हिरोगिरी पडली महागात; पिस्तूल नव्हे, निघाले लायटर

सोशल मीडियावरील व्हायरल व्हीडीओची गंभीर दखल

|
17th May 2022, 12:24 Hrs
हिरोगिरी पडली महागात; पिस्तूल नव्हे, निघाले लायटर

प्रतिनिधी । गोवन वार्ता
म्हापसा : पिस्तूलवजा लायटरद्वारे हिरोगिरी करण्याचा प्रकार सुनील विजय वाघमारे (रा. कराड, महाराष्ट्र) याच्या अंगलट आला. त्याला पोलीस स्थानकाची हवा खावी लागली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या प्रकारावर हणजूण पोलिसांनी लागलीच कारवाई केली व ते पिस्तूल नसून लायटर असल्याचे स्पष्ट झाले.
हा प्रकार सोमवारी घडला. संशयित आरोपी हा आसगाव येथील एका हॉटेलचा कर्मचारी आहे. सहा महिन्यांपासून तो सदर हॉटेलमध्ये कॉफी मेकर म्हणून काम करत होता. हॉटेल मालकाला कुणीतरी पिस्तूलवजा लायटर भेट दिला होता. सदर लायटरमधील गॅस संपल्याने त्या मालकाने संशयित कामागाराकडे गॅस भरून आणण्यासाठी त्याच्याकडे लायटर दिला होता. सदर लायटर पिस्तूलसारखाच दिसत होता. त्यामुळे हा लायटर घेऊन संशयित आपल्या सहकारी कामगारासोबत त्याच्याच गाडीने बाहेर पडला. लायटर त्याने आपल्या कमरेवर मागच्या बाजूने खोवला. आसगाव ते म्हापसा मार्गे थिवी ते दुचाकीवरून गेले. लायटरचा प्रकार त्याच्या सहकारी मित्राला माहीत नव्हता. त्यांच्याकडे कर्नाटकमधील नोंदणीकृत मोटारसायकल होती.
संशयिताचा फोटो कुणीतरी कार चालकाने घेतला. खुलेआम पिस्तूल कमरेला खोवून पर्यटक फिरत असल्याचे त्याला वाटले आणि त्याने सदर व्हीडीओ व्हायरल केला. व्हॉटस्अ‍ॅप व फेसबूकवर हे फोटो व्हायरल झाले. या फोटोची दखल घेत पोलिसांनी संशयिताला ताब्यात घेतले व त्याच्याकडील तो लायटर जप्त केला. नंतर पोलिसांनी त्याला भा.दं.सं.च्या १५१ कलमाखाली प्रतिबंधात्मक कारवाईखाली अटक केली. संशयितास हिरोगिरी महागात पडली व त्यास पोलिस कोठडीची हवा खावी लागली.