दहशतीच्या छायेत - डायरी एका काश्मिरी अनामिकाची

Story: वाचनाचा कोपरा | दीपा जयंत मिरींगकर |
18th June 2022, 11:49 pm
दहशतीच्या छायेत - डायरी एका काश्मिरी अनामिकाची

काश्मिरी पंडितांच्या विस्थापनाबद्दल त्यांच्यावर झालेल्या अमानुष अत्याचाराबद्दल पुष्कळ वाचले ऐकले होते. मध्यंतरी ‘झेलमची हाक’ हे सदर पण वाचत होते. पण कश्मीर फाइल्समधून म्हणजे दृकशाव्य माध्यमातून हेच सारे पहात असताना मस्तक सुन्न झाले आणि हे सारे घडताना आपण कुठे होतो, काय केले ते आठवण्याचा क्षीण असा प्रयत्न केला. हाती काहीच लागले नाही. मग निदान चित्रपटातील काही दृश्ये अतिरंजित असतील (अशी स्वत:ची समजूत करून) या संदर्भातील पुस्तक वाचण्याचे ठरवले आणि हातात आले  ‘दहशतीच्या छायेत- डायरी एका काश्मिरी अनामिकाची’- पुस्तक हातात पडल्या क्षणापासून आता पर्यंत अगदी मोकळ्या वेळात (खरे तर वेळ काढून ) ते वाचले आणि आतून हादरून गेले.

ही डायरी म्हणजे एका सामान्य काश्मिरी पंडिताचे त्या वेळी म्हणजे १९९० च्या दशकात भोगलेल्या वेदनेचे शब्द रूप आहे. ‘कमल’ नावाच्या सीमा सुरक्षा दलातील अधिकार्‍याला एका घरात सापडली. ती त्याने जवळ जवळ लपवून लेखकाच्या स्वाधीन केली. लेखक श्री तेज एन धर हे १९९० मध्ये श्रीनगरहून विस्थापित होऊन दुसरीकडे गेले होते. १९९५ मध्ये कमलने त्यांना श्रीनगरमध्ये काही दिवसांसाठी बोलावले. (यावेळी कश्मीर खोरे काहीसे शांत झाले आहे असा गैरसमज होता). लेखकाला हे कागदांचे कापडात बांधलेले पुडके त्यांनी दिले. ते उघडताना विस्कटलेली पाने जुळवताना, त्यातील अनेक संदर्भ वाचताना लेखक मनातून हादरला. त्यातील पानावर तारीख नव्हती. पण घटनाचा संदर्भ लावून घेत त्यांनी ते अनुक्रमात लावून घेतले. या घटना म्हणजे त्या अनामिक लेखकाच्या खाजगी आयुष्यातील घडामोडी, खोर्‍यातील त्यावेळचे वातावरण त्या पाच, सहा महिन्यातील बदललेले शेजारी, याचे वर्णन आहे. १९९० पूर्वीचे शांत, निसर्ग सुंदर कश्मीर खोरे आणि नंतर अचानक झालेला हिंसाचार, या सार्‍याचे वर्णन, अगदी सर्वसामान्य माणसाची झालेली घालमेल हे सारे यात आहे. सद्य परिस्थितीचा सामना करताना लेखकाला त्याचे संदर्भ अनेक वेळी आपल्या बालपणातील आठवणीशी लागत जातात.

आपल्या जन्माच्या वेळचे घरातील मोठ्या माणसांनी संगितलेले वर्णन, तेव्हा गावातील पीर आणि कुटुंबीय यांची कशी मदत झाली होती ते आठवते. त्यामुळे बर्‍याच वेळा आताच्या त्या अतिरेकी माणसाचे, त्यांच्या कुटुंबीयांचे पूर्वीचे वागणे. त्यावेळचे प्रेमळ वातावरण आपल्याला सहज जाणवते. त्यातील फरक कळतो. दोन्ही जमातीत पूर्वी असलेले सौदार्हाचे संबंध, त्यांचे एकमेकांच्या अडचणीला धावून जाणे हे जाणवते आणि मग हे अगदी जिवावर उठणे कसे आणि कधी सुरू झाले याची काहीशी माहिती यात मिळत जाते.

याचा अनामिक लेखक एकटा, निराश मनस्थितीत त्या गावात रहात होता.  अत्यंत धोका पत्करत आपल्या घरात एकाकी राहिलेला हा माणूस प्रचंड दबावाखाली होता, कदाचित त्यातूनच त्याने डायरी लिहिली असावी. आपले मरण जवळ आहे हे जाणूनसुद्धा तो आपले घर सोडून जायचा प्रयत्न करत नाही. त्याला अनेक मित्र सल्ला देत असतात. पण कोणत्या तरी दुर्दम्य आशेने तो तिथेच राहतो.

या पुस्तकाची सुरुवात अनोखी आहे. जी. ए. कुलकर्णी यांची ‘विदूषक सांगू लागला’ ही गोष्ट अगदी पुढे आलेल्या कश्मीर खोर्‍यातील बदललेल्या स्थितीचे योग्य वर्णन वाटते.

