अनेक दिवस अन्नपाणी न घेतल्याने आकेतील सख्ख्या भावांचा मृत्यू !

वैद्यकीय अहवालातून स्पष्ट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th April, 12:57 am
अनेक दिवस अन्नपाणी न घेतल्याने आकेतील सख्ख्या भावांचा मृत्यू !

मडगाव : आके येथील बंद फ्लॅटमध्ये बुधवारी दोन सख्ख्या भावांचे मृतदेह आढळून आले होते. त्यांच्या शवविच्छेदनाच्या अहवालानुसार शरीरासाठी आवश्यक जीवनसत्वे न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला. यामुळे त्यांनी बरेच दिवस जेवणपाणी न घेतल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झालेले आहे. आता त्यांनी अन्नत्याग का केला, या कारणाचा शोध घेतला जात आहे. मात्र, ते कुटुंब दिवसरात्र धार्मिक उपासना करत होते, असे समजते.
आके येथील पॅराडाइज अपार्टमेंटमधील आतून बंद करण्यात आलेल्या फ्लॅटमध्ये मोहम्मद जुबेर खान (२९) व आफान खान (२७) या दोन सख्ख्या भावांचे मृतदेह आढळून आले होते. अग्निशामक दलाने दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढले. त्यावेळी त्यांची आई रुकसाना खान (५४) हीदेखील त्याच्यासोबत राहत होती व तिला इस्पितळात दाखल करण्यात आले.
या घटनेने राज्यभरात खळबळ उडाली. दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळातील डॉ. मधु घोडकिरेकर यांनी दोन्ही मृतदेहांची उत्तरीय तपासणी केली असता, त्यांच्या शरीरात अन्नाचा कण आढळून आलेला नाही. त्यांनी बरेच दिवस जेवण किंवा पाणी न घेतल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात स्पष्ट झाले. उत्तरीय तपासणीनंतर व्हिसेरा राखून ठेवत जुबेर व आफान या दोघांचेही मृतदेह अंत्यसंस्कारासाठी वडील नझीर यांच्या ताब्यात देण्यात आलेले आहेत.
रुकसाना खान यांच्यावर अजूनही दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात उपचार सुरू ठेवण्यात आले आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार रुकसाना यांच्यावर मनोरुग्णालयात उपचाराची गरज आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लेखी सूचनेनंतर रुकसाना यांना उपचारासाठी मनोरुग्णालयात दाखल केले जाणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जुबेर, आफान व रुकसाना हे कुटुंबीय सतत देव नामजपात व इतर विधीत मग्न असायचे. याच कारणास्तवर जुबेर याच्या पत्नीने त्याच्यापासून दूर राहणे पसंद केले होते. वडील नझीर हे त्यांच्यासाठी भाजी व इतर जीवनावश्यक वस्तू घरी आणून द्यायचे. पण, जानेवारीपासून नझीर यांनाही रुकसाना यांनी घरात येऊ दिले नव्हते. दरवाजावरूनच ते संवाद साधत पण गेले काही दिवस त्यांनी जीवनावश्यक वस्तूही घेणे बंद केले होते. दरम्यान, जुबेर, आफान यांनी बरेच दिवस का जेवण घेतले नाही, याचा पोलिसांकडून तपास केला जात आहे.      

हेही वाचा