अनोळखी पत्र

आजी, पत्र पाठवण्यासाठी आधी पत्रावर पत्ता लिहायचा असतो, पण मी कोणता पत्ता लिहू? मला तुझा पत्ताच माहीत नाही. आजी तू, कशी दिसत असशील गं? तू माझ्यासारखी दिसत असशील का? आणि माझे आजोबा? ते कसे दिसत असतील? आजी, तुमचा चेहरा पाहणे तर दूरच, पण मला तुम्हा दोघांचे नाव सुध्दा माहीत नाही गं.

Story: पालकत्व | पूजा भांडारे कामत- सातोस्कर |
20th May 2022, 10:21 pm
अनोळखी पत्र

त्या पावन संध्याकाळच्या प्रहरी मंद पवन चहुदिशांनी विहार करत होता, पण वादळ येणार की काय असेही भासत होते. एकीकडे थंडगार बर्फाचा वर्षाव, निरभ्र आकाशातून होत होता अन् त्या बाजूला मात्र त्याच सरी जणू त्या भूमातेला स्वत:च्या वर्षावाने घायाळ करत होत्या. दशदिशा, वृक्ष, वेली, डोंगर, दऱ्या सर्व सृष्टीचे घटक, पाण्याने भिजून ओले चिंब झाले होते, अन् त्या हृदयातली खोल दरी मात्र, विरहाच्या बाणांनी निरंतर घायाळ होत होती. आकाशात सप्तरंगी इंद्रधनुष्याच्या छटा उमटत होत्या, पण दुसरीकडे त्याच इंद्रधनुष्याच्या उमटलेल्या छटा आपोआप मिटत होत्या, काहीतरी होते जे, त्या उमटलेल्या इंद्रधनुष्यावर परिस्थितीच्या काळ्या लेखणीने रेघोट्या ओढीत होते. सर्वत्र विचित्र अंधार पसरला होता व त्या काळोख्या खोलीत तर अधिकच भयानक अंधार पसरला होता. आकाशातून बर्फाचे खडे पडत होते अन् त्या खोलीत जणू पाषाणांचा एकाएकी मारा सुरु झाला होता. काय चालले होते बरे त्या खोलीत?  त्या अडगळीच्या खोलीत एक एकाकी स्त्री, आपल्या गुडघ्यांवर बसून हुंदके देऊन रडत होती व तिचा नवरा तिला कसाबसा सावरण्याचा अयशस्वी प्रयत्त्न करत होता. पण त्या स्त्रीचे रडे काही थांबायचे नावच घेत नव्हते. 

‘’अग मधू, शांत हो, आपण आपली चूक अजूनही सुधारु शकतो. अजूनही वेळ आपल्या हातातून गेली नाही. पण आत्ता जर तू अशी रडायला लागलीस तर मग तन्वी उठेल ना, आणि ती उठून इथे आली आणि तिने आपल्या आईला अशा प्रकारे रडताना पाहिले तर मग तिची बिचारीची काय अवस्था होईल? तू आपल्या चिमुकलीला काय सांगशील?’’.

‘’अहो, तुम्ही जे काही बोलत आहात, ते मला समजत नाही का? पण मुद्द्याचे गांभीर्य तुमच्या लक्षात अजूनही आले नाही. 

‘’हे घ्या’’ असे म्हणून तिने अडगळीच्या खोलीत तिला सापडलेले एक पत्र दिगंबरच्या हातात दिले, व दिगंबर ते पत्र वाचू लागला.

‘’माझ्या प्रिय आजी आजोबास नमस्कार....

आजी, पत्र पाठवण्यासाठी आधी पत्रावर पत्ता लिहायचा असतो, पण मी कोणता पत्ता लिहू? मला तुझा पत्ताच माहीत नाही. आजी तू, कशी दिसत असशील गं? तू माझ्यासारखी दिसत असशील का? आणि माझे आजोबा? ते कसे दिसत असतील? आजी, तुमचा चेहरा पाहणे तर दूरच, पण मला तुम्हा दोघांचे नाव सुध्दा माहीत नाही गं. तू जर मला दिसली असतीस ना, तुला आणि आजोबांना मी इतकी घट्ट मिठी मारली असती, की तासनतास केवळ तुम्हा दोघांच्या कवेत, मी बसून राहिले असते. तुम्हाला माहीत आहे, माझी चौथी इयत्तेत बढती होणार आहे. आजी, आजोबा आता काही दिवसातच माझा वाढदिवस येणार आहे, दर वाढदिवसाला, मला आई बाबा विचारतात, ‘’बाळा, तुला कोणती भेटवस्तू पाहिजे?’’

