मायकल लोबोंविरोधात झोन बदलल्याची तक्रार!

राणे विरुद्ध लोबो सामना पुन्हा रंगण्याची शक्यता

|
25th June 2022, 12:41 Hrs
मायकल लोबोंविरोधात  झोन बदलल्याची तक्रार!

प्र​तिनिधी। गोवन वार्ता                  

पणजी : ओडीपींचा गैरफायदा घेत बेकायदेशीररीत्या जमीन रुपांतर आणि झोन बदलाबाबत तक्रार करण्यासाठी आपण जारी केलेल्या ई-मेलवरून आतापर्यंत ६१ तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. त्यात विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांच्याविरोधातील एका तक्रारीचाही समावेश आहे, अशी माहिती नगरनियोजनमंत्री विश्वजीत राणे यांनी शुक्रवारी दिली आहे.            

विद्यमान विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी काही वर्षांपूर्वी आपल्या जमिनीचा बेकायदेशीरपणे झोन बदलला. अशी तक्रार एका महिलेने ई-मेलद्वारे केली आहे. ई-मेल आयडी जारी केल्याच्या पहिल्या दिवसापासून अनेकजण तक्रारी करीत आहेत. गुरुवारपासून तक्रारींत वाढ झाली आहे, असे मंत्री राणे यांनी म्हटले आहे.             

दरम्यान, ओडीपींमध्ये घोटाळा झाल्याचा दावा करीत नगरनियोजन मंडळाने काही दिवसांपूर्वी ओडीपी निलंबित करण्याचा निर्णय घेतला. निलंबित ओडीपींचा अभ्यास करून आणि त्यातील चुका दुरुस्त करून नवीन ओडीपी विधानसभा अधिवशेनापर्यंत तयार करण्यात येणार असल्याचे मंत्री राणे यांनी जाहीर केले होते. या प्रकरणी नगरनियोजन मंडळाने मायकल लोबो यांच्या दोन हॉटेलांनाही ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे. यावरून सलग काही दिवस राणे आणि लोबो यांच्यात शाब्दिक युद्ध रंगले होते. त्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी यात हस्तक्षेप करून गुंतवणूकदारांचे हित लक्षात घेऊन ओडीपींबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते.