आयतार पूजन परंपरा

Story: श्रावण मास | पौर्णिमा केरकर |
12th August 2022, 11:42 pm
आयतार पूजन परंपरा

गोमंतकातली 'आयतार' पूजनाची ही परंपरा वैशिष्टपूर्ण अशीच आहे. श्रावणातील ही व्रते रंगरंगांची उधळण करीतच येतात. आषाढ सरींच्या झिम्माड बरसण्याने बेधूंद झालेली धरणी श्रावणात तशी स्वतःला सावरतेच. नवयौवनीसारखी चिरतरुण भासते. 

एक आयतार धरते नारी गे धरते नारी 

आयतार गेला गे बेला, गेला गे बेला 

थूय एक मेळला माणिक मोती गे माणिक मोती

ता मी दिला गे बाप्पा हाती गे बाप्पा हाती

बाप्पान थेयीला पेटे खणा गे पेटे खणा

मातेन काडीला येजमानपणा गे यजमानपणा

उजवाड पडला तीरभूवना गे तीरभूवना 

प्राचीन काळापासून आपल्या संस्कृतीत प्रचलित असलेली सूर्योपासना सौंदर्याची अनुभूती देणारी आहे. सूर्यासंबद्धी अनेक संकल्पना, संकेत जनमानसात रूढ आहेत. तो सृजनकर्ता असल्याने संतती प्राप्तीसाठी त्याच्याजवळ नवस केले जातात. विविध रुपात होत आलेली सूर्यपूजा म्हणूनच वैशिष्ट्यपूर्ण अशीच आहे. उषा, संज्ञा, राजी, राणूबाई या तर सूर्यपत्न्याच होत्या, त्यातील 'आदित्य आणि राणूबाईची कथा तर महाराष्ट्रात प्रसिद्धच आहे. सूर्यदेवाला लोकसंस्कृतीने सहज स्विकारले आहे. भल्या पहाटे उठून कष्टाची कामे करताना ग्रामीण स्त्रीचा सखा झाला तो सूर्यदेवच! रामप्रहरी जात्यावर दळण दळले जायचे त्यावेळी, सडा सारवण करून, सूर्याला नमस्कार करून अंतःकरणातील भाव श्रद्धायुक्त भावनेतून व्यक्त व्हायचा त्यातूनच तिच्या हृदयातील सूर्यकामना आपल्यासमोर साकारली. श्रावणमास तर तनामनांत आनंदधून वाजविणारा. सण, उत्सव व्रतांची रेलचेल असते ती याच महिन्यात. मंगलमयी, पावित्र्याची, आणि नितळपणाची साथ देणारा हा मास स्त्रियांच्या व्रतवैकल्यांना एक वेगळी लकाकी देतो. सासूरवाशीण स्त्रीला तर ही एक पर्वणीच ठरते. सगळे घर जागे होण्या अगोदर सासूरवाशीणीला उठावे लागते. जात्यावर दळण दळताना देवधर्माच्या ऐकलेल्या गोष्टी सांसारिक सुखदुःखे शब्दबद्ध होतं.

वाघाची पावला बेल आणि आयतार नावाची पत्री जिला लहान लहान गुलाबी रंगाची फुले असतात. चिड्ड्या सारखीच ही पत्री असते. सीतेचवर ही यात समाविष्ट असतो. 'पत्री' म्हणजेच विविध तऱ्हेची पाने जी रानात आढळतात. पर्यावरण संस्कृतीशी असलेले नाते यातून दिसते. या पत्रीत आणखीही वैविध्य आढळते. पत्री जमविण्यासाठीचा आनंद काही औरच असतो. आयतार व्रत करणाऱ्या स्त्रिया एकवेळचेच जेवण घेतात. त्या दिवशी देवघरात पाट ठेवला जातो, त्यावर तांब्याचा कळस नारळ व आंब्याची पाने घालतात. चंदनाने पाटावर एका बाजूला चंद्र व दुसऱ्या बाजूला सूर्य काढला जातो. त्यावर दोन द्रोण ठेवले जातात व त्यात पत्री घालून पूजा केली जाते. पूजनासाठी वापरण्या अगोदर पत्री स्वच्छ पाण्याने धुतली जाते व मगच वाहिली जाते. काही ठिकाणी तर पानवेलीच्या पानाचे दोन द्रोण करून हरयाळीची काडी वापरून शेरवाड ठेवून वर प्रत्येकी एक फूल ठेवले जाते. तर कधी कधी अळूचे पान पाटावर ठेवून वर शेरवाडाची पाने, चिड्डो, हरयाली, भटाची बोटे वाहिली जातात. भिंतीला शेण सारवून चुन्याच्या ठिपक्यांची नक्षी ही काही ठिकाणी चितारली जाते. पहिल्या रविवारी पानवेलीच्या पानाचा द्रोण दुसऱ्या रविवारी हळदीच्या पानाचा द्रोण, तिसऱ्या रविवारी कोनवेलीचा द्रोण चौथ्या शेरवाडणीचे पान व पाचव्या रविवार आल्यास विदर्भात प्रचलित असलेली 'आदित्य राणूबाईची कथा हीच प्रेरणा देते. मांगल्य, पावित्र्य, सुचिता यांचा संगम, जन्मभराचे अहेवपण, पती, मुलंबाळे, संसाराप्रतीचे प्रेम हीच यामागची प्रेरणा आहे. आपल्या संसाराची ओढ आणि सूर्य पूजा यांचे नाते जुळविताना ती म्हणते - आयताराचे दिवशी तुळशीला पाणी घालणे होई आणि घरातलं सारे आवरून मग शेतावर जावे लागायचे. या कष्टातून एक विसावा, विरंगुळा म्हणजे आयतार पूजन. पण हा विसावा कष्टापासून फारकत घेऊन नाहीच कष्टांची सोबत ही होतीच. नव्या नवरीचे दोन रविवार माहेरी, तर दोन सासरी पूजायचा प्रघात आहे. स्त्री आणि व्रते यांचा तर वेगळाच भावबंध आहेत. गोमंतकातली 'आयतार' पूजनाची ही परंपरा वैशिष्टपूर्ण अशीच आहे. श्रावणातील ही व्रते रंगरंगांची उधळण करीतच येतात. आषाढ सरींच्या झिम्माड बरसण्याने बेधूंद झालेली धरणी श्रावणात तशी स्वतःला सावरतेच. नवयौवनीसारखी चिरतरुण भासते. हिरवाळीच्या मखमालीवरती हलकीच पहुडलेली सोनेरी किरणे, ऊन पावसाचा लपाछपी खेळ, उमललेल्या तृणांकुरातून ओघळणाऱ्या टपोऱ्या थेंबातून ती स्वतःला व्यक्त करू पाहातेय. निसर्गाचा हाच सृजनोत्सव 'आयतार पूजन' परंपरेतून अभिव्यक्त होतो.

आयताराच्या दिवशी

आयतार पूजीला

आयतार पूजीला पाटावरी

रोहिणीतल्या नागा 

राख माझा मणी

राख माझा मणी जन्मोजन्मी…. 

असा आशीर्वाद ती या व्रतातून सूर्यदेवाकडे मागते…