वाचाळविरांना कायद्याचा धाक हवाच !

कोणीही उठावे आणि काहीही लिहावे, बोलावे असा प्रकार सध्या समाजमाध्यमांवर सुरू आहे. सोशल मीडियावर बेजबाबदारपणे व्यक्त होणार्‍यांनी केतकी चितळे प्रकरणापासून धडा घ्यायला हवा. कायद्याचे पालन सर्वांनीच करणे समाजाच्या हिताचे आहे.

Story: मनोरंजन | सचिन खुटवळकर |
21st May 2022, 08:39 Hrs
वाचाळविरांना कायद्याचा धाक हवाच !

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर एक आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्यामुळे मराठी अभिनेत्री केतकी चितळे सध्या कायद्याच्या कचाट्यात सापडली आहे. अत्यंत चुकीच्या शब्दांत एका व्यक्तीने लिहिलेली पोस्ट केतकीने कसलाही विचार न करता फेसबुकवर टाकली आणि सोशल मीडियावर हलकल्लोळ माजला. त्याची परिणती म्हणून केतकीला अटक झाली, तुरुंगाची हवा खावी लागली आणि अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाल्यामुळे आता दीर्घ काळापर्यंत न्यायालयीन वारी करावी लागेल. शरद पवारांच्या नावामुळे या प्रकरणाला राजकीय रंग चढला असला, तरी सुरुवातीला सामाजिक अंगाने हा वाद पेटला.

याला निमित्त ठरले ते शरद पवारांनी जाहीर कार्यक्रमात वाचन केलेल्या एका कवितेचे. जवाहर राठोड यांच्या एका कवितेतील ओळी पवारांनी उद्धृत केल्या आणि त्यावरून वादळ उठले. 

तुमच्या ब्रम्हा, विष्णू, महेशाला : लक्ष्मी अन् सरस्वतीला

आम्हीच की रुपडं दिलंय, आता तुम्हीच खरं सांगा

ब्रम्हदेव आमचा निर्माता की, आम्हीच ब्रम्हदेवाचे बाप?

अशा त्या विद्रोही कवितेतील ओळी होत्या. राठोड यांच्या ‘पाथरवट’ या कवितेतील ओळी हिंदू धर्मातील चतुवर्ण्य व्यवस्था नाकारणार्‍या आहेत. शरद पवारांचे पुरोगामी विचार अशा लेखक, कलाकारांच्या नव्या भूमिकेशी मिळतेजुळते ठरतात. त्यामुळे पवार अशा कवितांचे दाखले अनेकदा देताना दिसतात. अशाच एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी ही कविता वाचली. त्याच वेळी राम मंदिर, ज्ञानवापी मशीद, मथुरेतील श्रीकृष्ण जन्मस्थळाचा वाद असे विषय तापलेले होते. त्यात पवारांनी ही विद्रोही कविता जाहिरपणे वाचल्यामुळे समाजातील ज्या यंत्रणेने हिंदुत्ववादी विचारांत सर्वसामान्यांना गुरफटून ठेवण्याचे जाळे विणले होते, त्या विचारांना मोठा धक्का बसला. त्याची प्रतिक्रिया म्हणून पवारांनी जी कविता वाचली, त्या कवितेतील ठराविक भाग प्रसारित करून उजव्या विचारसरणीच्या लोकांनी गहजब माजविला. पवार हे हिंदूविरोधी असल्याची हाकाटी पिटली गेली. काही राजकीय नेत्यांनी यात उडी घेतल्यामुळे त्याला राजकीय रंग चढला आणि पवारांबरोबरच महाराष्ट्रातील आघाडी सरकारला खिंडीत गाठण्याचे डावपेच रंगू लागले. यात एका ‘फॉरवर्डेड’ पोस्टची भर पडली. ही पोस्ट केतकी चितळे या मराठी अभिनेत्रीने फेसबुकवर केली होती. या पोस्टमध्ये शरद पवारांवर अत्यंत हीन शब्दांत टिप्पणी करण्यात आली. आजारपणामुळे आलेल्या त्यांच्या शरीरावरील व्यंगाचा उल्लेख तर झालाच, शिवाय पवारांनी आता इहलोकाचा निरोप घ्यावा, स्वर्गाच्या विरुद्ध जी जागा सांगितली आहे, तिथे त्यांनी जायची वेळ आली आहे वगैरे शब्दांत मूळ पोस्टकर्त्या कुणा भावे आडनावाच्या महाशयांनी अकलेचे तारे तोडले होते. केतकीने त्यांच्या नावासह फेसबुकवर ती पोस्ट केली आणि त्यावरून समर्थन-विरोधाच्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.

