चलो दंबुल्ला !

दंबुल्लाबद्दल सांगायचं म्हणजे, हे क्षेत्र गेली बावीस शतकं एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मानलं जातं. इथल्या गुहा बुद्धाच्या शेकडो पुतळ्यांनी भरलेल्या आहेत. गुहांच्या आतल्या भिंती भित्तीचित्रांनी व्यापलेल्या आहेत. आत गेल्या गेल्या सकाळपासून उन्हात फिरत असल्याने दुखणारं डोकं शांत झालं.

Story: प्रवास | भक्ति सरदेसाई |
21st May 2022, 09:12 pm
चलो दंबुल्ला !

कॅंडीचा गोडवा मनात साठवून आम्ही दंबुल्लाला जायला बसने निघालो. दंबुल्ला कॅंडीपासून जवळपास ७० किलोमीटरच्या अंतरावर आहे, म्हणजे जवळजवळ दोन तास. त्यामुळे हा बसचा प्रवास फार त्रासदायक वाटला नाही. उलट दोन तासातला बराचसा कालावधी कधी निघून गेला हेच कळलं नाही. त्यात भर म्हणून खिडकी जवळची सीट मिळाली आणि प्रवास आपोआप सुखद वाटला. 

वाटेत एके ठिकाणी ऊन घेत असलेले वीस पंचवीस मोर दिसले. तेही अगदी रस्त्याच्या कडेला. पण हे दृश्य मी कॅमेऱ्यात टिपते म्हणेस्तोवर बस ‘झूंSSS’ करून पुढे गेली. कधीकधी तर असं वाटतं की हे दृश्य मी खरोखर पाहिलंय की माझ्या कल्पनेनेच रेखाटलेलं! कसं असतं ना? काही गोष्टी इतक्या अनोख्या असतात की शेवटपर्यंत कोणीतरी चिमटा काढेल आणि स्वप्नभंग होईल असं वाटत राहतं. त्यात आणि तो क्षण कॅमेऱ्यात कैद केला गेला नाही तर जे काही झालं ते स्वप्नातंच होतं असंही वाटत राहतं. 

माझा अविस्मरणीय प्रसंग टिपण्याचा मोका मला हुकवणारा तो बस चालक मात्र आपल्याच मस्तीत बस चालवत होता. त्याने सिंहली भाषेतलं एकच गाणं ‘रिपीट मोड’ वर लावलं होतं, जे ऐकून ऐकून शेवटी माझं डोकं गरगरायला लागलं. कधी एकदा ही बस थांबते असं वाटत असतानाच आम्ही आमच्या ‘डेस्टिनेशनला’ पोहोचलो. अगदीच ओसाड अश्या रस्त्यावर मध्येच ती बस थांबली आणि हेच दंबुल्ला अश्या आग्रहाने आम्हाला तिथे उतरवलं गेलं. 

आता ह्या सूनसान जागेला पाहून, दंबुल्लासारखं प्रसिध्द ठिकाण ह्याच्या आसपाससुद्धा असेल असं वाटत नव्हतं. पण थोडी पायपीट केल्यावर बुद्धाच्या पुतळ्याचा वरचा भाग काही अंतरावर दिसला. सोनेरी रंगाचा तो पुतळा उन्हात सुंदर चमकत होता. जवळ पोहोचलो तेव्हा त्याची ती भव्य काया पाहून डोळ्याचं पारणं फिटलं. त्याच्या पायाशी एक देऊळ होतं ज्याचा दरवाजा म्हणजे अक्राळविक्राळ ‘ड्रॅगन’सारख्या दिसणाऱ्या एका प्राण्याचा तोंडाचा वासलेला आ… त्याच्या त्या तोंडातून आत गट्टम् होण्याअगोदर पाठीमागची लेणी बघून येऊया असा विचार करून आम्ही एका बाजूने वरती गेलेल्या पायऱ्या चढू लागलो. 

एक, दोन, तीन, दहा.., पन्नास…, पायऱ्या काही संपेनात. तब्बल चारशे पायऱ्या चढल्यानंतर बघतो तर तिथे तिकीट कलेक्टर हात पसरून उभा. आम्हाला तर माहितही नव्हतं की इथे आत जायला प्रवेश-शुल्क आहे. आम्हाला बिन तिकिटं आलेलं पाहून तो म्हणाला “काही हरकत नाही. आता काढा.” मी म्हटलं “ठीक आहे, हे घ्या पैसे, दोन तिकिटं द्या.” त्यावर त्याने हात वर केले आणि म्हणाला “अहो माझ्याकडे नाही खाली जा, तिथे काउंटर आहे. तिथेच मिळणार.” परत चारशे पायऱ्या उतरून चाढव्या लागतात की काय ह्या विचाराने आम्ही दोघेही हैराण झालो. त्या द्वारपालाकडे विनंती केली की आता आम्हाला ही लेणी बघू द्या मग खाली उतरून नक्की तिकिटं काढतो. त्यावर त्याने साफ नकार दिला वरून तो मला बघून म्हणतो कसा, “खरंतर साहेबांना (आदित्यला) श्रीलंकन समजून आत मोफत जायला दिलं असतं. पण तुम्हाला बघून लक्षात आलं की तुम्ही विदेशी आहात.” मी ह्यावर काय आणि बोलणार? तेव्हाच “ठीक आहे, मी तिकिटं घेऊन येतो” म्हणत आदित्य खाली पायऱ्या उतरू लागला. मी म्हटलं “आता तो तिकीटं आणेस्तोवर तरी मला इथे आत फिरायला द्या. दारात काय करू बसून?” पण हा पहारेकरी फार कडक शिस्तीचा. कसाच तयार होईना. ह्याच्याशी वाद घालून काही फायदा होणार नाही असं लक्षात घेऊन मी तिथे पायरीवर बसले. तेव्हाच एक मांजर तिथे आलं आणि त्याने आदित्य विजयी मुद्रेने वर येईपर्यंत माझं मनोरंजन केलं. पुढे मग लेणी पाहताना सुद्धा ते शेपूट कसं आमच्या पाठोपाठ फिरत होतं. 

दंबुल्लाबद्दल सांगायचं म्हणजे, हे क्षेत्र गेली बावीस शतकं एक पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून मानलं जातं. इथल्या गुहा बुद्धाच्या शेकडो पुतळ्यांनी भरलेल्या आहेत. गुहांच्या आतल्या भिंती भित्तीचित्रांनी व्यापलेल्या आहेत. आत गेल्या गेल्या सकाळपासून उन्हात फिरत असल्याने दुखणारं डोकं शांत झालं. चारशे पायऱ्या चढून आलेल्या मला आणि त्याच दोनदा चढून आलेल्या आदित्यला त्या काळोख्या थंड गुहांमध्ये मायेच्या स्पर्शाची ओल जाणवली. लोक इथे साधना करायला का येतात, आणि तासनतास ध्यान लावून कसं बसू शकतात ह्याचा उलगडा झाला. काही क्षण आम्ही देखील डोळे मिटून बुद्धाच्या एका मूर्तीपुढे बसलो. मन एकाग्र करायचा प्रयत्न केला. ह्या छोट्याश्या कृतीनेही खूप फरक वाटला. सगळा शीण गेला नि उरलेली लेणी पाहायला अंगात अजूनही तरतरी आली.  क्रमशः