माझा मुलगा कोमात, गुन्हेगार मात्र फिरतोय मोकाट

कळंगुट येथे मारहाणीत गंभीर जखमी अब्दुलच्या आईचा टाहो

|
17th May 2022, 12:28 Hrs
माझा मुलगा कोमात, गुन्हेगार मात्र फिरतोय मोकाट

फोटो : पत्रकार परिषदेत बोलताना शाहीन सौदागर.
प्रतिनिधी । गोवन वार्ता
पणजी : माझा मुलगा रुग्णालयात मृत्यूच्या दारात उभा आहे. दहा दिवसांपासून त्याने डोळे उघडले नाहीत. डॉक्टर म्हणतात, तो वाचण्याची शक्यता कमी आहे. वाचलाच तरी अर्धांगवायू किंवा मानसिकरीत्या मंद होण्याची शक्यता आहे. एवढ्या गंभीररीत्या मारहाण करूनही त्याचा आरोपी मात्र राजरोसपणे फिरतो आहे. त्याच्यावर कारवाई झालेली नाही, असा टाहो शाहीन सौदागर या आईने पत्रकारांसमोर फोडला. अब्दुल सौदागर याला ८ मे रोजी मारहाण झाली होती. यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तात्काळ गोमेकॉत उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेव्हापासून तो कोमात आहे.
मारहाण झाल्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. इन्स्पेक्टर रविराज नाईक यांच्याकडे तक्रार नोंद केली; मात्र पुढे काहीच कारवाई झालेली नाही. त्यांना अद्याप गुन्हेगार सापडला नसून शोध सुरू आहे असे उत्तर त्यांनी दिल्याचे मुजावर यांनी सांगितले. आमदार मायकल लोबो यांनाही घडलेला प्रकार सांगितला, मात्र त्यांनीही ‘बघतो’ एवढेच उत्तर दिले, असे त्या म्हणाल्या. रुग्णालयात खर्च करण्याची आमची ऐपत नाही. मात्र कुणीही मदतीसाठी पुढे आले नाही. मारहाण करणाऱ्या व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.