सुरुवातीला लेखकाचे कुटुंब ज्या परिस्थितीत घर सोडून गेले ते वर्णन वाचून  अगदी हेलावून जाते. आपल्या डोळ्यासमोर हे सारे घडते आहे असे वाटते. आजूबाजूच्या घरात अतिरेकी रात्रीच्या मुक्कामाला आले आणि सकाळी ते गेल्यावर घरातील कर्त्या माणसाने केलेला आकांत यावरून रात्री त्या घरात काय विपरीत झाले असेल याची कल्पना येते. सशस्त्र पोलीस चौकीपासून केवळ शंभर मीटर अंतरावरील आपला मित्र भरत याची त्याच्या राहत्या घरातून फरफटत आणून त्याला भारताचा हेर म्हणून शिव्यांची लाखोली वहात घरातील माणसांच्या समोर आणि तो तिळातिळाने मरावा म्हणून एका एका अवयवावर थोड्या थोड्या वेळाने गोळी घालून केलेली हत्या याचे वर्णन वाचताना शहारे येतात. पाण्यासाठी तडफडणारा त्याचा जीव डोळ्यासमोर जाताना त्याच्या आईला काय वाटले याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. लष्कराने केलेली झडती, चौकशी याचे वर्णन लेखकाने व्यवस्थित केले आहे. कामगार वर्ग म्हणजे सुतार, प्लंबर यांच्यासारखे लोक, त्यांना हिंसाचारामुळे न मिळणारे काम आणि त्यांची ससेहोलपट होते ते सुद्धा संवादातून लेखक डोळ्यासमोर आणतो. बहकलेल्या किंवा बहकवलेल्या तरुणांच्या त्या हत्याकांडामुळे एकंदरीत व्यवस्था कोलमडते, आणि रोजंदारीवर जगणार्‍या लोकांची उपासमार होते हे सुद्धा यात येते. ‘तुम्ही अजून श्रीनगर कसे सोडले नाही?’ असे विचारणारे मुस्लिम सहकारी एकाच वेळी यांच्याबद्दल सहानुभूती, काळजी आणि आश्चर्य ही व्यक्त करत होते हे त्यांनी नमूद केले आहे. एका बाजूने अनिल नावाचा भावाचा मित्र आपले घर आवरून अगदी निश्चयाने घर सोडून जातो, तर त्याच शहरातील दुसर्‍या भागातील निवृत्त झालेले भान साहेब पती पत्नी शांतपणे तिथेच राहतात, हे काही दिवस असेल मग सगळे शांत होईल यावर विश्वास ठेवणारे पण त्याचवेळी त्यांची मुले, सुना, नातवंडे मात्र जम्मूला राहायला गेले आहेत. हे सगळे पाहताना लेखकाला आपल्यासाठी निर्णय घेणे कठीण होते. त्याला या दहशतीच्या वातावरणातून जायची इच्छा होते त्याचबरोबर आपल्या घराची ओढ असते, आणि भान साहेब राहतात त्यांचे कौतुक वाटते.  सुनील नावाचा मित्र एका भागात निडरपणे रहात होता. आपल्या आजूबाजूच्या पंडितांना बाहेर पडून रस्त्यावर यायला सांगत प्रोत्साहित करत होता. अनेक मुसलमान मित्र त्याबद्दल त्याचे कौतुक करत होते. पण अचानक सारे बदलले. लोक वाटेत टाळू लागले. नजरा बदलल्या. याचे कारण शोधण्याचा केलेला सुनीलचा प्रयत्न, त्यांच्या घरावर एका रात्री झालेली दगडफेक आणि सुनील आणि त्यांच्या सहकार्‍यांनी घेतलेली मुसलमान शेजार्‍यांची भेट, त्या भेटीत ज्येष्ठ लोकांनी दाखवलेली सहानुभूती, आणि त्या बोलण्यानंतर  त्या मधील अचानक एका तरुण व्यक्तीने द्वेष आणि धर्माच्या बाबतीत केलेल्या स्फोटक भाषणाने बदलते. त्या खेड्यातील लोक हळूहळू बदलत जातात आणि त्या समूहात सामील होतात. पंडितांनी गाव घरे सोडून जावे असे म्हणू लागतात ही कथा अगदी वाचण्यासारखी आहे. अशा प्रकारच्या हिंसेमध्ये लोक सामील कसे होत जातात हे अगदी समजत जाते. शबीर नावाचा सुनीलचा विद्यार्थी नेहमी भेटणारा, तोही  कसा बदलतो आणि विद्वेषात सामील होतो हे सुद्धा यात आले आहे.

आजूबाजूला असलेली संचारबंदी, हस्ते पर हस्ते येणार्‍या घर सोडण्याच्या  धमक्या यात हा लेखक पूर्वीचे दिवस आठवतो. स्वप्ने पाहतो. यामध्ये अधूनमधून राजकीय उल्लेख, केंद्र सरकारची धोरणे याचा उल्लेख येत जातो. आपले मित्र, शेजारी असे सारे बळी पडत असताना केवळ घराची ओढ म्हणून तो तिथे रहातो. क्षणाक्षणाला मरत असतो. तरीही कधी तरी हे सारे संपेल आणि आपले कुटुंबीय परत येतील अशी दुर्दम्य आशा ठेवत तो रहातो. आणि अर्थातच कधीतरी त्याचाही शेवट तसाच होतो. साधारण जानेवारी ते ऑगस्ट १९९० पर्यंतचा हा काळ आहे.

काश्मीर फाइल्स पाहिल्यावर मनात आलेले प्रश्न होते –

१ . हे सारे अचानक हल्ले झाले का ? 

२. पंडितांना बदललेल्या वातावरणाचा अंदाज आला नाही का ? 

३. मग योग्य वेळी ते सोडून का गेले नाही ? 

४. या सगळ्यात पंडितांचे  जे बालपणीचे मित्र असलेले मुसलमान होते त्यांनी या दहशतीच्या काळात काय भूमिका घेतली  ?

५. या हिंसाचाराच्या काळात शासकीय यंत्रणा आणि गुप्तहेर खाते काय करीत होते ?

या आणि अशाच अनेक प्रश्नांची पूर्ण नाही पण ६० ते ७० % उत्तरे या डायरीत मिळतात. मराठीतील हा अनुवाद सध्याच्या परिस्थितीत वाचून आपण आपले काही समज, गैरसमज दूर करू शकतो.