कांपाल येथे २ लाखांचे ड्रग्स जप्त

पर्वरीतील युवकाला अटक; दोन दिवसांची कोठडी

|
10th August 2022, 12:21 Hrs

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी :
गोवा पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने सोमवारी मध्यरात्री कांपाल येथे छापा टाकून पर्वरी येथील सनील नाईक (३०, पर्वरी) या युवकाला अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख रुपये किमतीचा १२.५० ग्रॅम हेरॉईन आणि ८.४ ग्रॅम एॅक्टेसी पावडर जप्त केला आहे. अटक करण्यात आलेल्या संशयिताला पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.
अमली पदार्थ विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार, कांपाल-पणजी येथे एक युवक अमली पदार्थ तस्करी करण्यासाठी येणार असल्याचे माहिती गुप्तहेरांनी पथकाला दिली होती. त्यानुसार अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक शोबित सक्सेना आणि उपअधीक्षक नेर्लोन आल्बुकर्क यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण गावस देसाई यांच्या नेतृत्वाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक प्रियंका गरोडी, कॉ. संदेश वळवईकर, रूपेश कांदोळकर, नितेश मुळगावकर, मयुर गावडे, मंदार नाईक व इतर कर्मचाऱ्यांच्या पथकाने सोमवार मध्यरात्री २.४५ ते मंगळवार पहाटे सहा दरम्यान कांपाल येथील एका इस्पितळाजवळ सापळा रचला.
या दरम्यान गुप्तहेरांनी दिलेल्या माहितीनुसार, एक युवक त्या ठिकाणी आला असता, त्याची झडती घेतली. त्यावेळी पथकाने त्याच्याकडून २ लाख रुपये किमतीचा १२.५० ग्रॅम हेरॉईन आणि ८.४ ग्रॅम एॅक्टेसी पावडर जप्त केली. त्यानंतर पथकाने त्याची अधिक चौकशी केली असता, सदर युवक सनील नाईक असल्याची माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक रोहन मडगावकर यांनी संशयिताविरोधात अमली पदार्थ विरोधी कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली आहे. अटक केलेल्या संशयित सनील नाईक याला पोलीस कोठडीसाठी मंगळवारी सायंकाळी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे.