गरज मानसिकता बदलण्याची !

विधवा प्रथा बंद करण्यासाठीचे ठराव घेतले जाताहेत त्याच्या बातम्या वाचनात येतात आणि मन सुखावते. विषयाला उघड उघड वाचा फुटली याचे समाधान वाटते, पण दुसऱ्याच क्षणी एक शंका ही मनाला स्पर्शून जाते… ठराव तर पास होत आहेत, परंतु लोकांच्या मानसिकतेचे काय?

Story: प्रासंगिक | पौर्णिमा केरकर |
19th June 2022, 12:00 Hrs
गरज मानसिकता बदलण्याची !

कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामपंचायतीने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला आणि अगदी वेगाने या निर्णयाचे सर्वत्र स्वागत झाले. वर्षानुवर्षे ज्या प्रथांशी, जाचक रूढीरिवाजांशी आपलं समाजमन जोडलं गेले आहे त्या कुप्रथांचं समूळ उच्चाटन व्हाव, महिलांना, उपेक्षित तसेच दुर्बल घटकांना जीवनात सन्मानाचे स्थान मिळावे, त्यांच्यावर अन्याय होता कामा नये म्हणून आजपर्यंत समाजसेवकांनी केलेले प्रयत्न याची प्रचिती देते. सती प्रथा, बालविवाह, हुंडा बळी कायद्याने बंद झालेत. महिलांना सक्षम करणारे अनेक कायदे निर्माण झाले. हे सगळे विचारमंथनातून, बदलत्या काळानुसार झालेले बदल आज इतकी वर्षे उलटली तरी लोकांच्या अंगळवळणी पडत नाहीत. कायद्याचा धाक आहे परंतु मनाला लागलेले वळण बदलत नाही. परंपरांची थोरवी गाताना समाजातील एका महत्त्वपूर्ण घटकांवर ती व्यक्ती माणूस आहे याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत शेकडो वर्षांपासून अन्याय होत आलेला आहे. नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या पत्नीचे विद्रुपीकरण करून तिला सामाजिक, सांस्कृतिक जीवनातून हद्दपार करून टाकण्याची ही विकृती समाजमनाच्या मानसिकतेत दडलेली आहे. 

पती हाच परमेश्वर ही धारणा मुलींना लहानपणापासूनच शिकविली गेलेली असून. ज्या एखाद्या युवतीला अगदी कोवळ्या वयात वैधव्य आले असेल तर तिच्या वाट्याला या परंपरांची, प्रथांची तिने सोसलेली दाहक झळ तिचं उभं आयुष्य करपवून टाकणारी ठरते. पतिनिधनानंतर हे असंच आहे आणि ते तसेच चालूच ठेवायचे हीच शिकवण सासू सुनेला, सून लेकीला देत जाते आणि हा प्रवाह असाच चालू राहतो. जोपर्यंत आपण सु-शिक्षित नव्हतो, विज्ञानयुगाचा, समाजमाध्यमांचा आपल्याला स्पर्शही झाला नव्हता तोपर्यंतचे जगणे समजून घेऊ शकतो. पण आताच्या काळात हे असेच जेव्हा चित्र सभोवताली दिसते तेव्हा चीड येते. काही वर्षांपूर्वी माशेलमध्ये एका महिलेने आपल्या मुलींच्या सहकार्याने पतीच्या चितेला अग्नी दिला होता. तिच्या या विचारांचे, कृतीचे  कौतुक तर सोडाच उलट तिच्यावर आणि तिच्या कुटुंबीयांवर टीकेची झोड उठवली होती. पतिनिधनाची वेदना उरी कवटाळत ती या क्लेशदायक प्रसंगाला धैर्यानेच सामोरी गेली होती. जवळजवळ दीडशेपेक्षा जास्त वर्षे उलटलीत आपली सावित्रीबाई फुले नऊवारी कापड, डोकीवर पदर, कपाळाला आडवी चिरी अशा पेहरावातील पतीच्या सहकार्याने शिकली. म्हणजे खऱ्या अर्थाने साक्षर झाली. अंतर्बाह्य आधुनिक विचारधारेने बदलली. सहजीवन कसं असावं याचा एक वस्तुपाठच तिनं समाजाला दिला. तत्कालीन काळात स्त्रियांवर लादलेल्या रूढी प्रथांचा विळखाच एवढा प्रखर होता की सावित्रीबाई फुलेंनी आपल्या पतीच्या निधनानंतर त्यांच्या चितेला अग्नी देत परंपरेच्या विळख्याला छेद देण्याची निर्भीडता दाखविली. देशभरात अनेक ठिकाणी अशी परंपरेला मोडीत काढणारी चित्रे अधूनमधून वाचनात येतात. कळत जाते कसे कोठून तरी आणि मग मनात प्रश्न निर्माण होतो की हे असे कळणे, समजून घेणे व्यापक प्रमाणात का होत नसावे?

विधवा प्रथा बंद करण्याच्या दृष्टीने पंचायत पातळीवरून उचललेले पाऊल खूप स्वागतार्ह आहे. या माध्यमातून जो विषय आपापसात हलक्या आवाजात बोलला जायचा त्याची चर्चा खुलेआम होण्यास मदत झालेली आहे. पतीच्या मृत्यूनंतर तिचा होणारा मानसिक छळ, सर्वांसमक्ष तिच्या अंगावरील सौभाग्यलेणी ओरबाडून काढण्याची परंपरा ही हीन पातळीवरील आणि तेवढीच मनाचे खच्चीकरण करणारी आहे. कपाळावरील कुंकू-बिंदी, हातातील बांगड्या, केसातील फुले ही तर लहानपणापासून मुलगी, युवती म्हणून जगतानाच्या प्रवासात तिच्या सोबतीला असतात. गळ्यातील मणी मात्र तिचं लग्न झालेलं आहे याची खूण म्हणून तिच्याजवळ असतो. स्वतःच्या जोडीदारावरील निस्सीम प्रेम हे सहजीवनाच्या बाबतीतील महत्त्वपूर्ण असा भाग आहे. विश्वासावर नाती टिकून राहतात. असे असताना आजही स्त्रियांना दिली जाणारी वागणूक अशोभनीय आहे. पतीनिधनाने आधीच विकल, विव्हल झालेले मन कोलमडून पडते समाजाच्या या प्रथामुळे! उंबरठ्यावर बसवून कुंकू पुसणे, बांगड्या फोडणे, प्रेत बाहेर काढण्यापूर्वी सवाष्ण म्हणून तिची शेवटची ओटी भरणे, कपाळावर मधोमध कोयत्याने घाव करणे, पायातली जोडवी खसकन ओढणे हे सुद्धा कमी म्हणून की काय बाराव्या दिवसापर्यंत सवाष्ण स्त्रियांनी तिच्या पुढ्यात जाता कामा नये, तिने बिछान्यावर न झोपता खालीच जमिनीवर झोपायचे. एका कोनाड्यात काळोखात दिवसभर बसून रहायचे. जी सवाष्ण स्त्री घरात प्रेत असेपर्यंत तिला येऊन भेटली नाही तर निदान तिने बाराव्या दिवशी तरी तिला भेटून जायचे असते. ते ही जमले नाही तर मग वर्षभर नवरा मेलेल्या महिलेचे तोंड बघता कामा नये अशा अनेक परंपरा, रिवाज. 

