निवडणूक कार्यासाठी नियुक्ती केल्यामुळे एलआयसी कर्मचाऱ्यांची हायकोर्टात धाव

आज सुनावणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th April, 12:33 am
निवडणूक कार्यासाठी नियुक्ती केल्यामुळे एलआयसी कर्मचाऱ्यांची हायकोर्टात धाव

पणजी : राज्यातील विविध शाखेत काम करणाऱ्या एलआयसी कर्मचाऱ्यांची लोकसभा निवडणूक सेवेसाठी नियुक्ती करण्यात आली आहे. या विरोधात गोवा एलआयसी कर्मचारी संघटनेने गोवास्थित मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या प्रकरणाची सुनावणी बुधवार, २४ रोजी होणार आहे.
राज्यात उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा या दोन लोकसभा मतदारसंघात ७ मे रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी राज्यात मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन्ही जिल्हाधिकारी कार्यालयाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी आवश्यक कर्मचाऱ्यांची वेगवेगळ्या जबाबदारीसाठी नियुक्ती करण्यात येत आहे. अश्याच जबाबदारीसाठी निवडणूक सेवेसाठी राज्यातील विविध शाखेत सेवा बजावणाऱ्या एलआयसी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याला विरोध करून गोवा एलआयसी कर्मचारी संघटनेने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्यात भारतीय निवडणूक आयोग, गोवा राज्य निवडणूक आयोग, उत्तर गोवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, दक्षिण गोवा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आणि राज्य सरकार यांना प्रतिवादी केले आहे.
लोकसभा निवडणूक सेवेसाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी गोवा विभागात एलआयसीकडे पत्रव्यवहार करून कर्मचाऱ्यांची नियुक्तीची मागणी केली. त्यानंतर १९ आणि २० जानेवारी २०२४ रोजी गोवा एलआयसीच्या ६ शाखेतील ५५ कर्मचाऱ्यांची निवडणूक सेवेसाठी मागणी केली. मात्र, एलआयसी अधिकाऱ्यांनी याला विरोध करत कर्मचाऱ्याची शाखेत कमतरता होणार असून इतर कर्मचाऱ्यांवर ताण वाढणार, तसेच नियमित सेवेवर परिणाम होणार असल्याचा मुद्दा जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्याकडे मांडला. असे असताना निवडणूक सेवेसाठी कर्मचारी देण्यात आले. त्यानंतर आणखी कर्मचाऱ्यांची मागणी करण्यात आली. त्यामुळे वेळोवेळी मुद्दा उपस्थित करूनही काही परिणाम होत नसल्यामुळे अखेर गोवा एलआयसी कर्मचारी संघटनेने पुढाकार घेऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल करून वरील मुद्दा उपस्थित केला. या प्रकरणाची सुनावणी २४ रोजी होणार आहे.