खिडकी

(कविवर्य शंकर रामाणी जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या कोकणी कवितांचा मराठी अनुवाद)

Story: जोगुलझाड | डाॅ. अनुजा जोशी |
21st May 2022, 09:10 Hrs
खिडकी

'निरंजन' या शंकर रामाणी यांच्या कोकणी कवितासंग्रहातील 'जनेल' ( खिडकी) या कवितेतील 'खिडकी' एका छोट्या खोलीची जशी आहे, तशी ती कवीच्या हृदयाचीही आहे. दोन्हींमधून येणारी उजेडाची तिरीप कवीला चिमूटभर सुखाचे आभाळभर दान देणारी आहे. 

मी इथे राहतो ते

घर छोटंसं,भाड्याचं

दोन लहान खोल्या : दोन दारं आणि

दोन खिडक्या

घरात उजेड- वारा फारसा खेळत नाही

फक्त पश्चिमेकडच्या खिडकीतून,

दुपारची ऊन्हं उतरून

सभोवती संध्याकाळीची चाहूल    

लागण्याच्या वेळी

दशमीचांदण्याच्या प्रसन्न पखरणीसारखी

ऊबदार सूर्यकिरणं आत येतात

आणि ते चिमूटभर सुख

काळजाच्या कनवटीला खोचून

एक नवी नजर फुटल्याच्या उर्जा-उमेदीने

मी घरातल्या घरात फे-या मारतो...

आता कळतं,

नकळत हे अंगवळणी पडलंय,

सवयीचं झालंय,

म्हणून कधीकधी माझ्या काळजातही

एक कोनाड्यासारखी खोली,

आणि तिच्या, आहे-नाहीशा असलेल्या

नखाएवढ्या खिडकीतून

शहाळ्यातल्या मऊ सायीसारखी

पहाटेच्या उजेडाची

मनमोहक-मधुरशी तिरीप शिरून

अदृष्टाने खूश होऊन 

माझ्या ओंजळीत घातलेली

अवभृत स्नानाची पूर्वपुण्याई

भास-आभासाच्या हळुवार लयीत

मी घोळवतो...

एका छोट्या खोलीत कवी राहतो आहे. खोलीला दोन दारं आणि दोन खिडक्या आहेत. या खिडक्यांना कवी  'अपुरबायेची जनेलां' म्हणतो आहे कारण एवढ्याशा खोलीचं तेच इवलंसं कौतुक व अपूर्वाईची गोष्ट आहे. घरात फार मोकळा उजेड नाही. पश्चिमेकडच्या खिडकीतून मावळतीला तिरपी किरणं आत येतात. ती कवीला दशमीच्या चांदण्यासारखी सौम्य व लडिवाळ भासतात. ही एवढीच साधी घटना आहे. पण कवीमन त्याकडे काव्यात्मकतेने पाहू लागते. खोलीत शिरणा-या ऊबदार, मुलायम उन्हांनी दिलेले चिमूटभर सुख कवी काळजाच्या कनवटीला खोचून घेतो. आणि निराश मनस्थितीतून बाहेर पडून नवी नजर फुटल्यागत व नव्या उर्जा- उमेदीने तो घरातल्या घरात फे-या मारू लागतो. 

      हा दिनक्रम आता कळत-नकळत सवयीचा झाला आहे. अंगवळणी पडला आहे. व हळूहळू कवीला आता त्याच्या राहत्या खोलीसारखी मनातही एक खोली असून तिला एक खिडकी आहे असे जाणवू लागते. व त्यातूनच काळजाच्या आत असणारी कोनाड्यासारखी एक खोली व तिची नखाएवढी खिडकी कवीला एक वेगळीच भावमय अनुभूती देऊ लागते.  या खिडकीतून पहाटेचा प्रकाश आत शिरतो. तो आडसराच्या मऊ पातळ सायीच्या तुकड्यासारखा कवीला भासतो. मायाळू वाटतो. अदृष्टाने खूश होऊन ओंजळीत दिलेली ही 'अवभृत स्नानाची पूर्वपुण्याई' आहे असे कवी म्हणतो. यज्ञाच्या समाप्तीनंतर केलेल्या स्नानाला 'अवभृत स्नान' म्हणतात. आयुष्यभर रणरणत्या उन्हांचा संघर्ष-यज्ञ-याग केल्यानंतर आयुष्याच्या सायंकाळी- यज्ञसमाप्तीनंतर केलेले हे जणू पवित्र असे 'अवभृत स्नान' आहे असे कवीला वाटते. भास- आभासांच्या हळुवार लयीत ओंजळीत तो हे दान आंदुळणार- घोळवणार आहे. अदृष्टाचा कृपेचा हा आभास- अनुभव कवीला येतो आहे. ही तिरीप मनमोहक मधुर अशी त्याला भासते आहे. 

     धार्मिक व आध्यात्मिक ग्रंथांचे रामाणींचे भरपूर वाचन व व्यासंग होता. त्यामुळे 'अवभृत स्नाना' सारखे  संस्कृतप्रचुर शब्द रामाणींच्या मराठी कवितेतही वारंवार येतात. तसे ते कोकणी कवितेमधेही आलेले दिसतात. 'अपंगाला लाडकी लेक तशी उत्तरेला एक थोटी खिडकी' अशी प्रतिमा 'चमचाभर जिणे जगताना' या 'गर्भागार' संग्रहातील मराठी कवितेतही आली आहे. एकूणच जाणिवांच्या खोल कप्प्याला असलेली रामाणींची ही 'खिडकी' केवळ उजेडाची नसून ती तीव्र इच्छाशक्तीची, उर्जेची, खंबीरपणाची, सकारात्मकतेचीही आहे. खडतर लौकिकातून अलौकिकाचे क्षणमात्र दर्शन व अनुभूती देणारी आहे.