदा भजी बांधूनही द्यायला सांगितली होती. माझं खाऊनही झालं होतं आणि पाऊसही थांबला होता. आता मी घरी जायला मोकळे! 

मी काउंटरजवळ आले. फोन काढून गूगल पे उघडला आणि विचारलं,"दादा स्कैन कोड?" दादांनी स्कैनर माझ्या पुढ्यात ठेवला. मी कोड स्कैन केला, शंभर रूपयांची रक्कम टाकली आणि पासवर्ड घातला. लोडिंग! लोडिंग! लोडिंग! काउंटवरचा दादा माझ्या फोनकडे टक लाऊन पाहत होता. मी म्हणाले, "कधी-कधी नेटवर्क मुळे पैसे ट्रान्सफर व्हायला थोडा वेळ लागतो ना... दोन मिनटं सतत प्रयत्न केल्यावर एक मैसेज आला, "बैंक ट्रांसेक्शन फेल्ड, यूअर मनी हेज नॉट बिन डेबिटेड"  मी म्हणाले,"दादा, काही कारणांमुळे पैसे ट्रांसफर होत नाहीत. मी पुन्हा स्कैन करते. पुन्हा एकदा अयशस्वी प्रयत्न केला, पण बैंकचा सर्वर डाउन झाल्यामुळे पैसे काही ट्रान्सफर होईना. 

मी संभ्रमात पडले. माझ्याकडे नोटही नव्हते आणि कार्डही नव्हते. फक्त एकमेव आधार होता, तो होता गूगल पे! आता काय करायचं? मी दादांना म्हटले,"अहो दादा, गूगल पे चालत नाही.. मी तुमचे पैसे उद्या देऊ का?" "अगं मुली, आम्हाला उधारी करायची परवानगी नाही. मालकांनी सांगितलं आहे उधार द्यायचे नाही." 

आता मला काही सुचेना. अचानक माझ्या डोळ्यांसमोर रजनी ताईची छवी उमगली. रजनी ताई अत्यंत प्रेमळ, प्रामाणिक आणि दयाळू असे व्यक्तिमत्त्व. त्यांचा घरातच कपडे शिलाईचा व्यवसाय होता. लहान असताना आई सोबत मी अनेकदा तिथे जायचे. त्यांचं घर इथून जवळच होतं. मला खात्री होती की त्या माझी नक्कीच मदत करतील. 

"मी दोन मिनटात तुमचे पैसे घेऊन येते. इथे समोरच ज्या रजनीताई राहतात, त्यांना मी ओळखते. ही बघा माझी बाईक इथेच आहे!" मी बाईककडे बोट दाखवित म्हणाले. दादा म्हणाले,"हो लवकर या बरं हॉटेल बंद करायची वेळ झाली. ते बघा घड्याळात साडे आठ वाजत आले."  

मी धावत-पळत रजनीताईच्या घरी पोहोचले. दार वाजविले. रजनीताईनेच दार उघडले आणि हसतमुखाने माझं स्वागत केले,"अगं ये, आत ये. अशी धापा टाकत का आलीस?" मी एका श्वासात ताईंना घडलेली घटना सांगितली. रजनी ताई म्हणाली,"अगं एवढंच ना. हे घे शंभर रुपये." काही संकोच न करता त्यांनी पैसे माझ्या हातावर ठेवले. मी म्हणाले, "तुमचे खूप-खूप आभार ताई, मी लवकरच तुमचे पैसे परत करीन" यावर प्रतिउत्तर करत ताई म्हणाल्या,"कसलीच घाई करु नकोस, आरामात दे!" 

मी शंभर रुपये मुठीत घेऊन, घाई-घाईत हॉटेलकडे पळाले. पैसे दादांच्या स्वाधिन केले आणि मी घरच्या दिशेने वळले.

या टेक्नोलॉजीचे जेवढे फायदे, तेवढेच तोटेही असतात. ती कधीही अडचणीत पाडू शकते. मी ठरवलं गूगल पे वर अवलंबून रहायचे नाही. पैसे घेतल्याशिवाय घराबाहेर पडायचं नाही.. क्योंकि कुछ मामलों में टेक्नोलॉजी का कोई भरोसा नहीं!