या पोस्टच्या सुरुवातीला ‘तुका म्हणे’ असा उल्लेख आल्यामुळे स्वाभाविकपणे वारकरी समाजासह मोठ्या वर्गाच्या भावना दुखावल्या. त्यामुळे राजकीय कार्यकर्त्यांनी केतकीविरोधात केलेल्या तक्रारींमध्ये वारकरी संप्रदायाच्या लोकांच्या तक्रारीचीही भर पडली. कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल झाले आणि पोलिसांकडून प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून केतकीला अटकही करण्यात आली. तरीही या विषयावरून उठलेले वादळ शमलेले नाही. अनेक जण आजही या पोस्टवरून केतकी चितळेचे लटके समर्थन करताना दिसतात. ज्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या आधारावर केतकीने न्यायालयात आपला अयशस्वी बचाव केला, त्याच आधारावर कायद्यात नमूद केल्याप्रमाणे, ‘आपल्या वर्तनाने दुसर्‍यांच्या भावना दुखावता नयेत, शिवाय सामाजिक सौहार्दाला गालबोट लागता कामा नये, तसे झाल्यास तो गंभीर गुन्हा मानला जाईल,’ असे म्हटले आहे. हे जगजाहीर आहे आणि त्यावर यापूर्वी अनेक वेळा न्यायालयांनी स्पष्टपणे निवाडेही दिलेले आहेत. त्यामुळे केतकीच्या अडचणींत वाढ झाली. इथे केतकीला थेट दोषी ठरवण्याचा किंवा पवारांना सहानुभूती दाखवण्याचा हेतू नाही. हेतू हा आहे की, ज्या समाजमाध्यमांवर आपण व्यक्त होतो, त्या व्यक्त होण्याला नितीनियमांचे बंधन असायला हवे. जर एखाद्याने कवितेतून कथितरीत्या देव-धर्मावर टिप्पणी केली असेल, तर त्याच्या विरोधात कायदेशीर मार्गाने लढण्याची राज्यघटनेत तरतूद आहे. पण हल्ली सोशल मीडियाचा एकूण रोख पाहता, दुसर्‍याने गाय मारली, तर आपण वासरू मारलेच पाहिजे, अशी बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते. 

शरद पवारांनी वाचलेल्या कवितेतील नोंदी अनेकांना झोंबणार्‍या आहेत. त्यावर व्यक्त होणे हा प्रत्येकाचा अधिकार आहे, पण त्या अधिकाराला कायद्याचे कोंदण असायला हवे. आपल्या विचारधारेच्या विपरित कोणी भूमिका घेताना दिसला की, त्याच्यावर तुटून पडायचे आणि कायद्याची बुज न राखता उथळपणे जाहीर व्यासपिठांवर व्यक्त व्हायचे, हा एककल्लीपणा लोकशाहीत मान्य करता कामा नये. सुदैवाने महाराष्ट्रातील अनेक कलाकार आणि राजकीय नेत्यांनी या विषयावर केतकी चितळेच्या भूमिकेचे समर्थन न करता, तिला समज देण्याची आणि अशा प्रकारांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी जागृती करण्याची अभिनंदनीय भूमिका मांडली. त्यातून अशा उठाठेवी कशा चुकीच्या असतात, हा संदेश तरुण पिढीपर्यंत पोहोचला. केतकी चितळे ही एक व्यक्ती झाली. सोशल मीडियावर खरे नाव, खरी ओळख लपवून ट्रोल करणारे लाखोंच्या संख्येने आहेत. ते आपल्यातलेच असतात. त्यांना रोखायचे असेल, तर अशा प्रकरणांतून सर्वांनीच बोध घ्यायला हवा. सध्याचा जमाना सोशल मीडियाचा असल्यामुळे आपल्या व्यक्त होण्यातून समस्येला जन्म न देण्याचे तारतम्य सर्वांनीच जपायला हवे. केतकी चितळे प्रकरणातून हाच बोध घेता येईल.