मासळीच्या उत्पन्नात यंदा ४,६४२ टनांची वाढ !

गोव्याच्या २०२२च्या आर्थिक सर्वेक्षणातून स्पष्ट : मागणी वाढल्यामुळे दर गगनाला

|
10th June 2022, 12:57 Hrs
मासळीच्या उत्पन्नात यंदा ४,६४२ टनांची वाढ !

प्रतिनिधी। गाेवन वार्ता                  

पणजी : राज्यात मासळीची मागणी दिवसेंदिवस  वाढत  अाहे. त्यामुळे  मागील काही वर्षात मासळीच्या उत्पन्नात वाढ झाली आहे.  सागरी व अांतरदेशीय मासळीमध्ये या वर्षी  वाढ झाली आहे.  गोव्याच्या २०२२ च्या आर्थिक सर्वेक्षणानुसार यावर्षी सागरी मासळीचे उत्पन्न ४ हजार ५६५, तर अांतरदेशीय मासळीचे उत्पन्न ७७, असे एकूण ४,६४२ टनांनी वाढले आहे.

सागरी मासळीचे २०२०-२०२१ मध्ये १ लाख ६ हजार १५९ टन उत्पन्न हाेते. २०२१-२०२२ मध्ये ते १ लाख १० हजार  ७२४ टन  उत्पन्न झाले अाहे. यावर्षी  ४ हजार ५६५ टन सागरी मासळीचे उत्पन्न वाढले आहे. गोवा घटक राज्याच्या वेळी म्हणजे १९८७-१९८८ साली फक्त २७ हजार २१० टन मासळीचे उत्पन्न  मिळाले  होते. मागील ३५ वर्षांत सागरी मासळीचे उत्पन्न वाढले, तसेच मागणीही वाढली आहे. गाेव्यातील काही चांगल्या दर्जाची मासळी ही निर्यात केली जात आहे. त्यामुळे मासळी व्यावसाय हा गाेव्यात माेठ्या प्रमाणात वाढला आहे.                   

अांतरदेशीय मासळीचीही सागरी  मासळीप्रमाणे मागणी वाढत आहे. मागील काही वर्षांत  या मासळीचे उत्पन्न वाढले आहे.  लाेकांकडून नदीचे मासे, मानशीवरील, तलावातील मासळीचे माेठ्या प्रमाणात उत्पन्न घेतले जाते. २०२०-२०२१ मध्ये ५ हजार ३२५ टन हाेते. २०२१-२०२२ मध्ये ते उत्पन्न ५ हजार ४०२ टनावर गेले. सुमारे ७७ टनांनी यावर्षी मासळीचे  उत्पन्न वाढले आहे. गाेव्यात अांतरदेशीय मासळीला मोठी मागणी अाहे.          उत्पन्न वाढले तरी किमती चढ्याच                  

राज्यात मासळीचे माेठ्या  प्रमाणात  उत्पन्न  घेतले  तरी वाढत्या मागणीमुळे मासळीच्या किमती या सर्वसामान्यांच्या  आवाक्याबाहेर आहेत. सध्या मासेमारी हंगाम बंद असल्याने ईसवण १२०० रुपये प्रति किलो विकला जात आहे. चाेणक मासा ८०० रुपये किलाेने विकला जात आहे. मोठी काेळंबी ५०० रुपये किलो, बांगडा ३०० रुपये, पापलेट ९०० रुपये किलाे दराने विकली जात आहे.