आईच्या कुशीतील बाळाला पळवले; दोन अपहरणकर्त्यांना मुंबईतून अटक

वास्को पोलिसांची कामगिरी; २४ तासांत प्रकरणाचा छडा लावण्यात यश

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
14th May 2022, 12:45 Hrs
आईच्या कुशीतील बाळाला पळवले;  दोन अपहरणकर्त्यांना मुंबईतून अटकवास्को : येथील साई मंदिरालगतच्या पदपथावर झोपलेल्या एका महिलेच्या कुशीतील अकरा महिन्यांच्या बाळाचे बुधवारी पहाटे अपहरण झाल्यानंतर खळबळ माजली. वास्को पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे गतिमान करत मुंबईच्या माहीम भागातून दोन अपहरणकर्त्यांच्या मुसक्या आवळून बाळाला ताब्यात घेतले. दीपक यादव ऊर्फ लंगडा व श्रीमती काना (संपूर्ण नाव मिळाले नाही) अशी

संशयितांची नावे आहेत. दोन्ही संशयित आणि अपहृत बाळाची आई हे सर्वजण वास्कोतच भीक मागून उदरनिर्वाह करतात.
वास्को पोलिसांनी माहीम येथील पायधुनी पोलिसांच्या मदतीने अवघ्या चोवीस तासांमध्ये अपहरणकर्त्यांचा छडा लावल्याने त्यांचे कौतुक केले जात आहे. वास्कोचे उपविभागीय पोलीस अधिकारी नीलेश राणे व प्रभारी उपअधीक्षक गुरुदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी ही कामगिरी केली. त्या बाळाला व अपहरणकर्त्यांना घेऊन पोलीस पथक गोव्याकडे दिशेने निघाल्याचे समजते.
बाळाच्या आईने गुरुवारी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी अज्ञातांविरोधात भा.दं.वि.सं.च्या ३६३ कलमाखाली तसेच गोवा बाल कायद्याच्या ८ कलमाखाली गुन्हा दाखल केला अन् वेळ न दवडता तपासाला गती दिली. महिलेचे कुटुंब जेथे झोपते त्याच पदपथावर झोपणाऱ्यांपैकी लंगडा आणि श्रीमती कानी गायब असल्याचे दिसून आल्यावर त्या महिलेने त्यांच्याबद्दल संशय व्यक्त केला. पोलिसांनी लंगडा व कानी यांच्याबद्दल चौकशी सुरू केल्यावर ते मुंबईला गेल्याची माहिती मिळाली. त्यामुळे त्याचा शोध घेण्यासाठी वास्को पोलिसांचे पथक मुंबईला रवाना झाले. यामध्ये स्थानकाचे प्रभारी निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या नेतृत्वाखाली सचिन बांदेकर, आशिष नाईक, सनील बावळेकर, महिला पोलीस रवीना शहापूरकर यांचा समावेश होता.
पथक मुंबईला पोहोचल्यावर त्यांनी माहीमच्या पायधुनी पोलीस स्थानकातील अधिकाऱ्यांची मदत घेतली. त्यांच्या मदतीने अपहरकर्त्यांचा शोध लावण्यास वास्को पोलिसांना यश आले. त्या बाळाला ताब्यात घेण्यात आले. या अपहरणप्रकरणी लंगडा व कानी यांना अटक करण्यात आली आहे. उपअधीक्षक गुरुदास कदम व निरीक्षक आनंद शिरोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक यशवंत मांद्रेकर पुढील तपास करीत आहेत.

बुधवारी पहाटे घडले अपहरण

अपहरणाची घटना बुधवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. शहरातील बहुतेक भिकारी रात्री साई मंदिराजवळील पदपथावर झोपत असतात. यांतीलच एक महिला तिच्या बाळाला घेऊन दिवसभर भीक मागते आणि रात्री कुटुंबासह तिथे विश्रांती घेते. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री ती बाळाला घेऊन झोपली होती. पहाटे जेव्हा तिला जाग आली तेव्हा तिच्या कुशीत बाळ नव्हते. दिवसभर सर्वांनी बाळाचा शोध घेतला, पण ते सापडले नाही. शेवटी तिने गुरुवारी वास्को पोलीस स्थानक गाठून अपहरणाची तक्रार दिली.