डोंगरकापणीवेळी शांतीनगर-वास्को येथे बंद घराची कोसळली भिंत

रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू असतानाचा प्रकार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
24th April, 12:31 am
डोंगरकापणीवेळी शांतीनगर-वास्को येथे बंद घराची कोसळली भिंत

शांतीनगर येथे एका घराची कोसळलेली भिंत.

वास्को :
शांतीनगर येथे रेल्वेमार्ग दुपदरीकरणासाठी डोंगर कापणी सुरू असताना डोंगरमाध्यावरील एका बंद घराची भिंत कोसळली. तेथील चार-पाच घरमालकांनी आपली घरे यापूर्वीच रिकामी केली होती. त्यामुळे ती घरे बंदच होती.
शांतीनगर येथे रेल्वेमार्ग दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. मंगळवारी दुपारी जेसीबीच्या सहाय्याने डोंगराचा काही भाग कापण्यात येत असताना तेथील काही मोठे खडक खाली कोसळले. त्यामुळे त्या डोंगराच्या अगदी कडेला असलेल्या एका घराची भिंतही कोसळली. घरामध्ये कोणीच राहत नसल्याने कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही. तेथील चार-पाच घरे ही डोंगरमाथ्यावर अगदी कडेला असल्याने तसेच ती घरे रेल्वेच्या जागेत येत असल्याने घरमालकांना सामानांसह रिकामी करण्याची सूचना करण्यात आल्या होत्या.
दरम्यान, या डोंगराच्या एका भागात गेल्या आठवड्यात तडा गेल्याने मोठी भेग तयार झाली होती. त्यामुळे संबंधित घरमालकांनी आपली घरे रिकामी केली होती. वास्कोचे आमदार कृष्णा साळकर तसेच स्थानिक नगरसेविका श्रद्धा महाले यांनी सोमवारी तेथील घरांची पाहणी केली होती. तेथील काही घरमालकांना सूचना करण्यात आल्या होत्या. रेल्वे प्रशासनाकडून स्थानिकांना योग्य सहकार्य मिळत आहे. काही घरे वाचविण्यासाठी रेल्वेने मोठे प्रयत्न केले आहेत, असे महाले यांनी सांगितले.