एनसीबी कारवाईत २५ किलो गांजा जप्त

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
22nd January 2022, 12:23 Hrs
एनसीबी कारवाईत २५ किलो गांजा जप्त

पणजी : गोवा विभागाच्या नार्कोटिक कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) बुधवारी अमली पदार्थ तस्करी प्रकरणी जुने गोवा, बाणास्तरी आणि शिरोडा-फोंडा या तीन ठिकाणी छापा टाकून सनी कुमार (उत्तर प्रदेश) आणि दिलीप (राजस्थान) या दोघांना अटक केली. ब्युरोने त्यांच्याकडून २५ लाख रुपये किमतीचा २५ किलो गांजा जप्त केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जुने गोवा येथील सनी कुमार हा संशयित गांजा तस्करीत सहभागी असल्याची माहिती ब्युरोला मिळाली होती. त्यानुसार एनसीबीचे पश्चिम विभागाचे सहाय्यक संचालक रवींद्र सिंग बिस्त यांच्या मार्गदर्शनाखाली अधीक्षक सुजीत कुमार यांच्या नेतृत्वाखाली एनसीबीने १९ रोजी जुने गोवा येथील एका सुपर स्टोअरजवळ छापा मारला. यावेळी सनी कुमारला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडून १ लाख २५ हजार रुपये किमतीचा १.२५ किलो ग्रॅम गांजा जप्त केला. त्यानंतर एनसीबीने गुरुवारी सकाळी बाणास्तरी पुलाजवळ गांजा तस्करी प्रकरणी कारवाई केली. यावेळी एनसीबीने दिलीप नामक राजस्थानी युवकाची झडती घेतली. त्याच्याकडून एनसीबीने ३ लाख ७० हजार रुपये किमतीचा ३.७० किलो ग्रॅम गांजा जप्त केला व त्याची कसून चौकशी केली असता, त्याने शिरोडा-फोंडा येथील भाड्याच्या खोलीत गांजा साठवल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एनसीबीने त्याच्या खोलीची झडती घेतली असता, त्याच्याकडून २० लाख रुपये किमतीचा २०.२० किलो ग्रॅम गांजा जप्त करत संशयिताला अटक केली आहे.