आश्चर्य याच गोष्टीचे वाटते की हे सर्व करण्यासाठी पुढाकार असतो तो एका महिलेचाच! महिलाच महिलांना समजून घेत नाहीत याचीच खंत वाटते. आपल्या देशाला महान समाजसेवकांची, विचारवंतांची परंपरा आहे. शेकडो वर्षांपूर्वी संत सोहिरोबानाथांनी अकाली वैधव्य आलेल्या आपल्या बहिणीला सन्मानाने घरी म्हणजे माहेरी आणले, शिक्षण दिले ही केवढी मोठी क्रांती? महात्मा ज्योतिबा फुले, राजाराम मोहन रॉय, महर्षी धोंडो केशव कर्वे, गोपाळ गणेश आगरकर… अशी किती नावे घ्यायची? पतीचे निधन झाले की परंपरेच्या नावे तिचे विद्रुपीकरण करून तिला इतर सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमातून बहिष्कृत करायचे, सर्वच पातळीवरून तिची मानहानी करायची, तिच्यासाठी अपशब्द वापरायचे. लग्न झाल्या झाल्या जर असे काही अघटीत घडले आणि नवरा मेला तर तिच पांढऱ्या पायाची ठरते. त्यात ती तरुण असेल तर तिच्या वाट्याला हलाखीचे जीवन येते. विधवा प्रथा बंद करण्यासाठीचे ठराव घेतले जाताहेत त्याच्या बातम्या वाचनात येतात आणि मन सुखावते. विषयाला उघड उघड वाचा फुटली याचे समाधान वाटते, पण दुसऱ्याच क्षणी एक शंका ही मनाला स्पर्शून जाते… ठराव तर पास होत आहेत, परंतु लोकांच्या मानसिकतेचे काय? अंधश्रद्धा, खुळचट चालीरितींचा उदोउदो करण्याची सवय जडलेल्या समाजाचा दृष्टिकोन बदलण्यासाठी काही ठोस उपाययोजना आखाव्या लागतील. कायद्याची तरतूद करावी लागेल. समाजाच्या विविध घटकात याबाबतीत जागृती करायला हवी. समुपदेशन, कायद्याच्या ज्ञानाविषयीची माहिती, मानसिक हिंसाचार, स्त्रियांचे न्याय्य हक्क मिळवून देण्यासाठीचे प्रयत्न जसे सरकारी पातळीवर होणे गरजेचे आहे तसेच समाजसेवी संस्था, स्वयंसेवी संघटना, गावातील बुद्धिजीवी लोक यांच्या सहकार्याने पंचायत समितीच्या माध्यमातून याविषयीची जागृती करणे आवश्यक आहे. ग्रामसभेत मोकळेपणाने चर्चा अपेक्षित आहे. शाळा महाविद्यालयात हा विषय पोहोचायला हवा. स्वयंसहाय गट, महिला मंडळे आज विपुल प्रमाणात आहेत. हा विषय अशा व्यासपीठावर चर्चा आणि ठोस उपाययोजनेसाठी यायलाच हवा. घरात मुलींना तिची माता सुरुवातीपासून सांगत असते की सासरी गेल्यावर तुला अमुक करावं लागेल, (पान २ वर)

तमुक करावं लागेल, तुला ते कळलं नाही तर सासू काय म्हणेल? जेवून झाल्यावर पुढ्यातील ताट उचलून ते व्यवस्थित घासून पुसून ठेवण्याची सवय माता मुलीला हमखास लावते. पण मुलांचे काय? स्वावलंबनाच्या दृष्टीने हा बदल आज करणे ही काळाची गरज आहे. मुली, महिला आता सर्वच क्षेत्रात अग्रणी आहे. स्वयंपाक घरात वावरणारी गृहिणी ते थेट अंतराळात गेलेली वीरांगना या एवढया मोठ्या प्रवासात भांडी घासणे, केर काढणे या गोष्टीसुद्धा त्यांना कळतात. ते त्यांचे स्वावलंबी जीवनाचेच प्रतीक आहे. आई होताना तिला दिव्यातून जावे लागते. तिने यातना भोगलेल्या असतात. तिनं बरेच काही सहन केलेले असते म्हणूनच ती अधिकारवाणीने आपल्या लेकींसुनाना आधुनिक विचारांचे महत्त्व पटवून देऊ शकते. तिनं ते करायला हवे. "मुलगी दिली तिथं मेली" ही विचारधारा बदलायला हवी. महिलाच महिलेची शत्रू असते असे सर्रास बोलले जाते. सभोवताली सजगतेने बघितले की त्यात बऱ्याच अंशी तथ्य दिसते. मुलगी जन्मली की नाक मुरडणारी सासू ही आईच असते, मुलीला नैतिकतेचे धडे देत मुलाला मोकळे सोडणारी, मुलीपेक्षा मुलाच्या शिक्षणाला प्राधान्य देणारी यात एक महिलाच अग्रेसर असलेली दिसते. असे कितीतरी प्रसंग आहेत. आजघडीला अनेक कुटुंबे याला अपवाद आहेत, हे सुचिन्ह आहे. मात्र ज्यांना कोणाला ही जाणीव  झालेली आहे त्यांनीसुद्धा आपल्या सहवासात येणाऱ्यांची मानसिकता बदलण्याचा प्रयत्न करण्याची गरज आहे. समाज निकोप आहे हे तेथील लोकमानसाच्या विचारधारेतून कळते.

