ज्ञान, संस्कार व प्रेरणेचा अमृतस्त्रोत: गुरु डॉ. अलका देव मारूलकर

डॉ. अलका देव मारूलकर या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका आणि अष्टपैलू व्यक्तिमत्त्व आहेत. शिस्तप्रिय गुरु आणि प्रेमळ आईच्या रूपात लाभलेल्या त्यांच्या सान्निध्यामुळे संगीत शिक्षणच जीवन बनून गेले.

Story: तपस्विनी |
05th December, 10:06 pm
ज्ञान, संस्कार व  प्रेरणेचा अमृतस्त्रोत: गुरु डॉ. अलका देव मारूलकर

सद्गुरु लाभणे ही आपल्या जीवनातील एक अत्यंत भाग्याची गोष्ट आहे. कबीरांनी म्हटले आहे:

गुरु गोविंद दोऊ खडे, काके लागूं पाय ।

बलिहारी गुरू आपणो, गोविंद दियो बताया ।।

एखाद्या संगीत साधकाला त्याची साधना म्हणजे ईश्वर प्राप्तीचा मार्ग आहे आणि या मार्गावरून सावकाश बोट धरून चालवण्याचे काम गुरु करत असतात. अशा सद्गुरुचा लाभ होणे खूप कमी लोकांच्या नशिबी असते. माझ्या गुरु विदुषी डॉ. अलका देव-मारूलकर या देखील अशाच मला नशिबाने लाभलेल्या गुरु असेच मी म्हणेन. आयुष्याच्या वाटेवर जे जे गुरु लाभले, त्या सर्वांचे ऋण कधीही फिटत नाही.

मी कला अकादमीमध्ये संगीत शिक्षण घेतले व तेथील सर्व पदव्युत्तर पदविका उत्तमरित्या पूर्ण करून पुढे काही वर्षे स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे जी यांचेही मार्गदर्शन घेण्याचे भाग्य लाभले. योगायोगाने विदुषी डॉ. अलका देव-मारूलकर यांची एक कार्यशाळा गोव्यात झाली. संगीताचे सखोल ज्ञान, शिकवण्याची पद्धत, अवघड देखील सोपे करण्याची त्यांची पद्धत हे विस्मित करणारे होते. पं. तुळशीदास नावेलकर गुरूजी त्यावेळी मला म्हणाले, "यांच्यासारखा गुरू तुला लाभला पाहिजे. जाणार का तू यांच्याकडे? मी बोलतो वाटल्यास." या शब्दांनी मनात एक वेगळीच उर्मी दाटली. पण दुसऱ्याच क्षणी गोवा सोडून, कुटुंब, नोकरी सोडून जाणे-त्यांच्यापाशी शिक्षण घेणे हे स्वप्न किती फोल आहे याचा विचार मनाला खिन्न करून गेला.

पण म्हटले ना, नशिबात सद्गुरु असेल तर तो योग्य वाट दाखवतोच. अलकाताई गोव्यात कला अकादमीच्या संचालिका म्हणून रुजू झाल्या आणि माझ्यासारख्या कित्येक संगीत साधकांच्या तहानलेल्या आयुष्यावर संगीत सरी बरसू लागल्या! हे असे दिव्य योगच म्हणावे लागतील.

आमच्या अलकाताईंविषयी लिहावे तेवढे थोडेच आहे. उत्तम गुरु, आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या गायिका, उत्तम बंदिशकार, लेखिका, अनुवादिका, व्याख्यात्या, संगीतकार, चित्रकार असे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व तर त्या आहेतच, पण शिष्यांसाठी शिस्तप्रिय गुरु व तितक्याच प्रेमळ आई आहेत. त्यांच्या समोर शिष्य म्हणून बसून शिकताना छाती दडपून जाते, पण एरव्ही त्या प्रेमळ आई, अवखळ मैत्रीण, कधी मार्गदर्शिका अशी विविध रूपे आमच्यासाठी घेतात. कधी अस्वस्थ वाटले, कधी काही अडले आणि त्यांच्यासोबत फोनवर ५ मिनिटे बोलले तरी एक नवी ऊर्जा मिळते, हा स्वानुभव आहे.

