बॉडी डिस्मॉर्फिया

आजकालच्या सेल्फी-युगात परफेक्ट दिसण्याच्या ओढीतून 'बॉडी डिस्मॉर्फिया' हा मानसिक त्रास वाढत आहे. नसलेल्या त्रुटींचा बाऊ करून स्वतःच्या बाह्यरूपाला नाकारणे आणि आत्मविश्वासाला कुरतडणे हीच ह्या विकाराची मुख्य लक्षणे आहेत.

Story: मनी मानसी |
05th December, 09:57 pm
बॉडी डिस्मॉर्फिया

आजकालच्या सेल्फी-युगात आरशापुढे उभं राहणं म्हणजे जणू एखाद्या परदेशात व्हिसा-पडताळणीला जाण्यासारखं झालं आहे. पासपोर्ट फोटोमध्ये जसा चेहरा कधीच नीट दिसत नाही, तसंच स्वतःच्या बाह्यरूपाविषयीचं समाधानही काही लोकांना अजिबात वाटेना अशी परिस्थिती होऊन बसली आहे.

आणि कधी कधी हे फक्त डाव्या कोनातून पाहा, उजव्या अँगलने हसून पाहा, फिल्टर लावा एवढ्यावरच थांबत नाही. उलटपक्षी, मनाच्या खोल कप्प्यात एक चिंताग्रस्त आवाज सतत घुमत राहतो, “मी अशी दिसते म्हणजे... मी पुरेशी नाही का?” परफेक्ट दिसण्याची ही धडपड इतकी सर्वव्यापी झाली आहे की दुर्दैवाने तिचे रूपांतर एका मानसिक त्रासात झाले आहे, ज्यास आम्ही 'बॉडी डिस्मॉर्फिया' असे म्हणतो.

शरीरात त्रुटी नसतानाही त्रुटी दिसण्याचा खेळ!

काही दिवसांपूर्वी माझ्याकडे एक तरुण मुलगी आली होती. तिच्या चेहऱ्यावर एक हलकासा पिंपल होता आणि मनात मात्र पर्वताएवढं भय.

ती म्हणाली, “मॅम, हा पिंपल कसा दिसतोय, लोकांना काय वाटेल? मी... मी खराब दिसतेय ना?” मी तिच्याकडे पाहिलं. तिचा चेहरा नाही, तर तिच्या डोळ्यांतल्या भीतीकडे. ती भीती पिंपलची नव्हती. ती भीती होती नाकारलं जाण्याची. आणि त्याच क्षणी कळलं, की बॉडी डिस्मॉर्फिया हा मुळी शरीराचा नसतोच!

खरंतर, बॉडी डिस्मॉर्फिया म्हणजे शरीरातील एखादी अगदी छोटीशी किंवा वस्तुतः नसलेली कमतरता प्रचंड वाढवून बघण्याची एक मानसिक अवस्था. म्हणजे, आपल्या शरीरात जे असंख्य अवयव असतात, जसे की नाक, त्वचा, वजन, ओठ, रंग, केस, पोटाची ढेरी, इत्यादी. आता ह्यात कधी नगण्य, तर कधी चक्क अस्तित्वातही नसलेल्या त्रुटींकडे जेव्हा आपण अति लक्ष देऊ लागतो, तेव्हा कालांतराने ही सवय एका मानसिक आजाराचे रूप घेऊ शकते. काही लोक तासन्तास आरशापुढे थांबतात, तर काही मात्र महिनोंमहिने आरशाला स्पर्शही करत नाहीत. म्हणजे एक तर अतोनात पाहणं, नाहीतर पूर्ण टाळणं ही दोन्ही टोकं ह्याच समस्येची दोन रूपं आहेत.

बॉडी डिस्मॉर्फिया हा आत्मविश्वास कुरतडणारा विचार आहे. आरसा आंतरिक असुरक्षितता दाखवतो, ज्यामुळे सतत मान्यता मिळवण्याचा प्रयत्न होतो, पण समाधान मिळत नाही. याचा परिणाम कॉस्मेटिक उपचार किंवा क्रॅश डायटिंगमध्ये होतो.

परंतु हे असे का होते?

बालपणातील कुचेष्टा, टीका आणि परफेक्शनची ओढ हीच शारीरिक न्यूनगंडाची मूळ बीजे आहेत, जी हार्मोनल बदलांमुळे अधिक तीव्र होतात. लक्षात घ्या: हा न्यूनगंड शरीराविषयी नसतोच; तर तो आपल्या मनातील असुरक्षितता, नाकारले जाण्याची भीती आणि अपूर्णतेच्या भावनांचे बाह्य रूपांतर असते. शरीर फक्त त्याचे सोपे लक्ष्य ठरते.

ह्यावर उपाय?

  • यावर उपाय हा दृष्टीकोन बदलण्यात असतो.
  •  बाह्य रूपाकडे नव्हे, तर आपल्या अंतर्मनाच्या 'तू कशी आहेस' या प्रश्नावर लक्ष द्या.
  •  रूपाऐवजी जगवणाऱ्या शरीराचे आभार माना.
  •  आरशाकडे भीतीने नाही तर जिज्ञासेने पाहणे.
  •  “मी दिसते तशीच पुरेशी आहे” हा नवा विचार जाणीवपूर्वक मनी रूजवणं.

बॉडी डिस्मॉर्फिया 'सुंदरतेच्या' व्याख्येशी जोडलेला आहे. शरीर बदलण्याऐवजी मनाशी मैत्री करा; कारण आरसा फक्त प्रतिबिंब दाखवतो, आत्ममूल्य आपणच ठरवतो.


- मानसी कोपरे

मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशक

डिचोली - गोवा 

७८२१९३४८९४