मृत्यू अटळ आहे. तो कोणालाही चुकलेला नाही. हे शाश्वत सत्य आहे. सुंदर निरोगी निकोप जगणं आणि तेही आनंदाने जगणं हा प्रत्येकाचाच अधिकार आहे. मग ती स्त्री असो किंवा पुरुष. तो अधिकार कोणी कोणाचा नाही हिरावून घेऊ शकत. पत्नीचे अकाली निधन झालं तर पती सहजपणे दुसरं लग्न करतो. समाज त्याला आडकाठी आणीत नाही. पतीच्या मृत्यूनंतर पत्नीच्या मनाला जरी असा विषय शिवला तर ती समाजाच्या टीकेचा विषय बनते. तिला पावलापावलावर संघर्ष करावा लागतो. आता तिचा प्रवास भरपूर झालेला आहे. ती जाणून उमजून जीवन जगायला शिकली आहे. तिला कुटुंबाची, समाजाची सोबत मिळाली तर बरेच आहे. नाहीतर ती एकटी प्रवास करू शकते. सर्वांचे सहकार्य असेल तर समाज सुंदर होईल. समाजमनाला सांगणं आहे तुम्ही समंजस व्हा, विचारी बना. ती सोसते म्हणून ती कमकुवत नाही. तिच्यासाठी अजूनही खाचखळग्यांची वाट आहे. त्या वाटेवर काटे पेरण्यापेक्षा तिला सशक्त सोबत करा. तिच्या असहायतेचा फायदा घेत तिच्या शरीर, मनाला ओरबाडू नका. तीही जिवंत हाडामासांची, भावना संवेदनांची माणूस आहे. सौभाग्याची परंपरेने बहाल केलेली प्रतीके सर्वांसमक्ष ओरबाडली म्हणजे आठवणी मरून जातील? प्रामाणिक सहजीवनाचे नाते पुसून जाईल? सुखदुःखाचे अनेक क्षण जे बरोबरीने पेलले, साजरे केले ते सारेच नष्ट होतील? तिची जगण्याची असोशी, तिच्या आत्मसन्मानाच्या साऱ्याच खुणा अशा कृतीने पुसून जातील? आणि त्या पुसून जाव्यात असा अट्टाहास का?

जगू दे तिचं तिला, ठरवू दे तिचं तिला की त्याच्या नावाने घातलेली सौभाग्यचिन्हे त्याची आठवण म्हणून तिच्या शेवटच्या श्वासापर्यंत तिला अंगावर घालायची की नाही ते. तिची कींव करूया नको. तिची प्रेरणा बनुया. निव्वळ सहानुभूती दाखवून तिचं खच्चीकरण करण्यापेक्षा तिच्या अगतिकतेला बळ देऊया. मनगटातील शक्ती, मनाची उभारी होऊया. तिच्या कपाळावरील लाल कुंकू हा तिच्या जगण्यासाठीचा पूर्णविराम नाही, तर ती तिच्या आत्मसन्मानाची ठळक खूण होऊ द्या!