एकनाथ शिंदेंची भाजपला साथ

महाराष्ट्रात सत्तापालट अटळ : शिवसेनेकडून बंडखोर आमदारांची मनधरणी करण्याचा प्रयत्न

|
24th June 2022, 12:15 Hrs
एकनाथ शिंदेंची भाजपला साथ

गुवाहाटी : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी भाजपसाेबत सत्ता स्थापन करण्याचे संकेत दिले आहेत. भाजपचे नाव न घेता देशातील मोठा राजकीय पक्ष आपल्या सोबत आहे, असे विधान केले आहे. ते आपल्याला काहीही कमी पडू देणार नाहीत. आमदारांनो, आता फक्त एकजूट ठेवा. विजय आपलाच आहे, असे स्पष्ट करीत भाजपसोबत जाण्याचा आपला इरादा असल्याचे संकेत शिंदे यांनी दिले आहेत.

गुवाहाटीत चाळीसपेक्षा जास्त आमदारांच्या गटासोबत शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हाॅटेल रेडीसन ब्लू येथे ठाण मांडून आहेत. शिंदे यांनी आमदारांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आता आपले सुख आणि दुःख एकच आहे. काही असले तरी एकजूट ठेवा, कितीही संकटे येऊ द्या, विजय आपलाच आहे. तो राष्ट्रीय पक्ष आहे, महाशक्ती आहे, ज्यांनी पाकिस्तानला धडा शिकवला. त्या पक्षाने आपल्याला सांगितले की, तुम्ही घेतलेला निर्णय देशातील ऐतिहासिक निर्णय आहे.

शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात !

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी पुकारलेल्या बंडाच्यामागे भारतीय जनता पार्टीच असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले आहे. मुंबईच्या यशंवतराव चव्हाण सेंटरमध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची बैठक घेतली. या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना शरद पवारांनी हे विधान केले. विशेष म्हणजे अजित पवार यांनी या बंडामागे भाजपाचा हात असल्याचे वाटत नसल्याचे काही वेळापूर्वी म्हटल्यानंतर लगेच शरद पवारांनी हा मुद्दा खोडून काढला. 

...म्हणून फडणवीस गप्प !

शिवसेनेत सुरू असलेल्या महाभारतामागे भाजप असून त्यांच्याकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे ते गप्प आहेत. मात्र आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. गरज पडल्यास त्यांना बाहेरून पाठिंबाही देण्याची आमची तयारी आहे. महाविकास आघाडीत आम्ही आहोत आणि राहणारच, अशा शब्दात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसची भूमिका जाहीर केली. 

पटोले म्हणाले, ईडीचा धाक दाखविण्याचे काम भाजप करत आहे. महाभारतामागे भाजप आहे. त्यांच्याकडे संख्याबळ नसल्यानेच ते गप्प आहेत.

खासदारही नाराज

मुंबई : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकारमधील मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेना आता फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे. आमदारांप्रमाणेच शिवसेनेच्या १९ खासदारांपैकी ८ खासदारही उद्धव ठाकरे यांची साथ सोडण्याची शक्यता आहे.
शिवसेना नेतृत्वावर नाराज असलेले बहुतांश खासदार कोकण, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील आहेत. यात वाशिमच्या शिवसेना खासदार भावना गवळी यांचे नाव आघाडीवर आहे. त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ पत्र लिहून बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार करून या नेत्यांवर कारवाई करू नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांना केले आहे. एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे, ठाण्याचे खासदार राजन विचारे व रामटेकचे खासदार कृपाल तुमाने हेही पक्षावर नाराज आहेत. मराठवाड्यातील काही खासदारही नाराज आहेत.
शिवसेना खासदार भावना गवळी यांनी आपल्या पत्रात लिहिले आहे की, ‘हिंदुत्वाच्या बाजूने असलेल्या बंडखोर आमदारांच्या मागणीचा विचार करण्यात यावा. बंडखोर आमदारांवर कारवाई करू नये.’ भावना गवळी यांच्या विरोधात महिला प्रतिष्ठान ट्रस्टमध्ये मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यांना ईडीने तीन वेळा समन्स बजावले आहे.
शिंदेंसह १२ जणांची आमदारकी रद्द करा !
मुंबई : आमदारांच्या बंडामुळे शिवसेना हतबल झाल्याचे चित्र रंगविण्यात येत असतानाच शिवसेना नेतृत्वाने एक आक्रमक निर्णय घेत एकनाथ शिंदेंसह १२ आमदारांच्या निलंबनाची शिफारस विधानसभा उपाध्यक्षांकडे केली आहे.      
एकनाथ शिंदे, प्रकाश शिंदे, लता सोनवणे, संजय शिरसाठ, भरत गोगावले, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आदी बारा जणांची नावे विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे सादर केली आहेत. त्यांना पक्षाच्या विधिमंडळ बैठकीला हजर राहण्याची आम्ही नोटीस आधीच दिली होती. पण त्यानंतरही ते बैठकीला गैरहजर राहिले. त्यामुळे या आमदारांचे सदस्यत्व रद्द व्हावे, यासाठी आम्ही विधानसभा उपाध्यक्ष झिरवळ यांच्याकडे शिफारस केली आहे, अशी माहिती शिवसेना नेते अरविंद सावंत यांना दिली आहे.
शिवसेनेवर एकनाथ शिंदेंचा पलटवार
शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांकडे केलेली मागणी बेकायदेशीर असल्याचे एकनाथ शिंदे गटाने म्हटले आहे. शिंदे यांनी ट्विट करत आपली बाजू मांडली. ‘कोणाला घाबरवण्याचा प्रयत्न करताय? घटनेच्या १०व्या परिशिष्टाप्रमाणे (शेड्युल) व्हीप हा विधानसभा कामकाजासाठी लागतो, बैठकीसाठी नाही. या संदर्भात सुप्रीम कोर्टाचे असंख्य निकाल आहेत. १२ आमदारांविरोधात कारवाईसाठी अर्ज करून तुम्ही आम्हाला अजिबात घाबरवू शकत नाही,’ असे शिंदे म्हणाले आहेत.

‘भाजपच्या केंद्रीय नेत्यांचे महाराष्ट्रावर बारीक लक्ष’
प्रतिनिधी। गोवन वार्ता            
पणजी : महाराष्ट्रातील राजकीय भूकंपावर भाजपचे महाराष्ट्रातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातील भाजप नेते जवळून लक्ष ठेवून आहेत. फडणवीस तेथे योग्य तो निर्णय घेतील. प्रत्येक राज्यात भाजपचे सरकार येईल यासाठी पक्षाचे सर्वच नेते कार्यरत आहेत, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गुरुवारी दिली.      
भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे म्हणाले, महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तेथील जनतेने भाजपलाच कौल दिला होता. निकालानुसार तेथे भाजप-शिवसेनेचे सरकार स्थापन व्हायला हवे होते. परंतु, उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरेंच्या तत्त्वांना तिलांजली देत विचारसरणीच्या विरोधात असलेल्या काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसशी युती करून महाराष्ट्रात आघाडी सरकार स्थापन केले. तेव्हापासूनच शिवसेनेतील अनेक आमदार उद्धव ठाकरेंवर नाराज होते. आता 
पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यास गोव्यातील सर्वच भाजप नेत्यांना आनंद होईल. गोव्यातही भाजपचे सरकार सत्तेवर आणण्यात फडणवीस यांचा मोठा वाटा आहे, असेही तानावडे यांनी नमूद केले.