देव कसा पावतो ?

Story: ललित | धनश्री विजय जाधव |
13th May 2022, 09:44 pm
देव कसा पावतो ?

देव कधीच म्हणत नाही की, माझ्यासाठी उपवास करा, रांगेत चप्पल न घालता उभे रहा, माझ्यासाठी हे - ते  आणा आणि लोटांगण घाला. तुम्ही मन साफ ठेवून, मनात भक्ती घेऊन, चेहऱ्यावर एक गोड हास्य घेऊन गेला आणि त्याच्यापुढे हात जोडला तर ते खूप असतं.

जवळ कुठे देवळात पूजा, प्रसाद किंवा काही कार्यक्रम असला की जास्तीत जास्त लोक देवळात हजर असतात. आणि गोव्यात तर लोक देवाच्या दर्शनाला भक्तीभावाने दूर - दुरून येतात. लहानणापासूनच मलाही देवळात जायची तशी फार आवड आहे. कोण जरी सोबत नाही आलं तरी मी व माझी आज्जी तर देवळात जातोच.

काही दिवसांपूर्वीचीच गोष्ट आहे. माझ्या घराजवळ एका देवळात पूजा होती. फार दूर दूरचे भक्त देवाच्या पाया पडायला आले होते. आम्हीही तिथे गेलेलो. देवळात त्या दिवशी फार गर्दी होती. देवाचे दर्शन घ्यायला तर खूप मोठी रांग होती. रांगेत लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळे जण उभे होते. रांग एवढी लांब होती की काही लोक बाहेर उन्हात तळमळत थांबलेले. 

  त्यातील एका बाईवर माझी  नजर खेचली गेली. माणसं थोडं तरी इकडे तिकडे होत होती, बसत होती. पण ही बाई मात्र तशीच उन्हात तळमळत थांबलेली व तोंडातल्या तोंडात पुटपुटत देवाचे नाव घेत होती. जशी रांग संपत आली व तिला देवळात जायला मिळालं, ती अगदी भक्तीने दर्शन घेत होती. ती बाई खूप वेळ देवापुढे उभी राहिली, दंडवत लोटांगण घालत देवाच्या पाया पडत होती, आणि देवापुढे एक चार - पाच नोटा ठेवून मोठा कुंकवाचा टिळा लावून बाहेर पडली.  मी आजीला म्हटलं,  "  किती श्रध्दा आहे ना गं तिची देवावर!" 

   काही वेळाने जेवण्याच्या रांगेत ती बाई  उभी राहिली. पाठीमागे आम्हीपण होतो. एक लहान मुलगा आपल्या आईजवळ भूक लागलीये म्हणून रडत होता. रांगेत ते शेवटला होते. त्या मुलाची आई आली व नेमकी त्या बाईजवळ येऊन म्हणाली, "काकू, माझ्या मुलाला जरा मध्ये घेता का ओ? त्याला खूप भूक लागलीये." ह्यावर ती बाई रागाने ओरडली," चालती हो तिकडे! आम्ही इथे कधीपासून थांबलोय आणि ही आली मध्ये घुसायला." तिचे ते शब्द ऐकून मुलगा व त्याची आई शरमेने तिथून निघून गेली. मला मात्र आता त्या बाईचा फार राग आला. काही वेळाने ती बाई ताट घेऊन जाताना तिच्या पायात एक कुत्रं आलं. तिने त्या कुत्र्याला जोरात लाथ मारली. माझं लक्ष त्या बाईवरच होतं. देवळात गर्दी असल्याकारणाने  त्या बाईला  एक मुलगी येऊन चुकून धडकली तर  त्या मुलीला ती शिव्या देऊ लागली.  तिच्या  चेहऱ्यावर हास्य तर कसलंच नव्हतं. मला त्या बाईचं अगदी नवलच वाटलं.

घरी जाताना मी व आज्जी तिच्यावरच चर्चा करत होतो. माझ्या मनात विचार आला की,  अगं तुला लहान मुलांची माया येत नाही, प्राणिमात्रांना त्रास देतेस, देवळात येऊन वाईट शब्द वापरतेस , दुसऱ्यांचा अपमान करतेस, मन दुखवतेस  तर तुझा देवळात येऊन फायदा काय? त्या रांगेत तळमळत उभी राहून देवाचं दर्शन घेऊन फायदा काय? देवापुढे  लोटांगण घेऊन फायदा काय? 

  देव कधीच म्हणत नाही की माझ्यासाठी उपवास करा, रांगेत चप्पल न घालता उभे रहा, माझ्यासाठी हे - ते  आणा आणि लोटांगण घाला. तुम्ही मन साफ ठेवून, मनात भक्ती घेऊन, चेहऱ्यावर एक गोड हास्य घेऊन गेला आणि त्याच्यापुढे हात जोडला तर ते खूप असतं. असा  वाईट स्वभाव ठेवल्यावर देव कधीच पावत नसतो. आचरण निर्मळ आणि मन शुद्ध असेल तर *देव आपोआप पावतो.