 तेव्हा मी त्यांच्याकडे एकच भेट दरवर्षी मागते, दरवर्षी आई बाबांना एकच प्रश्न विचारते, ‘’मला भेट म्हणून माझे आजी आजोबा द्याल का?’’, पण हे ऐकल्यानंतर ते गप्पच राहतात. ते काहीच बोलत नाहीत. मी जेव्हा शाळेत जाते ना, त्यावेळी मला सुध्दा वाटते, की माझा उजवा हात आजीने तर डावा हात माझ्या आजोबांनी पकडावा व मला शाळेत सोडायला यावे. कारण बहुतेक मुलांना त्यांचे आजी आजोबाच शाळेत घेऊन येतात. पण मला ड्रायव्हर शाळेत पोहोचवतात, ते सुध्दा हात पकडून नाहीच. गाडी शाळेजवळ पोहोचली की उतरायचे. शाळा सुटल्यानंतर आजी, आजोबा म्हणून ओरडत माझ्या मित्र मैत्रिणी धावत जातात. त्यावेळी मला तुमची खूप आठवण येते. काल शाळेत आम्ही एक खेळ खेळत होतो. प्रत्येकाने आळीपाळीने आजी आजोबांनी आपल्याला सांगितलेली कुठलीही एक गोष्ट सांगायची. त्यावेळी माझी पाळी आल्यावर मला काही बोलताच येईना. कारण गोष्टी ऐकायला, माझ्याकडे माझे आजी आजोबाच नाहीत. मी चोरुन आई बाबांच्या खोलीतले सगळे कपाटाचे खण वगैरे उघडून बघितले पण, मला तुमचा एक फोटो सुध्दा मिळाला नाही. गाडीतून जाताना कधीकधी बागेत किती तरी मुले आपल्या आजी आजोबांसह खेळताना दिसतात. पण माझ्याकडे आजी आजोबा कुठे आहेत, जे मला बागेत फिरायला घेऊन जातील. आई बाबांना तर माझ्यासाठी वेळ मिळत नाही. दिवसभर मी त्या मंदासोबत असते, पण ती सुध्दा घरातली सर्व कामे करण्यात व्यस्त असते. आजी आजोबा, तुम्ही कुठे आहात? तुम्ही जिथे कुठे असाल तिथून लवकर परत या ना. मला तुमच्या सोबत भरपूर वेळ घालवायचा आहे. तुमच्याकडून गोष्टी ऐकायच्या आहेत. शाळेतला प्रत्येक दिवस कसा होता ते अनुभव तुम्हाला सांगायचे आहेत. रात्रीच्या वेळेस तुमच्या कुशीत झोपी जायचे आहे. हे देवा, तू अधूनमधून म्हणे स्वप्नात दिसतोस ना? मग माझे एकच मागणे ऐक, माझ्या आजी आजोबांच्या स्वप्नात जाऊन सांग, की मला त्यांची खूप आठवण येत आहे. मला फक्त माझ्या आजी आजोबांचे प्रेम दे. मी तुझ्याकडे आणखी कधीच काही मागणार नाही’’. 

एव्हाना बाबांच्या डोळ्यातून सुध्दा अश्रूंच्या धारा ओघळू लागल्या होत्या. 

मधू म्हणाली, ‘’वाचले पत्र? आता तुम्ही का रडायला लागलात? ह्या पत्रातून मला माझ्या चुकीची जाणीव करुन दिली व माझे डोळे उघडले. अहो, आपण खूप मोठ्या गोष्टीपासून, मुकलेलो आहोत. आपण आई बाबांची रवानगी अनाथ आश्रमात करुन आपल्या कुटुंबातल्या आत्म्याला जणू गमावून बसलो. मला वाटले होते की आम्ही आपल्या बाळाला आनंदात ठेवत आहोत, तिची प्रत्येक इच्छापूर्ती होत आहे. पण मला आज जाणीव झाली, की आम्ही सर्व सुखसोयी आपल्या बाळाला दिल्या, पण तिच्या खऱ्या सुखाचा कानोसा कधीच घेतला नाही. मी काही वेळापूर्वी ही अडगळीची खोली साफ करत होते त्यावेळी मला तिने लिहिलेले हे पत्र सापडले, खरेच मला ही अडगळीची खोली स्वच्छ करायचा अधिकार आहे का? यास मी खरेच पात्र आहे का? आजपर्यंत माझ्या हृद्यातली अडगळीची खोली कधी मी साफ केली नाही. त्यात साचलेला कचरा, लागलेला गंज कधी दूर केलाच नाही. मी मातृत्त्व अनुभवलेले असूनसुध्दा मी दुसऱ्या आईला अन् बाबांना तुमच्या सांगण्यावरुन अनाथांसारखे सोडून दिले. अहो, आमच्या हातून खूप मोठे पाप घडले आहे’’. असे म्हणून मधू नवऱ्याच्या पायावर कोसळली. 

दिगंबरने तिला आधार देत खुर्चीवर बसवले व म्हणू लागला, ‘’हो गं, एरवी छोट्यांच्या हातून झालेल्या चूका मोठी माणसे त्यांना दाखवतात, पण आपल्या बाबतीत विपरीतच घडले ना? आपल्या बाळाच्या एका पत्राने आपल्याला आपल्या हातून घडलेल्या पापाची जाणीव करुन दिली’’. ‘’हो ना, अहो आता ऐका, आपण आपल्या आईबाबांना पुन्हा घरी आणूया, आपल्या बाळाला अन् आपल्याला आलेला एकाकीपणा दूर करुया’’. दिगंबरने रडत रडतच मान डोलावली.  दुसऱ्या दिवशी सकाळीच आई बाबा व चिमुकली परी आपल्या घरातल्या भगवंतस्वरुपास आणायला घराबाहेर पडले. अनाथ आश्रमाजवळ पोहोचताच त्यांनी पाहिले, त्यांच्या आई बाबांना. ज्यांचे डोळे जणू त्यांच्याच वाटेकडे आशेने दृष्टी लावून बसले होते. मधू,  दिगंबर व चिमुकली धावत गेले व आईबाबांच्या पायांवर रडत रडतच त्यांनी डोके ठेवले. पण आईबाबा त्यांच्याकडे भावनाहीन दृष्टीने पाहतच होते....एका निर्जीव पुतळयासारखे.....