त्यांच्याकडे शिक्षण सुरू झाले, तोवर माझे संगीतातील एम.ए. सुद्धा झाले होते. पण या अद्भूत गुरुची क्षमता पाहता कोरी पाटी घेऊन बालवाडीत अक्षरे गिरवणाऱ्या बाळासमान वाटले. रागाच्या सूक्ष्मातिसूक्ष्म रूपापासून ते विशाल रूपाचे दर्शन कसे घडवावे, अत्यंत अनवट राग कसा लिलया सोपा करावा, रागाचे चलन अजिबात बिघडू न देता थोडक्या वेळात रंजकपणे व शिस्तबद्धपणे कसा मांडावा, रागांचे सौंदर्यशास्त्र म्हणजे काय, लगावांवर भर देऊन गाणे म्हणजे काय, एखाद्या मैफिलीचे रसग्रहण कसे करावे या साऱ्या गोष्टी सहजपणे उलगडत गेल्या. आवड म्हणून सुरू झालेले संगीत शिक्षण जीवन बनून गेलं. सतत वाचन, चिंतन, मनन, गाणे ऐकणे, रियाज हे सर्व जीवनाचा भाग होऊन गेले.

आपल्या गोव्यातील ताईंच्या कारकिर्दीत त्यांनी अनेकांना घडवले, अनेकांना संगीताची आवड लावली, सांगीतिक संस्कार दिले. कला अकादमीतील कारकिर्दीत देखील एक शिस्त, संगीताकडे बघण्याचा दृष्टीकोन, संगीत विषयक चर्चासत्रे, नवनवीन संकल्पनायुक्त कार्यक्रम, अनेक थोर कलाकारांच्या कार्यशाळा, राग-विचार चर्चासत्रे, मल्हार रागमाला, मधुघट, उपशास्त्रीय संगीतावरील कार्यक्रम असे असंख्य कार्यक्रम राबवले व त्यात त्यांनी विद्यार्थी, शिक्षक, वादक असे सर्वांनाच सामावून घेतले. गोव्याबाहेरही बऱ्याच ठिकाणी हे कार्यक्रम झाले. बरेच काही शिकता आले. त्यांच्या संगीतबद्ध केलेल्या अनेक कविता, अनेक रागांतील बंदिशी, त्यांनी स्वनिर्मित असे राग व ठुमऱ्या, दादरे हे प्रकार शिकता व गाता आले. ताईंनी केवळ गाणंच नव्हे तर संस्कार दिले, विचार दिले!

आज २५ वर्षे त्यांच्या सान्निध्यात असल्यामुळे जीवन विषयक व संगीतविषयक एक सर्वसमावेशक विशाल असा दृष्टीकोण मिळाला.

आजच्या डिजिटल व आभासी जीवनात जेव्हा मागे वळून पाहते, तेव्हा ताईंसारख्या गुरुंची संगीतक्षेत्राला किती आवश्यकता आहे याची खात्री पटते. स्वतः जे सांगतात, तसेच जीवन जगणारे, आपल्या आचार विचारातून आपले संगीत, आपले सत्त्व जपणारी-जगवणारी अशी व्यक्तिमत्त्वे विरळाच! ताईंची आध्यात्मिक बैठक देखील उच्च दर्जाची आहे. श्री. स्वामी समर्थांच्या त्या भक्त आहेत. महर्षी ओरबिंदोच्या तत्वज्ञानाच्या व लिखाणाच्या उपासक आहेत. संत इंदिरादेवी व संत मीराबाईंच्या काव्याचा अभ्यास करून ते संत काव्य संगीतबद्ध करणाऱ्या संगीतकार आहेत. भा. रा. तांबे, मदनमोहन अशा कवी व संगीतकारांच्या चाहत्या व अभ्यासक आहेत. स्वतः उत्तम चित्रकार देखील आहेत. आपल्या पूज्य वडिलांकडून तथा गुरुंकडून उत्तमोत्तम संस्कार लाभलेल्या अशा या सरस्वती कन्येने दिनांक ४ डिसेंबर रोजी वयाची ७४ वर्षे पूर्ण करून अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केले आहे. त्यानिमित्ताने ही शब्दफुलांची माळ माझ्या या गुरूंच्या चरणी वाहून आणि माझ्या समस्त गोंयकार रसिकांच्या वतीने त्यांना निरामय आयुष्य, आरोग्य आणि स्वरानंद नित्य लाभावा हीच माता शारदेच्या चरणी प्रार्थना करते. अमृतमहोत्सवी वर्षात पदार्पण केल्याबद्दल आणि वाढदिवसानिमित्त खूप खूप अगदी आभाळभर शुभेच्छा अलकाताई! तुमच्या चरणी शिरसाष्टांग नमन.


- डॉ. शिल्पा डुबळे-परब.

पर्वरी-गोवा.