गोवा काँग्रेसची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह इतरांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

संविधानासंदर्भातील वाद अजूनही शमेना...

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
26th April, 03:29 pm
गोवा काँग्रेसची पंतप्रधान, मुख्यमंत्र्यांसह इतरांच्या विरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल

पणजी : काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी भारतीय संविधानाबाबत केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांच्याबाबत चुकीची माहिती पसरवल्याप्रकरणी काँग्रेसने शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह काही मंत्री आणि भाजप आमदारांविरोधात मुख्य निवडणूक अधिकारी रमेश वर्मा यांच्याकडे तक्रार दाखल केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आल्तिनो-पणजी येथील मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयात जाऊन तीन पानी लेखी तक्रार दाखल केली असून, संबंधितांवर तत्काळ कारवाई करण्याची मागणीही केली आहे. काँग्रेसचे दक्षिण गोव्याचे उमेदवार कॅ. विरियातो फर्नांडिस हे कारगील युद्धादरम्यान सेवा देणारे युद्धवीर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यापासून ते भाजपच्या इतर नेत्यांनी कॅ. विरियातो फर्नांडिस यांच्या भाषणाचा चुकीचा अर्थ लावत फर्नांडिस यांनी भारतीय संविधानाचा अनादर केल्याची चुकीची माहिती त्यांनी जनतेत पसरवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील चुकीची माहिती पसरवण्यास जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्यासह मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे, मंत्री मॉविन गुदिन्हो, आमदार संकल्प आमोणकर, आमदार दाजी साळकर आणि भाजप प्रवक्ते दामोदर नाईक यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात यावी, असे पाटकर यांनी तक्रारीत म्हटले आहे.

दरम्यान, दक्षिण गोव्यातील एका सभेदरम्यान बोलताना, भारतीय संविधान गोमंतकीयांवर लादण्यात आले. तसे आपण काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सांगितल्याचा दावा कॅ. विरियातो फर्नांडिस यांनी केला होता. फर्नांडिस यांच्या वक्तव्यावरून पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्यासह भाजपचे इतर नेते फर्नांडिस आणि काँग्रेसवर तुटून पडले होते. फर्नांडिस यांनी भारतीय संविधानाचा अपमान केला असून, त्यांची उमेदवारी तत्काळ रद्द करण्याची मागणीही भाजपने निवडणूक आयोगाकडे केली होती.

हेही वाचा